खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण प्रदान कार्यक्रमात किती लोक मृ्त्यूमुखी पडले? हा प्रश्न अनुत्तरित आहे. सरकारने जाहीर केलेला आकडा १४ चा आहे. हे लोक कसे मृत्यूमुखी पडले? या प्रश्नाचे उत्तरही संदिग्ध आहे, असे म्हणता येईल. मृतकांची संख्या आणि त्यांच्या मृत्यूचे कारण याबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे. तसे ते तयार होण्यास सरकारी यंत्रणा कारणीभूत आहे.
मृतांचा आकडा जाहीर करून त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात किंवा चेंगराचेंगरी यापैकी काय आहे, हे जर या यंत्रणेने स्पष्ट केले असते, तर संशयाचे असे मळभ दाटले नसते. परंतु, भर उन्हात कार्यक्रमाचे आयोजन, लाखोंची गर्दी, त्या गर्दीची काहीही सोय नसणे ही चूक कुठेतरी आयोजकांच्या म्हणजेच सरकारी यंत्रणेच्या अंगलट येईल, याची भीती होती.
या भीतीमुळेच काहीतरी लपवा- छपवी सुरु आहे. किमान तसा आरोप करण्याची विरोधकांसाठी जागा निर्माण झाली. सरकारला अडचणीचे ठरणारे काहीतरी घडलेय, काहीतरी चूक झालीय, हे लक्षात येताच मृत्यूचे राजकारण सुरु झाले. सरकारवर टीका होत असतानाच या टीकेची राळ महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरही उडाली.
आप्पासाहेब धर्माधिकारी अर्थात श्रीसदस्यांचे ‘आप्पा स्वारी’ यांचे लाखो अनुयायी आहेत. रामदास स्वामीकृत दासबोधाचे निरुपण करणे हे त्यांचे धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य. गावागावात होणाऱ्या श्रीसदस्यांच्या बैठकी आणि त्यातून त्यांना दासबोधाच्या माध्यमातून केले जाणारे मार्गदर्शन यातून धर्माधिकारी यांचे अनुयायी वाढत गेले. नानासाहेब धर्माधिकारी यांनी या श्री संप्रदायाची स्थापना केली आणि आप्पासाहेबांनी त्यात वाढ केली.
स्वच्छता अभियान, वृक्षरोपण, रक्तदान अशा समाजकार्यासाठी एक हाक द्यायची आणि लाखो श्रीसदस्यांनी सहभाग घ्यायचा, ही या श्री परिवाराची पद्धत. श्रीसदस्यांनी बैठकीत निवेदन ठेवायचे, या निवदेनावर अप्पास्वारींनी आदेश द्यायचा आणि तसेच अनुयायाने वागायचे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा शब्द अनुयायांसाठी ‘आदेश’. यामुळे राजकारणापासून कितीही दूर राहण्याचा प्रयत्न केला तरीही धर्माधिकारी यांच्या रेवदंड्यातील घरी पुढाऱ्यांची ये-जा असतेच.
श्रीसदस्य एकत्रित असल्यामुळे त्यांची राजकीय ताकद किती, हे सुनील तटकरे, जयंत पाटील, अनंत गिते यांच्यासारख्या रायगडातील पुढाऱ्यांनी वेळीच ओळखले. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीसदस्य असल्याचे सांगीतले जाते. यातूनच महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वितरण सोहळा एवढा भव्य करण्याची कल्पना आली असावी.
राज्य सरकारचा कार्यक्रम, केंद्रीय गृहमंत्र्यांची उपस्थिती आणि श्रीसदस्यांची गर्दी असा हा योग महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने जुळून आला. दुर्दैवाने उपस्थितांचे मृत्यू झाल्याने या कार्यक्रमाला गालबोट लागले. या दुर्घटनेस जबाबदार कोण? यावरुन चिखलफेक सुरु आहे. याचे काही शिंतोडे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाजकार्यावरही उडवले जात आहेत. राजकीय आरोप- प्रत्यारोपात धर्माधिकारी यांच्या कुटुंबीयांची ट्रस्ट, त्यांच्या बैठकींची पद्धत, श्रीसदस्यांची निवेदने आणि पूर्वीपार चालत आलेल्या निरुपणावरही बोट उचलले जात आहे.
राजकीय नेतेमंडळींनी थेट आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर टीका केली नाही. मात्र राजकीय आरोपांच्या आडून सोशल मीडियावर धर्माधिकारी आणि श्री परिवारावर जोरदार धुळफेक सुरु आहे. झालेल्या दुर्दैवी घटनेला कोणाला जबाबदार धरावे, असा काहीसा संभ्रम राजकीय मंडळी आणि समाजमाध्यमांमध्ये निर्माण झालेला दिसतो. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार असल्यामुळेच लोक आले, इतकी गर्दी झाली हे खरे.
महाराष्ट्र शासनाने जवळपास १४ कोटी रुपये या सोहळ्यासाठी खर्च केले, पण काहीही व्यवस्था त्याठिकाणी दिसली नाही, हीपण वस्तुस्थिती. भर दुपारी लाखो लोकांना आपण निमंत्रित केले आहे, किंवा लाखो लोक येणार आहेत, याची कल्पना सरकारी यंत्रणेला होती. त्यासाठीच इतक्या मोठ्या मैदानाची निवड करण्यात आली. २० लाख लोकांची उपस्थिती असणार आणि त्याचा आढावा घेतला असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत होत्या. तरीही उष्माघाताने म्हणा किंवा चेंगराचेंगरी होऊन मृत्यू झाले म्हणा… दहा महिला आणि चार पुरुषांचा मृत्यू झाला.
मृत्यू एकटा नसतो, त्याला काहीतरी निमित्त लागतं. या १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूचे निमित्त शोधण्याची अहमहमिका लागली आहे. सरकारी यंत्रणा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केल्यानंतर तातडीने सरकारला दोष आणि दूषणे देण्याची स्पर्धा सुरु झाली. कोणी कारवाईची मागणी केली, कोणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची. कोणाला या घटनेत पालघरातील साधुंच्या हत्याकांडाचे क्रौर्य दिसले, तर कोणाला सरकारचा नाकर्तेपणा. इतक्यावरच हा विषय थांबला नाही.
काहींनी धर्माधिकारी परिवार, त्यांची संस्था आणि त्यांच्या कार्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. समाजमाध्यमांवरील चर्चेला अनेक फाटे फुटले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह प्रत्येकालाच दूषणे देण्याची स्पर्धा सुरु झाली. चेंगराचेंगरी झाली आणि ५० भाविकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जाऊ लागला. असे दावे प्रतिदावे वाढत जातील, कारण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, अशी भावना या घटनेनंतर झाली. धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी हा नवा विषय नाही. मंतरलेले रुद्राक्ष मिळणार म्हणून लाखो भाविकांनी केलेली गर्दी आणि त्यातील चेंगराचेंगरीचे वृत्त अद्याप विस्मरणात गेलेले नाही.
अनेक देवस्थानांमध्ये होणाऱ्या गर्दीत भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अव्यवस्था आणि त्यामुळे घडलेला अपघात असाच या घटनांचा उल्लेख करावा लागेल. मृत्यूला लागणारे कारण म्हणून अव्यवस्थेला, ढिसाळ नियोजनाला जबाबदार ठरवावे लागेल. भाविकांचा अंधविश्र्वास, लाखो लोकांची श्रद्धा, त्यामाध्यमातून स्थापन होणाऱ्या, मोठ्या होणाऱ्या धर्मसत्ता, राजकीय सत्ता हे सगळे विषय स्वतंत्रपणे चर्चेला यायला हवेत.
उपस्थितांच्या मृत्यूबाबत वस्तुस्थिती लपवली गेली तर विविध आरोपांमध्ये वाढ होईल. एकमेकांना खूप दूषणे दिली जातील. महाराष्ट्र भूषण पुरस्काराला या घटनेत १४ श्रीसदस्यांचा मृत्यू हा ढिसाळ नियोजनामुळे घडलेला अपघात असे म्हणायला हवे. अर्थात या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेच्या आडून सरकारला, धर्माधिकारींच्या कामाला आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारालाच दूषणे देणाऱ्यांनी या समितीचा निष्कर्ष येईपर्यंत किमान कळ सोसायला हवी.
विशाल राजे
vishalvkings@gmail.com