आजकाल इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना थांबत नाही आहेत. चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता असेच एक प्रकरण ग्रेटर नोएडाच्या इकोव्हिलेज-2 सोसायटीमधून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील ई-वाहन चार्जिंग स्टेशनवर चार्ज होत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला जोरात आग असून या घडलेल्या घटनेमध्ये चांगली बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही आहे. लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
सोसायटीच्या जवळच्या मार्केटमध्ये एका दुकानासमोरील चार्जिंग स्टेशनवर चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक स्कूटर लावण्यात आली होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक स्कूटरमध्ये मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. आगीच्या वृत्ताने घबराट निर्माण झाली होती. काही लोकांनी सोसायटीच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. इलेक्ट्रिक स्कूटर ज्या किओस्कवर उभी होती ते धातूचे होते असे सांगितले जात आहे. याच कारणामुळे ही आग जास्त पसरू शकली नाही.
उन्हाळ्यात अशा घटना वाढतात
इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या बहुतांश घटना उन्हाळ्यात घडतात. या दिवसात देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड उष्णता निर्माण झालेली असते. या काळात उत्तर भारतातील अनेक भागात पारा 50 अंशांच्या पुढे गेलेला आढळून येतो. बॅटरीचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास आग लागण्याचा धोका निमार्ण होऊ शकतो. याशिवाय ठिणगी आणि शॉर्टसर्किटमुळेही आग लागण्याची शक्यता असते. इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी कूलिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळेही आग लागते.
ही खबरदारी घ्या
तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर चालवत असाल तर या सीझनमध्ये तुम्हाला थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची इलेक्ट्रिक स्कूटर चांगल्या प्रकारे सांभाळू शकता.
जास्त चार्जिंग टाळा
इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर प्लग काढून टाका. जास्त चार्जिंगमुळे बॅटरीचे आयुष्य प्रभावित होऊ लागते. त्यामुळे चार्जिंग झाली असल्यास लगेच प्लग काढून टाका.
सतत चार्ज करू नका
कुठूनतरी परत आल्यानंतर लगेच बॅटरी चार्ज करणे टाळा. लांबच्या प्रवासातून परतल्यानंतर, बॅटरीला थंड होण्यासाठी वेळ द्या आणि नंतर चार्जिंगवर ठेवा.
उन्हात पार्क करू नका
इलेक्ट्रिक वाहने उन्हात उभी करणे टाळा. त्यात बसवलेली लिथियम आयन बॅटरी सूर्यप्रकाशाने गरम होते. अशा स्थितीत चार्जिंगला लावणे धोकादायक ठरू शकते.
ज्वलनशील वस्तू ठेवू नका
स्प्रे, परफ्यूम, अल्कोहोल यासारख्या ज्वलनशील वस्तू स्कूटरच्या बूटमध्ये ठेवू नका. यामध्ये उष्णतेमुळे आग लागण्याचा धोका जास्त वाढू शकतो.