भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा उत्सव जल्लोषात, भक्तिभावात आणि सामूहिकतेच्या भावनेत साजरा होतो. हा सण सर्व समाजात आणि घराघरात लोकप्रिय आहे. या उत्सवाचा इतिहास केवळ धार्मिकतेशी जोडलेला नसून, त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक आयामही गुंफलेले आहेत. लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती व जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली.या माध्यमातून सामाजिक एकोपा संघटनात्मक चळवळी तसेच कला व सांस्कृतिक उपक्रम सुरु करण्याचे त्यांचे धोरण होते. महाराष्ट्र शासनाने आता एक पाऊल पुढे टाकत या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव राज्य वैभवी बाण्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सुरु आहे.
टिळकांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय
सन 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्या काळात ब्रिटिश सत्तेखाली भारतीय समाज उभारी घेऊ शकत नव्हता. सामूहिक संघटनेला दडपशाही होती. परंतु टिळकांनी गणेश उत्सव हा घराघरातील कौटुंबिक वातावरणातून बाहेर आणला आणि त्याला सार्वजनिक व्यासपीठ दिले. हा निर्णय केवळ धार्मिक नव्हता तर सामाजिक एकात्मता आणि राजकीय जागृती घडवून आणणारा होता. मंदिरात किंवा घरात मर्यादित राहिलेला आनंद लोकांच्या,समूहांच्या विविध जाती-पंथांच्या मान्यतेला उतरला. उत्सवाचे सार्वत्रिकरण झाले.पुढे हळूहळू समाजाला एकत्र आणणारा हा उपक्रम बनला.
गणेशोत्सवाचे प्रदेशनिहाय स्वरूप
महाराष्ट्रातील विविध भागांत गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. कोकणात हा उत्सव संस्कृतीला उजाळा देणारा असतो. गावी जाऊन कुटुंबासोबत उत्सव साजरा करणे ही कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. नारळी पोर्णिमा ते विसर्जनापर्यंत निसर्ग, समुद्रकिनारे आणि पारंपरिक घरगुती पूजा यामध्ये एक विलक्षण उत्साह व एकोप्याचे वातावरण अनुभवता येते. या भागातील मूळ कला संस्कृतीची जोपासना व सादरीकरण या काळामध्ये केली जाते. विदर्भ, मराठवाड्यात नाटक, कला, संस्कृती, कवी संमेलन आणि विविध गुण प्रदर्शनाचे आयोजन करणारा महोत्सव म्हणजे गणेश महोत्सव नागपूर, अमरावती, चंद्रपूर यांसारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवाला विसर्जन मिरवणुकीला अनेक वर्षाची परंपरा आहे. विदर्भातील अनेक नामवंत व्याख्यानमाला या काळामध्ये आयोजित केल्या जातात.सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वाधिक रेलचेल या काळात असते.
पुण्यातील अनेक ऐतिहासिक गणपती मंडळांना शंभर वर्षांहून अधिक परंपरा आहे. अनेक मानाची मंडळे आजही परंपरेचे जतन करतात. सांस्कृतिक स्पर्धा, नाटकं, कीर्तनं आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम हे वैशिष्ट्य येथे जपले जाते.देश विदेशातील कलाकारांना स्थान देणारे अनेक फेस्टिवल, उत्सव,कार्यक्रम या काळात पुण्यामध्ये साजरे होतात.पुण्यातला गणेशोत्सव बघायला देशभरातून नागरिक या काळात पुण्यामध्ये येत असतात.
मुंबई म्हणजे गणेशोत्सवाचा महासागर, गिरगावातून सुरु झालेला हा सार्वजनिक उपक्रम या महानगराची ओळख झाला आहे. चाकरमान्यांची सुट्टी, बाजारपेठेत वाढलेली उलाढाल आणि कला-उद्योगाला मिळणारी चालना यामुळे मुंबईतील गणेशोत्सवाला खास आर्थिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सिने, नाट्य कलावंतांचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये कला जगताने देखील गणेश उत्सवाला चालना दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील या काळात बाप्पा विराजमान असतात. प्रत्येक सोसायटीत होणारा गणेशोत्सव, सार्वजनिक सहभागाचे आदर्श उदाहरण ठरते. शिवाय सांस्कृतिक देवाणघेवाण आणि देशभराच्या खाद्य संस्कृतीलाही चालना मिळते.
उत्सवाचे स्वरूप : धार्मिकतेपासून वार्षिक आनंदोत्सवापर्यंत
गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पूजा किंवा कर्मकांडामध्ये कोणतीही अनिवार्यता नाही. कोणत्याही जाती, धर्मातील व्यक्ती या उत्सवात सहभागी होऊ शकतात. म्हणूनच हा उत्सव एका धार्मिक मर्यादेपलीकडे जाऊन सामूहिक वार्षिक आनंदोत्सवाचे स्वरूप धारण करतो. दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस, दहा दिवस अशा विविध कालावधीत हा उत्सव आपआपल्या पध्दतीने साजरा केला जातो. शेकडो बाल गणेश मंडळे, सार्वजनिक कार्यक्रमांच्या बिजारोपणासाठी प्रेरणास्त्रोत होऊन जातात. मुलांमध्ये संघटन शक्ती, कला, कौशल्य, नेतृत्व. विकासासाठी हा महोत्सव पुढे येतो. महाराष्ट्रामध्ये घडलेल्या शेकडो कलाकारांना गणेश महोत्सवाच्या व्यासपीठानेच पहिली संधी दिली आहे. हा जागर आताही कायम आहे.
कला, नेतृत्व व समाजप्रबोधनाचे व्यासपीठ
गेल्या शंभर वर्षांत गणेशोत्सवाने हजारो कलाकार, कवी, नकलाकार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, शिल्पकार यांना व्यासपीठ दिले. सामाजिक समस्यांवर देखावे, शैक्षणिक संदेश, पर्यावरणपूरक मूर्ती यांमुळे या उत्सवात जागरूकता आणि प्रबोधन घडते. गणेशोत्सव हे नेतृत्व विकसित करणारी शाळाच म्हणावी लागेल. स्वयंसेवकांचे संघटन, व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन या सर्व गोष्टी किशोरवयातील शाळकरी मुलांना,तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देतात.
महाराष्ट्र शासनाचा निर्णय : राज्य उत्सवाचा दर्जा
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 2025 पासून गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी विधिमंडळात 18 जुलैला या संदर्भातील घोषणा केली आहे. हा निर्णय घेताना राज्य शासनाने सांस्कृतिक कार्य संचालनालय,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव,तसेच प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही कार्य विभागून दिले आहेत.
राज्य शासनाने आपल्या शासन निर्णयात राज्य महोत्सवामध्ये अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाज घटकांना सामाजिक सलोख्यांसाठी एकत्रित आणणे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयाचे जतन व संवर्धन करण्याला प्राधान्य दिले आहे.
राज्य महोत्सव अंतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करण्याचे नियोजनही राज्य शासनाने केले आहे.राज्यस्तरीय सोहळा आयोजित करण्याची जबाबदारी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला दिली आहे.विविध स्पर्धांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पर्यावरणपूरकतेला प्राधान्य :
राज्य महोत्सवामुळे गणेशोत्सवातील विधायकतेला महत्त्व आले आहे.राज्य शासनाने या उत्सवात आपला सहभाग अधिक सक्रिय केल्यामुळे आता ध्वनी, वायू, जल प्रदूषण विरहित परिसर,एक गाव एक गणपती सारख्या उपक्रमाला प्रोत्साहन, या सोबतच पर्यावरण पूरक मूर्ती पर्यावरण पूरक सजावट व आयोजनातून पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाडू मातीच्या मूर्ती, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, हरित उत्सव अशा उपक्रमांना शासनाचे सहकार्य दिले जात आहे.
शिल्पकार, नृत्य, नाटक, संगीत, चित्रकला या क्षेत्रांतील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजना राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत भजनी मंडळांना अनुदान,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या गणेश उत्सवांना प्रोत्साहन हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये जिल्हाधिकारी यांना देखील अधिकार देण्यात आले आहे. गणेश महोत्सवासाठी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहे.यामुळे सर्व गणेश मंडळांशी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिक व्यापक संपर्क होणार असून या महोत्सवाची सार्वजनिकता, सार्वजनिक उपयुक्तता व पर्यावरण पूरकता वाढविण्यात येत आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सवाची परंपरा मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या ओळखीचा आणि अभिमानाचा उत्सव म्हणून गौरविला गेला आहे.
महाराष्ट्राबाहेर गणेशोत्सव कधीकाळी केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला हा उत्सव आज देशभर पसरला आहे.
अनेक देशातही हा महोत्सव पोहचला आहे. कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली अशा ठिकाणी मराठी समाजाच्या प्रेरणेने गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा होतो. विशेष म्हणजे, मुंबई वा पुण्यात राहणारा इतर राज्यातील कामगार, व्यापारी किंवा कर्मचारी हा उत्सव अनुभवतो आणि आपल्या गावी जाऊन त्याची परंपरा नेतो. अशा प्रकारे गणेशोत्सवाने राष्ट्रीय स्तरावर सामूहिकतेचे बंध निर्माण केले आहेत.
लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करून समाजाला एकत्र येण्याचा धाडसी मार्ग दाखवला. त्या छोट्या सुरुवातीने आज दीडशे वर्षांचा प्रवास केला आहे. महाराष्ट्र शासनाने या परंपरेला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे, हे गणेशभक्तांसाठी अभिमानाचे पाऊल आहे. गणेशोत्सव आता केवळ धार्मिक श्रद्धेपुरता न राहता, तो कला, संस्कृती, समाजजागृती, नेतृत्व आणि आर्थिक चैतन्याचा अविभाज्य भाग बनला आहे. टिळकांचा हा वारसा आज राज्याच्या गौरवाचा उत्सव बनला आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा मोरया!