२ मार्च १९८६ हा दिवस. ‘तुझं आहे तुजपाशी’चा नाटकाचा दौरा सुरू होता. डॉ काशिनाथ घाणेकर या रंगभूमीवरल्या पहिल्या हाउसफुल्ल सम्राटाची भूमिका असल्याने तुफान गर्दी उसळलेली. महाराष्ट्रभरातले त्यांचे चाहते प्रयोगाची वाट बघत होते. अमरावती शहरात डॉक्टर पोहचले. नाटकाची गाडी जशी आत शिरली तसा चाहत्यांनी पाठलाग सुरू केला. पोस्टर आणि हाउसफुल्लचा बोर्ड डॉक्टरांनी बघितला ते खुश झाले. हात मिळवून रंगपटात गेले. प्रयोग सुरू झाला. अनाउन्समेंटमध्ये ‘डॉ. काशिनाथ घाणेकर!’ हे शब्द उच्चारताच टाळ्या, शिट्ट्या यांनी नाट्यगृह दणाणून गेले. पण आज काही केल्या डॉक्टरांचा आवाज साथ देत नव्हता. तरीही आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी रसिक दाद देत होते. त्याला सांभाळत होते. कौतुक – प्रेम त्यातून नजरेत भरत होतं. प्रयोग संपला. हॉटेलात डॉक्टर पोहचले. झोपले. सकाळी काही केल्या ते दरवाजा उघडतच नव्हते. स्टुलावर उभं राहून काहींनी बघितलं तर डॉक्टर कोसळलेले. पलंगाखाली त्यांचा देह लटकत जसा होता. दौऱ्यावर कायम सोबत असलेली आईची साडी त्यांनी कवटाळलेली. साराप्रकार धक्कादायक आणि सून्न करून सोडणारा. ‘डॉक्टर गेले’ हे मनाला न पटणारं. ज्या रंगमंचाचे ते सम्राट होते. योद्धे होते ते रणांगणावर शांतपणे निस्तेज झालेले. नाटकाचा दौरा साऱ्या नाट्यसृष्टीला हादरून सोडणारा ठरला…
डॉक्टरांच्या रंगभूमीवरल्या या एक्झिटला ३६ वर्षे उलटली. पिढी बदलली. नाटके बदलली. नाट्यगृहेही वाढली. तीही बदलली. पण डॉक्टरांची आठवण मात्र रसिकराजा आजही विसरलेला नाही. त्यांना प्रत्यक्ष रंगभूमीवर बघितलेला प्रेक्षक आणि त्यांच्या आठवणींमुळे जागा झालेला नवा रसिक डॉक्टरांच्या आजही प्रेमात आहे.
डॉक्टरांसोबत अनेक नाटकात साक्षीदार असणारे आणि डॉक्टरांचे चाहाते, मित्र रमेश रामचंद्र भिडे! त्यांचा ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा एकपात्री प्रयोग आज एका वळणावर पोहचलाय. आज रविवार २४ सप्टेंबर रोजी या एकपात्री कार्यक्रमाचा चक्क २५ वा प्रयोग खेड मुक्कामी होत आहे. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे, डॉक्टरांचे चाहाते असलेले रतीब सर तिथल्या उर्दू शाळेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी खेड येथे हा प्रयोग आयोजित केलाय. रतीब सरांनी हा एकपात्री यापूर्वी दोनदा बघितला आणि ते भारावून गेले, त्यातूनच उर्दू रसिकांपर्यंत डॉक्टरांचा रंगप्रवास साकार व्हावा, या हेतूने त्यांनी हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय. भिडे यांच्या या ‘हटके’ असलेल्या एकपात्रीचे यापूर्वी शिवाजीमंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह या नाट्यगृहात जाहीर प्रयोग झालेत. डॉक्टरांच्या ‘फॅन’नी त्याला तसा उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. गर्दीपेक्षा ‘दर्दी’ या आविष्काराचा आस्वाद घेतात. मुंबईसोबतच चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, चिंचवड, पुणे, डोंबिवली, महाड इथेही प्रयोग झालेत. एका एकपात्रीचे असे प्रयोग होणं हे आजकालच्या काळात दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. ‘एका मित्राचे ऋण फेडल्याचे समाधान मला मिळते. एका हिरोचा भूतकाळ अलगदपणे रसिकांपुढे साकार करण्यात आनंद मिळतोय. बुकिंगच्या आर्थिक आकडेवारीपेक्षा एका मित्राच्या आठवणींना तो उजाळा मिळतोय. तो मला लाख मोलाचा वाटतोय!’ – असे भिडे यांनी याबद्दल बोलतांना सांगितले. ‘डॉक्टर’ हा विषय म्हणजे त्यांच्या हृदयातला एक नाजूक कप्पाच आहे. जो कायम त्यांच्या शब्दाशब्दात उमटतो.
रमेश भिडे हे रंगधर्मी जुन्या मंडळींना ठावूक आहेत. तो काळ तीसएक वर्षांपूर्वीचा. शेकडो नाटकात भिडे यांनी भूमिका केल्या. नाटकातील भूमिकेची लांबी – रुंदी न बघता चांगल्या कलाकारांची सोबत मिळावी, हे त्यांनी प्रामुख्याने बघितले. डॉक्टरांप्रमाणेच त्यांनी प्रभाकर पणशीकर, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, रमेश भाटकर, प्रदीप पटवर्धन, गिरीश ओक, अशोक समेळ, फैयाज, मधु कांबीकर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत भूमिका केल्या. मूळचे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मुरार गावचे. ठाण्याच्या ‘सॅडोज’ कंपनीत २४ वर्षे नोकरी सांभाळून नाटकाचे वेड जपले. एकपात्री प्रयोगाप्रमाणे त्यांनी डॉक्टरांच्या आठवणींना उजाळा देणारे एक पुस्तकही प्रसिद्ध केलय. या व्यक्तीचित्रणात्मक पुस्तकाची निर्मिती पुण्यातील संवेदना प्रकाशन संस्थेने केलीय. जे शीर्षकापासूनच वाचकांना भुरळ पाडणारे आहे. एका हाऊसफुल्लच्या बादशहाच्या जीवनातले प्रसंग हे जसे त्यांच्या एकपात्रीतून आकाराला येतात तसेच ते या पुस्तकातूनही वाचकांना पकडून ठेवतात. एका कालखंडाचा महत्त्वाचा दस्ताऐवजच या दोन्हीतून मराठी दर्दी वाचक – रसिकांपुढे आलाय. जो दुहेरी रंगयोगायोगच. जो अनुभविण्याची संधी मिळाली.
चित्रपटसृष्टीत ज्याप्रमाणे कलाकारांचे ‘फॅन’ क्लब असतात. त्याचप्रकारे भिडे यांच्या एकपात्रीमुळे राज्यभरात डॉक्टरांचे चाहाते हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एकवटत आहेत. डॉक्टरांवर चित्रपट जरूर आला पण तो तसा वादग्रस्त ठरला. डॉक्टर प्रेमींना तो पसंत पडला नाही. आता डॉक्टरांवर एखादे नाटक आणि लघुपट काढावा अशी ही मागणी जोर धरत आहे. डॉक्टरांची कायम अंधारात राहिलेली बाजू त्यातून प्रकाशात येईल ही माफक अपेक्षा त्यामागे आहे. गेल्या १४ सप्टेंबरला डॉक्टरांच्या चाहत्यांनी त्यांचा वाढदिवस केला आणि आठवणींना उजाळा दिला. १४ सप्टेंबर १९३१ या दिवशी त्यांचा जन्म झाला. आज जर असते तर ९१ वा वाढदिवस. मुळचे ते राजापूरचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. शाळेपासूनच एक हुशार विद्यार्थी. त्यांचे एक कुलकर्णी नावाचे शिक्षक होते. त्यांच्याकडून शेक्सपिअरच्या नाटकांकडे डॉक्टर हे शालेय वयातच ओढले गेले. कुलकर्णी मास्तरांकडून त्यांनी शेक्सपिअर जाणून घेतला. उतारे ऐकले आणि त्यांचे संस्कार हे कळत नकळत त्यांच्यावर झाले.
नानासाहेब फाटक यांची नाटके त्यांनी पुण्यात बघितली आणि अभिनयावर फिदाही झाले. पुढे दातांचे तज्ञ डॉक्टर बनले. पण नाटक त्यांचा वीकपॉईंट होता. ग्रँड मेडिकल कॉलेजच्या नाटकात त्यांनी चमक दाखविली, त्यांचे कौतुक झाले. दवाखाना, रुग्णालयापेक्षा त्यांना नाट्यगृह हे अधिक जवळचे बनले. डॉक्टरांचा जीवनप्रवास हा वेगवान आणि धक्कातंत्राने भरलेला. जो एखाद्या महाकादंबरीचा विषय ठरावा. रंगभूमीवर सोबत असणाऱ्या कलाकारांपासून ते बॅकस्टेज मंडळींपर्यंत ते काळजी करायचे. साऱ्यांना डॉक्टरांचा आधार वाटायचा. अनेक गरजूंना त्यांनी शिक्षणासाठी, शस्त्रक्रियेसाठी पैसा दिला. बरेच जणांची घरे त्यांनी सावरली. माणुसकीचे दर्शन त्यांच्या मदतीतून दिसते. पण केलेल्या कामाबद्दल त्यांनी कधीही भांडवल केले नाही. त्यांची प्रसिद्धीही करण्याचे कायम टाळले. त्यांची समाजसेवा ही तशी अंधारातच राहिली. त्याबद्दल त्यांनी कधीही वाच्यता केली नाही किंवा त्यावर चर्चाही झाली नाही.
डॉक्टरांच्या जीवनावर मध्यंतरी चित्रपट प्रदर्शित झाला तो खराखुरा वाटत नाही. त्यात अनेक चुकीचे संदर्भ आहेत. जे गैरसमज वाढविणारे आहेत, अशी बोलकी प्रतिक्रिया या एकपात्रीच्या प्रयोगानंतर रसिक व्यक्त करतात. डॉक्टर हे बिनधास्त होते. कडक होते. स्पष्ट वक्त होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूमिकेवर जीव तोडून प्रेम करायचे. रंगभूमीवर अपार निष्ठा होती.
‘संभाजी आणि डॉक्टर’ हे जणू समिकरणच बनलेले. वसंतराव कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ यात डॉक्टरांना संभाजीची भूमिका मिळाली त्याचे त्यांनी अक्षरशः सोने केले. कॉलेजात ‘वेड्याचं घर उन्हात’ या नाटकात डॉक्टरांनी दादासाहेबांची भूमिका केली होती. तो प्रयोग साक्षात ग. दि. माडगूळकरांनी बघितला होता. त्यांनीच डॉक्टर संभाजी शोभून दिसतील असे सांगितले आणि रायगडाला संभाजी मिळाला. या नाटकाच्या यशानंतर डॉक्टरांनी नाशिकला कानेटकरांच्या घरी काही दिवस तळ ठोकला. संभाजी राजांच्या उत्तर आयुष्यावर नाटक लिहिण्याचा त्यांचा आग्रह होता. अखेर त्यातून कानेटकरांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक लिहिले. नाट्यसंपदेतर्फे १९६८ च्या सुमारास पुन्हा :संभाजी’ रसिकांनी बघितला. जो अप्रतिमच अभिनयाचा कळसच गाठला. नाट्यसंहितेच्या एका प्रतीवर नाटककार कानेटकरांनी ‘टू माय डियर संभाजी’ असे लिहिले. आणि डॉक्टरांच्या संभाजीवर शिक्कामोर्तबही केले.
डॉक्टरांनी विविध भूमिका रंगभूमीवर केल्या. नाटक एका उंचीवर पोहचविले. संगीत नाटकातून गद्य नाटकांकडे रसिकांना आणण्यात एक समर्थ नट म्हणून डॉक्टर नंबर वन ठरले. केवळ देखणा चेहरा इतपतच त्यांचे नायकत्व नव्हते तर जीव ओतून भूमिकेत शिरण्याची तयारी असायची. भिडे म्हणतात, ‘डॉक्टरांच्या आयुष्यात नाटक हे जसं अतुट नातं होतं, तशी रंगभूमीची पूजा ही डॉक्टरांच्या आयुष्यात अतूट होती. पूजा नाही तर, नाटक नाही. पूजा नाही तर, डॉक्टर नाहीत. डॉक्टर ज्या ज्या नाटकात काम करत त्या नाटकात एक खास माणूस ठेवलेला असे. तो स्टेज सजवून साहित्य मांडून पूजेची पूर्वतयारी करायचा आणि डॉक्टरांना पूजेला चला असं सांगायचा. नटराजावर असणारी श्रद्धा, भक्ती याचे दर्शनच प्रत्येक त्यांच्या प्रयोगाच्या प्रारंभी नजरेत भरायचे. त्यामुळे वातावरण प्रसन्न बनायचे.
रमेश भिडे यांचे आध्यात्मिक सद्गुरु माधव विठ्ठल लेले उर्फ नानागुरु. यांचा एक किस्सा आहे. लेले यांनी लिहिलेले स्तोत्राचं एक पुस्तक भिडे यांनी डॉक्टरांना एकदा दिले होते. ते डॉक्टरांनी वाचले आणि त्यांच्या भेटीची इच्छा प्रगट केली. ठाण्यातला गडकरी रंगायतनमध्ये ‘मला काही सांगायच’ या नाटकाचा प्रयोग होता, त्यावेळी नेहमीप्रमाणे प्रयोग हाऊसफुल्ल. तिकीट न मिळाल्याने शेकडोजण परत निघालेले. दोन खुर्च्या गुरुवर्य नानांसाठी डॉक्टरांनी मॅनेज केल्या. रंगभूमीवर डॉक्टरांनी नानांना विचारले, ‘माझा शेवट काय असेल?’ ऐन पन्नाशीत ज्याच्या नावावर हाऊसफुल्ल बुकिंग आहे, त्याचा हा प्रश्न अंगावर काटा उभा करणारा होता. नानांनी तत्काळ उत्तर दिलं. जे अर्थपूर्ण आणि बोलकं होतं. नाना म्हणाले, ‘डॉक्टर तुमचा शेवट हाउसफुल्ल असेल!’ त्यावर डॉक्टरांना चेहरा फुलला. त्यांना आनंद झाला. फार्मात असतानाही ‘माझा शेवट काय?’ हा डॉक्टरांचा सवाल खूप काही सांगून जाणार होता. आत्मचिंतन करणारा आणि जमिनीवर असल्याचा दाखविणाराही.
‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे मराठी रंगभूमीवर एकमेव ठरलेत, हेच खरे!
– संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com






