होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा’ या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे आषाढ महिना आला की, प्रत्येक वारकऱ्याला वेध लागतात ते शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि महाराष्ट्राचं वैभव असलेल्या वारीचे. विठ्ठलाच्या भेटीला आतूर झालेले हे वारकरी गोड विठ्ठल नामाचा प्रेमभावाने टाहो फोडत, पावसापाण्याची तमा न बाळगता हातात टाळ, मृदुंग, भगवा पताका घेऊन अनवाणी पायाने चालत, नाचत देवांचाही देव असलेल्या विठुमाऊलीला भेटण्यासाठी आसुसलेले असतात.
या सर्वश्रेष्ठ आषाढी एकादशी निमित्ताने राज्यातील वेगवेगळ्या भागांतून असंख्य भाविक तसेच वारकरी हरिनामात तल्लीन होऊन पायी पंढरपुरात येतात. विठुरायाच्या भेटीच्या या वाटेवर प्रचंड गर्दी, पाऊस असला तरी ‘चला चला पंढरीला जाऊ, डोळे भरुनी विठुमाऊलीला पाहू’ एवढी एकच भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मुखावर असते.
पुरुष वारकरी हातात दिंडी, पताका, वीणा घेऊन तर महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन, पाण्याने भरलेला हंडा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, विठ्ठल-रखुमाई यांच्या रेखीव देखण्या मूर्ती घेऊन हरिनामाच्या गजरात मग्न झालेले दिसतात. वारीत कुणाच्या मुखी पांडुरंग असतो, तर कुणाच्या मुखी असतो विठ्ठल… अशा या विठूमाऊलीच्या भक्तीचं हे गारुड वारकरीच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रावरच आहे.
वारीच्या मार्गावर भक्तांच्या सेवेसाठी आलेल्या संस्था, अन्नदाते, सेवेकरी आणि पोलीस यांच्या रुपातील भगवंतही पावलोपावली उभा असल्याचं दृश्य दिसतं. स्त्री-पुरुष, लहान-थोर, गरीब-श्रीमंत हे सगळे भेदभाव आणि अहंकार इथे गळून पडलेला दिसतो आणि भावना उरते ती फक्त समानतेची, कारण वारीतील प्रत्येकजण एकमेकांना चरणस्पर्श करीत गळाभेट करणाऱ्या माऊलीच्या रुपात असतो.
पंढरपुरात प्रवेश केल्याकेल्याच असंख्य दिंड्या पाहण्यात मन तल्लीन होऊन जातं. वारकऱ्यांनी एवढ्या गर्दीतही जागोजागी केलेल्या फुगड्या, रिंगण, सुंदर पदन्यास करीत मारलेल्या पावल्या पाहून मन प्रसन्न होतं. भजन, कीर्तन, भारूड याने अवघी पंढरी दुमदुमून जाते. मनाने भक्त आणि विठुमाऊली जणू एकरूप झालेले असतात. आषाढी एकादशीच्या या दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी उसळलेल्या या गर्दीचे स्वरूप श्रीकृष्णाच्या विराट रूपासारखं विराट असतं आणि ‘ते याची देही, याची डोळा’च अनुभवावं लागतं.
विठुरायाच्या पंढरीत प्रत्येक भाविकाच्या, वारकऱ्याच्या मुखात सतत गजर असतो तो हरिनामाचा. या हरिनामात मुक्ती, भुक्ती आणि भक्ती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य असते. मानसिक आणि पर्यायाने येणारे शारीरिक रोग नाहीसे करण्याची शक्ती नामात असते. अशा या दिव्य नामाची ओळख सर्वांना व्हावी म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी २७ अभंगांचा ‘हरिपाठ’ हा अलौकिक ग्रंथ प्रगट केला.
नामस्मरणाचं महत्व सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या हरिपाठाचेही वारकरी संप्रदायात एक विशेष स्थान आहे. ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥’ असा मनाला, कानाला गोड वाटणारा हा हरिपाठ उभं राहून टाळ-मृदंगांच्या गजरात लयबद्ध पदन्यास करीत त्यात वारकरी दंग होऊन जातात.
विठूरायाच्या दर्शनाआधी वारकरी तसेच अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात. चंद्रभागेच्या पात्रात स्नान करून, कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगवा मिरवीत वारकरी महाराष्ट्राचे दोन डोळे असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांच्या गजरात कळसाचं, विठुमाऊलीचं दर्शन घेतात आणि तृप्त तृप्त होतात. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगवा पताका म्हणजे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित जगणं याचंच जणू प्रतीक आणि वारी म्हणजे प्रबोधन, श्रद्धा आणि भक्तीचा अविस्मरणीय सुंदर असा सोहळा भाविकाला जणू मंत्रमुग्ध करतो.
मानवी जीवनाच्या तीन अवस्थांपैकी वृद्धावस्था ही परमार्थाकडे वाटचाल करणारी असते. त्यामुळे वारीत ज्येष्ठ वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असते. तेवढीच त्यांच्यातील ऊर्जाही अचंबित करणारी असते. ‘विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा’ ही भावना त्यांच्या हृदयी ठायी ठायी भरलेली दिसते. अशा आपल्या सगळ्या अडचणींवर मात करून न चुकता वारीसाठी आलेल्या, तहान भूक सगळ्याचा विसर पडलेल्या आपल्या भक्तांवर अपार प्रेम करणारी विठूमाऊलीही आपल्या या भक्तांच्या भेटीने संतुष्ट न होते, तर नवलच. आणि मग ही विठूमाऊलीही आपल्या भक्तावरच्या सगळ्या संकटाचा भार स्वतः घेऊन त्याच्या झोळीत भरभरून दान टाकते, आनंदाचं, समाधानाचं.
कळसाच्या दर्शनाने, विठुरायाच्या भेटीने वारकरी तृप्त होतो. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया’ रुपातील’ सावळ्या विठुरायाचं दर्शन घेऊन हा तृप्त झालेला वारकरी परतवारीला लागतो तो वर्षभराची ऊर्जा आणि समाधान घेऊनच…
अनघा सावंत
anaghasawant30@rediffmail.com