बोअरवेल म्हणजेच ज्याला आपण मराठीत कुपनलिका म्हणतो. ही कुपनलिका खोदणारी गाडी ही ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याचा मुख्य स्त्रोत तयार करणारी एक अद्भुत प्रणाली आहे. जमिनीच्या शेकडो फूट खाली जाऊन पाण्याचा मार्ग मोकळा करणे हे या मशीनचे मुख्य काम असते. पाहायला गेलं तर जमिनीच्या आत शंभर दोनशे तीनशे फुट आत खोदत जाणे, आणि पाण्याचा स्त्रोत सुरक्षितपणे वर वापरण्यासाठी काढून आणणे, हे एक तंत्रज्ञानाचे दिव्यच म्हणावे लागेल.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक चमत्कार
तांत्रिक दृष्ट्या विचार केला तर ही मशीन ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक उत्तम चमत्कार आहे. एका अवजड ट्रकमध्येच प्रचंड क्षमतेचे हायड्रॉलिक पंप, हाय-प्रेशर एअर कॉम्प्रेसर आणि रोटेशन गियर सिस्टीम एकत्र केलेली असते. ट्रकचे इंजिन केवळ गाडी चालवण्यासाठीच नाही, तर जागेवर स्थिर राहून कॉम्प्रेसर आणि ड्रिलिंग रॉड्सना अफाट शक्ती देण्यासाठी ‘पॉवर टेक-ऑफ’ सिस्टीमद्वारे वापरले जाते. एकाच वाहनात इतकी प्रचंड मेकॅनिकल आणि हायड्रॉलिक ऊर्जा सामावून घेणे हे अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
जमिनीचे स्तर आणि पाण्याचे थर (पाण्याचे पडदे असेही म्हणले जाते)
ड्रिलिंग सुरू झाल्यावर मशीनला जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमधून जावे लागते:
बोअरवेलचे काम प्रामुख्याने DTH Down-The-Hole तंत्रज्ञानावर चालते.
ड्रिलिंग Drilling: कॉम्प्रेसरच्या सहाय्याने अतिउच्च दाबाची हवा खाली सोडली जाते. यामुळे ड्रिलिंग रॉडच्या टोकाला असलेले ‘बटन बिट’ खडकावर वेगाने आपटून त्याला भुगा करते. हा खडकाचा भुगा हवेच्या दाबानेच जमिनीवर बाहेर फेकला जातो.
केसिंग पाईप Casing Pipes: जमिनीच्या वरच्या मऊ थरातील माती किंवा वाळू बोअरवेलमध्ये कोसळू नये म्हणून पीव्हीसी किंवा लोखंडी ‘केसिंग पाईप’ ठराविक खोलीपर्यंत खडक लागेपर्यंत टाकले जातात.
पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य
सबमर्सिबल मोटरचे कार्य
बोअरवेल पूर्ण झाल्यावर त्यात पाणी उपसण्यासाठी ‘सबमर्सिबल मोटर’ सोडली जाते. ही मोटर पाण्याच्या आत पूर्णपणे बुडलेली असते. यात एक इलेक्ट्रिक मोटर आणि मल्टिस्टेज इम्पेलर असतात. जेव्हा मोटर सुरू होते, तेव्हा इम्पेलर वेगाने फिरून पाण्याचा दाब वाढवतात आणि पाईपद्वारे पाणी जमिनीवर खेचून आणतात.
येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने
बोअरवेल मारणे हे जोखमीचे काम असते. कधीकधी ड्रिलिंग करताना रॉड किंवा बिट खडकात अडकून तुटतात, ज्याला ‘रॉड जॅम’ म्हणतात. मऊ किंवा वाळूच्या जमिनीत बोअर कोसळण्याचा धोका असतो. तसेच, अनेकदा खूप खोल जाऊनही पाणी न लागल्याने ‘ड्राय बोअर’ होण्याचीही शक्यता असते.
थोडक्यात, बोअरवेल मशीन म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा असा नमुना आहे जो निसर्गाच्या आव्हानांवर मात करून मानवाला जीवनदायी मुबलक पाणी अगदी सोयीने मिळवून देतो.






