घर बांधताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा पाया. घराचे संपूर्ण वजन पेलण्याची जबाबदारी पायावर असते, आणि हा पाया किती खोल असावा हे संपूर्णपणे तिथल्या मातीच्या प्रकारावर अवलंबून असते. बांधकाम शास्त्रानुसार, वेगवेगळ्या मातीची भार सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणूनच जमिनीच्या प्रकारानुसार पायाची खोली ठरवणे आवश्यक असते.
१. मुरमाड किंवा खडकाळ जमीन: ही जमीन घर बांधण्यासाठी सर्वात उत्तम आणि सुरक्षित मानली जाते. खडकाळ जमिनीची भार सहन करण्याची क्षमता खूप जास्त असते. अशा जमिनीवर घर बांधताना जास्त खोल खणावे लागत नाही. साधारणपणे ३ ते ४ फूट खोलीवर कडक खडक किंवा मुरूम लागल्यास तिथे पाया मजबूत उभा करता येतो. यामुळे बांधकामाचा खर्चही वाचतो.
पाणाडी जमिनीच्या खाली पाणी कसे शोधतात? भोंदूपणा, परंपरा की विज्ञान? जाणून घ्या सत्य
२. काळी कसबदार किंवा शेतजमीन:शेतीसाठी अत्यंत सुपीक असलेली ही माती बांधकामासाठी मात्र सर्वात आव्हानात्मक असते. ही माती पावसाळ्यात पाणी शोषून फुगते आणि उन्हाळ्यात कोरडी पडून तिला मोठ्या भेगा पडतात. अशा मातीत पाया किमान ५ ते ७ फूट खोल खणावा लागतो, म्हणजेच जोपर्यंत खाली कडक पिवळा मुरूम किंवा काळा खडक लागत नाही तोपर्यंत खोदकाम करावे लागते. अशा ठिकाणी ‘राफ्ट फाउंडेशन’ किंवा ‘अंडर-रीम्ड पाईल्स’चा वापर करणे गरजेचे असते.
३. रेताड किंवा गाळाची माती: नदीकाठच्या, धरणांच्या जवळील किंवा समुद्रकिनाऱ्याच्या शेती आणि परिसरात अशी माती आढळते. या मातीचे कण सुटसुटीत असल्यामुळे ती पाणी धरून ठेवत नाही आणि खचण्याचा धोका असतो. अशा जमिनीत पाया किमान ५ ते ८ फूट खोल घ्यावा लागतो. काही वेळा तांत्रिक सल्ल्यानुसार मजबुतीसाठी ‘पायलिंग’ पद्धत वापरावी लागते.
निवृत्तीनंतर घ्या आयुष्याचा आनंद! फिरण्यासाठी ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की द्या भेट, मन होईल फ्रेश
४. भरलेली किंवा मऊ जमीन: कचरा, ढिगारे किंवा मोकळी माती टाकून बुजवण्यात आलेल्या सखल जमिनी या प्रकारात येतात. ही जमीन स्थिर होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. अशा ठिकाणी वरची कृत्रिम माती संपूर्ण काढून मूळ नैसर्गिक कडक जमीन लागेपर्यंत म्हणजेच साधारण ६ ते ९ फूट खोल पाया खणावा लागतो.
तरीही, घर बांधण्यापूर्वी स्ट्रक्चरल इंजिनियर कडून मातीची चाचणी करून घेणे नेहमीच फायदेशीर ठरते, ज्यामुळे घराला दीर्घायुष्य लाभते.






