आयआयटीमध्ये एमबीए प्रवेशासाठी कॅट परीक्षेतील गुणांचा उपयोग प्रारंभिक निवडीसाठी केला जातो. याचा अर्थ असा की, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या निवडक उमेदवारांना या गुणांच्या आधारे पुढील टप्प्याच्या प्रवेश प्रकियेसाठी निवड केली जाते. या निवडक उमेदवारांची संख्या ही संबंधित संस्थेतील एकूण प्रवेश संख्येच्या ५ ते १० पट राहू शकते. या उमेदवारांना संस्थेच्या कॅम्पसमध्ये मुलाखत, समूह चर्चा किंवा लेखन कौशल्य चाचणी अशा टप्प्यांसाठी निवडले जाते.
कॅटमधील गुण, दहावी- १२वी- पदवीमधील गुण-मुलाखत/समूह चर्चेतील गुण-कार्यानुभव- इतर कामगिरी अशासारख्या घटकांवरच्या एकत्रित गुणांवर अंतिम निवड केली जाते. प्रत्येक आयआयटीच्या मॅनेजमेंट स्कूलच्या अंतिम निवडीसाठी वेगवेगळ्या अर्हता वापरल्या जातात. त्याची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या एमबीएसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत आणि कॅट परीक्षेत एकूण गुण (पर्सेंटाइल) सोबतच प्रत्येक घटकांमध्ये विशिष्ट गुण मिळणे आवश्यक असते.
(उदा-आयआयटी मुंबईच्या एमबीए प्रवेशासाठी पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. कॅट परीक्षेत किमान ९० टक्के पर्सेंटाईल आवश्यक आहेत. तथापि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड/संख्यात्मक कल चाचणी, व्हर्बल ॲण्ड रिडिंग कॉम्प्रेहेंशन/ इंग्रजी आकलन व शब्द कौशल्य चाचणी आणि डाटा इंटरप्रिटेशन ॲण्ड लॉजिकल रिझनिंग/माहिती विश्लेषण आणि कार्यकारणभाव या तिनही घटकांमध्ये किमान ७५ पर्सेंटाईल मिळणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एकूण पर्सेंटाईल ९० असूनही एखाद्या घटकात ७४ टक्के पर्सेंटाईल असल्यास अर्ज नाकारला जातो.) या सर्वबाबींची माहिती संस्थांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. कॅट परीक्षा दिलेल्या अधिकाधिक महाराष्ट्रीय उमेदवारांनी आयआयटीमधील एमबीए प्रवेशासाठी प्रयत्न करायला हवेत.
उत्कृष्ट सोईसुविधा
आयआयटीच्या कॅम्पसमध्येच एमबीएची संस्था असते. त्यामुळे आयआयटीच्या सर्व पायाभूत सोईसुविधांचा लाभ आणि आयआयटी ब्रँडचाही लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. आयआयटीच्या एमबीए प्लेसमेंटसाठी देशातील नामवंत कंपन्या जात असतात. आयआयटीच्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन- तंत्र-कौशल्याचा लाभ या एमबीए अभ्यासक्रमासाठीही मिळतो.
हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी कायमस्वरुपी उच्च प्रशिक्षित अध्यापक असतातच शिवाय, उद्योग जगतातील नामवंत तज्ज्ञही शिकवायला येतात. विद्यार्थ्यांना हमखास इंटर्नशीपची संधी मिळते. त्यामधून अनेकांना प्री प्लेसमेंट ऑफर म्हणजेच शिकत असतानाचा नोकरीची ऑफर मिळते. सर्वच संस्थांमध्ये १०० टक्के प्लेसमेंट होत असते. या एमबीएचे शिक्षण शुल्कही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटपेक्षा तुलनेने कमी असते. काही विद्यार्थ्यांना ते जास्त वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा विद्यार्थ्यांना सुलभतेने शैक्षणिक कर्ज मिळू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकासोबतच खाजगी क्षेत्रातील बँकाही आयआयटी ब्रँड लक्षात घेऊन विनासायास शैक्षणिक कर्ज देतात. मुलींना व्याजदरात अर्धा टक्के सुट दिली जाते. बहुतेक एमबीए अभ्यासक्रम हे निवासी स्वरुपाचे आहेत. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आयआयटी परिसरातच वसतिगृहाची सुविधा उपलब्ध केली जाते.
(१) आयआयटी मंडीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटमार्फत एमबीए इन डटा सायन्स ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम चालवला जातो. मुलाखती दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकता, बेंगळुरु येथे एप्रिल २०२३ मध्ये घेतल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ फेब्रुवारी २०२३ ही आहे. संपर्क- https://iitmandi.ac.in/SOM/
(२) आयआयटी जोधपूरच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिन्युरशिप मार्फत एमबीए आणि एमबीए – टेक्नॉलॉजी हे दोन अभ्यासक्रम चालवले जातात. अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ फेब्रुवारी २०२३ आहे. संपर्क- iitj.ac.in/schools
(३) आयआयटी मद्रासच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस येथे एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२३ ही आहे. संपर्क-doms.iitm.ac.in
(४) आयआयटी खरगपूरच्या विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२३ ही आहे. संपर्क-som.iitkgp.ac.in
(५) आयआयटी गौहाटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मार्फत एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ फेब्रुवारी २०२३ आहे. संपर्क-iitg.ac/acad/mba
(६) आयआयटी कानपूरच्या इंडस्ट्रिअल ॲण्ड मॅनेजमेंट इंजिनीअरिंग मार्फत एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२३ आहे. संपर्क-iitk.ac.in/ime/mba
(७) आयआयटी रुरकीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मार्फत एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२३ आहे. संपर्क-ms.iitr.ac.in
(८) आयआयटी धनबादच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप मार्फत एमबीए आणि एमबीए-बिझिनेस ॲनॅलिटिक्स हे अभ्यासक्रम चालवले जातात. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२३ आहे. संपर्क-ms.iitr.ac.in
(९) आयआयटी मुंबईच्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमार्फत एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो. संपर्क- som.iitb.ac.in
(१०) आयआयटी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमार्फत एमबीए आणि एमबीए- टेलिकम्युनिकेशन सिस्टिम्स मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम चालवले जातात. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२३ आहे. संपर्क-dms.iitd.ac.in.
सुरेश वांदिले
ekank@hotmail.com