“जे. बी. वॉटसन” यांनी १९२४ च्या सुमारास वर्तनवादाविषयी लिहायला, प्रयोग करायला, व्याख्यान देण्यास सुरुवात केली. अर्थातच, त्यावेळेस प्रचलित असलेला संरचनावाद व फ्रॉइड यांचा मनो-विश्लेषणवाद किंवा सिद्धांत त्यांना चांगलाच परिचित होता. परंतु त्यांच्या स्वतःच्या काही भावनिक संघर्षांमुळे, ते मानवी भाव-भावनांचा कधीच विचार व स्वीकार करू शकले नाहीत. त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व एका अर्थाने दुभंग असे होते. “मन” अशी काही चीज अस्तित्वात असते, हेच मुळात त्यांना तपासून पहावेसे वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी संरचनावादी व मनोविश्लेषणवादी यांच्यावर बऱ्यापैकी टीका केली. पुढे जाऊन त्यांनी असे मांडले की, “मानसशास्त्र हे जर का, शास्त्र म्हणून गणले जायचे असेल तर आपल्याला निरीक्षण, मोजमाप, प्रयोग, पुर्नप्रयोग या सर्व गोष्टींच्या कक्षेमध्ये राहणे अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना शास्त्र असण्याची ती पूर्व अट आहे.” त्यामुळेच मानसशास्त्राने मन, जाणिवा, अबोधमन, संज्ञा इत्यादी निरीक्षणापलीकडे असणाऱ्या गोष्टींची हाव न धरता, जे सरळ समोर दिसते, ज्यावर प्रयोग शक्य आहेत, ज्याचे मोजमाप, निरीक्षण करणे शक्य आहे, ज्याला एक प्रकारची सार्वत्रिकता आहे, ज्यात आपण आणि प्राणी एका प्रतलावर आहोत, अशा मानवी वर्तनाचा ध्यास घेणे, हे अधिक श्रेयस्कर आहे, असे ठासून मांडले. त्यामुळेच त्यांचा भर हा प्राणी व मानवी वर्तनाचा, शास्त्रीयपद्धतीने अभ्यास करण्यावर, त्यावर प्रयोग करण्यावर व या प्रयोगांमधून संपूर्ण मानवी जातीला श्रेयस्कर अशा वर्तनप्रणाली सिद्ध करण्यावर होता. मूळात वर्तनवाद हा शब्द वॉटसन यांनी रूजू प्रचलित केला.
“वॉटसन” यांचा एक अतिशय गाजलेला प्रयोग म्हणजे “अल्बर्ट बी” नावाच्या छोट्या मुलावर केलेला प्रयोग. या प्रयोगाद्वारे वॉटसन यांनी अल्बर्टला एका मऊ पांढऱ्या साध्याशा टेडीबेअरची भीती घातली. जेव्हा जेव्हा छोटा अल्बर्ट टेडीबेअरशी खेळायला जात असे तेव्हा, त्याला एका प्रचंड मोठ्या आवाजाचा सामना करावा लागे व त्यामुळे तो मोठ्याने रडत असे. अशा काही ट्रायल्सनंतर अल्बर्ट आधी आवाजाला टेडीबेअरला घाबरायला व त्यामुळे शिकला. भीती व टेडीबेअर यांचे कंडिशनिंग झाले. वॉटसन यांना हाच मुद्दा सिद्ध करायचा होता की, आपल्या अनेक भीतीसुद्धा शिकलेल्या असतात, व त्यांचा अबोध मनातील भावनिक गुंत्याशी, काहीही संबंध नसतो. या प्रयोगानंतर बोलताना पुन्हा एकदा वॉटसन यांनी फ्रॉइडवर यथेच्छ टीका केली. पण या प्रयोगांनंतर काही वर्षांनी वॉटसन त्यांच्यावर अर्थातच, अमानुषपणाचा ठपका बसला व टीका झाली. ते अलाहिदा. त्यांनी प्राण्यांवरही अनेक प्रयोग केले. व त्यावर आधारित सिद्धांत मांडले. वॉटसन यांचे असे खास म्हणणे होते की, “मानवी वर्तन आणि प्राण्यांचे वर्तन अनेक बाबतीत सारखे असते. प्राणी जसे शिकतात; तसेच मनुष्य शिकतो, त्यामुळे प्राण्यांवर अभ्यास करून काढलेले सिद्धांत, हे माणसांनाही लागू होऊ शकतात.”
दुसरे अत्यंत महत्त्वाचे वर्तनशास्त्रज्ञ म्हणजेच “बी. एफ. स्किनर”. जे. बी. वॉटसन प्रमाणेच त्यांना मानवी वर्तन हाच मानसशास्त्राचा केंद्रबिंदू करायचा होता. मानसशास्त्रामधील कोणतीही विचारप्रणाली ही प्रयोगांच्या व निरीक्षणांच्या आधारेच मांडली जायला हवी, असे त्यांचे ठाम मत होते. मन-अबोध, मन-विचार, संज्ञा इत्यादी गोष्टींवर फारसा विचार करू नये, कारण ज्या गोष्टींचे निरिक्षण अशक्य आहे, त्या गोष्टी शास्त्रीय कक्षेत येत नाहीत. वर्तनाचे आपण निरीक्षण करू शकतो, वर्तन प्रणआली अस्तित्वात आहेत असे सिद्ध करू शकतो. “बी. एफ. स्किनर” यांनी संपूर्ण मानवी वर्तन व्यवहार ” एस्. आर” चेतक प्रतिसाद या सर्किटमध्ये आणला. हा सिद्धांत मांडण्यासाठी त्यांनी खूप निरनिराळे नाविण्यपूर्ण प्रयोग केले. या प्रयोगांसाठी खूप वेगवेगळी यंत्रे, उपकरणे व साधने तयार केली. त्यांनी तयार केलेले, “पझल बॉक्स किंवा चक्रव्यूह” हे पुढे “स्किनर बॉक्स किंवा बेबी-बॉक्स” म्हणून प्रसिद्ध झाले. “इव्हान पावलो” यांनी ज्याप्रमाणे अभिजात अभिसंधानाची संकल्पना मांडली, त्याचप्रमाणे बी.एफ.स्किनर यांनी “ऑपरंट कंडिशनिंग”ची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, “एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखादी शिक्षा चुकवण्यासाठी,
मनुष्य अथवा प्राणी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत राहतो व त्यातला जो प्रयत्न फलदायी असतो. त्याला पुढे जायला मदत करतो. तो प्रयत्न, ती कृती त्याच्या चांगलीच लक्षात राहते व तो ती चटकन शिकली जाते. उदाहरणार्थ, पझल बॉक्समधून पटकन बाहेर येऊन, खाऊ खाणे, किंवा कबुतराने चोचीने टेबल टेनिस खेळणे, अशा खूप काही गोष्टी त्यांनी प्राण्यांना शिकवल्या. याच तंत्राचा वापर करून काहींनी मळलेले कपडे डुकराला वॉशिंग मशीनमध्ये घालायला शिकवले होते असे बरेच काही. उंदरांवर मास-बॉक्समध्ये असंख्य प्रयोग केले. स्किनर यांनी एवढे सारे प्रयोग उंदरांवर केले की, लोक विनोदाने म्हणू लागले की, “स्किनरने उंदरांना कंडिशन केले की, उंदरांनी स्किनरला कंडिशन केले हे कोडेच आहे.” या सर्व प्रयोगांवर आधारित स्किनरने, वर्तन सुधारणा (Behavior Modification) म्हणजे वर्तनातील परिवर्तनाचे तत्व मांडले. या तत्त्वाचा, त्याने मनोरूग्णांसाठी, मानसिकदृष्ट्या अपंग, दुर्बळ अथवा व्याधीग्रस्त असलेल्या व्यक्तींना बरे करण्यासाठी वा त्यांच्या परिवर्तनात इष्ट (desirable) बदल आणण्यासाठी अनेक प्रयोग केले. खरे म्हणजे यशस्वीरित्या केले.
वॉटसन व स्किनर यांच्या प्रयोगांनी व त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांनी “शेपिंग अप्रॉक्सीमेशन” अशी उपचार तंत्रे निर्माण केली. एका वाक्यात सांगायचे तर, व्यक्तीचा एखाद्या स्टीम्युलसला, चेतकाला असलेला प्रतिसाद आपण कंडिशन करू शकतो, बदलू शकतो, अधिक श्रेयसकर करू शकतो यावर त्यांचा गाढाविश्वास होता. तो त्यांनी प्रयोगातून सिद्ध केला होता. स्किनर हे प्रथितयश लेखकही होते व त्यांनी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. “वॉल्डन टू” सारखी त्यांची कादंबरी तर खूप गाजली. सर्व मानव जातीचे प्रतिसाद (Responses), श्रेयसकर वागण्यासाठी कंडिशन करून या धर्तीवर स्वर्ग निर्माण करता येईल का? किंबहुना तो येईल अशी काहीशी विचारधारा अधोरेखित करणारी “वॉल्डन टू” ही कादंबरी होती. मूळ थोरोने लिहिलेल्या “वॉल्डन” या कादंबरीचा तो सिक्वेल होता, असे म्हणता येईल. थोरोने निसर्गाला, नैसर्गिक ऊर्मीना प्रचंड महत्व दिले पण स्किनर मात्र चेतक व प्रतिसाद यांना अपार महत्व देत होते. वर्तनवादामुळे एक गोष्ट मात्र नक्की झाली, मानसशास्त्रामध्ये वर्तनाचे व प्रयोगांचे महत्त्व दृढ झाले. एक शास्त्रीय आयाम या अभ्यास शाखेला मिळाला. या दोघांनीही केलेल्या असंख्य प्रयोगातून अनेक उपचार-तंत्रे सिद्ध झाली, जी आजही शिक्षणामध्ये तसेच मानसोपचारांमध्ये खूप प्रभावीपणे वापरली जातात. अर्थातच पुढे जाऊन वर्तनवादालाही टीकेला सामोरे जावे लागले. पण एकूणच या सगळ्या घुसळणीमध्ये “मानसशास्त्र” ही विद्याशाखा अधिकाधिक समृद्ध होत गेली.
– डॉ. सुचित्रा नाईक