कुटुंबाने, समाजाने आखून दिलेली चौकट मोडत सौंदर्य आणि पीळदार शरीरयष्टी यांचा मिलाफ असलेल्या महिलांच्या ‘मॉडेल फिजिक’ शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरण्याचा डॉ. मंजिरीचा प्रवास सुरू झाला तो मातृत्वानंतर. मातृत्वाचा आनंद घेतानाच वाढलेले वजन आणि थायरॉइड्सचा त्रास यामुळे आपणच आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, या एकाच हेतूने मंजिरीने त्वरित व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी शरीरसौष्ठव क्षेत्रात यायचे असा कोणताही विचार मंजिरीच्या मनातदेखील नव्हता.
व्यायामशाळेत प्रशिक्षण घेतानाच वजनवाढीसंदर्भात ४५ दिवसांचा एक विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला होता. या माध्यमातून योगा, नृत्य तसेच वजनात वाढ किंवा कमी करण्यासाठी आहार योजना असे जे विविध उपक्रम घेण्यात आले, त्याचे मंजिरीने काटेकोरपणे पालन केले. याचा फायदा होऊन तिला तिच्यात उत्तम मानसिक आणि शारीरिक बदल घडून आल्याचे लक्षात आले आणि इथूनच तिच्या अतिशय वेगळ्या अशा कारकीर्दीला सुरुवात झाली.
याविषयी मंजिरी म्हणाली, ‘‘या ४५ दिवसांत मला माझ्या शरीरात खूप बदल दिसले. जसे सिक्स पॅक ॲब्स असतात, तसे मला फोर पॅक्स ॲब्स आले होते. त्यामुळे या सगळ्याला माझे शरीर खूप उत्तम प्रतिसाद देते आहे, हे माझ्या लक्षात आले आणि मला खूप छान वाटले. मुली शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरतात, हे मी ऐकून होते. मग मी शरीरसौष्ठवच्या अनेक स्पर्धा पाहिल्या. माझ्या पतीचाही यासाठी मला भक्कम पाठींबा आणि सहकार्य मिळाले. त्यामुळे आपणही हा प्रयत्न करावा असे मनापासून वाटले आणि मी शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरायचे निश्चित केले.”
मालेगावमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जडणघडण झालेली मंजिरी लहानपणापासून ‘सातच्या आत घरात’ अशा कडक वातावरणात तसेच वेशभूषेच्या बाबतीतही कडक बंधनात वाढली होती. त्यामुळे या स्पर्धेत मंजिरीने उतरायचे ठरवले खरे; पण प्रत्यक्षात हे अमलात आणणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. सुरुवातीला बिकिनीसारख्या अल्पवस्त्रात स्टेजवर कामगिरी करणे, यासाठी तिला स्वतःलाही मनाची तयारी करावी लागली. तसेच माहेरच्या, सासरच्या आणि नातेवाईकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. मात्र, सगळ्यांचा होणारा विरोध डावलून मोठ्या धाडसाने मंजिरीने आपल्या पतीच्या साथीने पुढे पाऊल टाकले.
आपल्या मनाची ठामपणे तयारी झाल्यावर मंजिरीने एका खाजगी प्रशिक्षकाद्वारे शरीरसौष्ठवमधील ‘मॉडेल फिजिक’ या विभागासाठी योग्य प्रशिक्षण घेतले आणि २०१७साली ती पहिल्यांदाच शेरू क्लासिक स्पर्धेत सहभागी झाली. मात्र या स्पर्धेकडे तिने स्पर्धा म्हणून न पाहता एक अनुभव म्हणून पाहिले.
शरीरसौष्ठव स्पर्धेमधील ‘मॉडेल फिजिक’ या विभागात बिकिनी घालणे, मॉडेलसारखे दिसणे, बारीक असूनही पीळदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करणे, त्वचा चमकदार असणे, सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे, सुंदर दिसणे आणि उत्तम सादरीकरण या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. परंतु लहानपणापासूनच नृत्य, अभिनय, सौंदर्यभूषा या सगळ्याची आवड असलेल्या मंजिरीने हे सगळे खूप आवडीने आत्मसात केले. व्यासपीठावरील या पहिल्या अनुभवानंतर मंजिरीने आहार, उत्तम प्रशिक्षण याकडे काटेकोरपणे लक्ष देत अधिक जोमाने तयारी केली.
२०१८ मध्ये भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेत मंजिरी चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरली. याच वर्षी तिने ‘मिस तळवलकर क्लासिक’ स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले. याचप्रमाणे पुण्यात झालेल्या ‘मिस आशिया’ स्पर्धेत कांस्यपदक मिळवत उत्तम कामगिरी केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावत आपल्या देशाचे नाव उंचावणाऱ्या मंजिरीच्या या क्षेत्रातील कर्तृत्वाची दखल प्रसारमाध्यमांकडून घेतली गेली. भारताचा झेंडा फडकवतानाचा वर्तमानपत्रातील मंजिरीचा फोटो पहिल्यानंतर मात्र तिचे आई-वडील, भाऊ, मामा, सासु-सासरे तसेच नातेवाईकांचा विरोध मावळला आणि त्याची जागा अभिमानाने घेतली.
२०१८ मध्ये थायलंड येथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या आठ दिवस आधीच मंजिरीच्या आईचे अचानक निधन झाले होते. हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. या स्पर्धेत तिने उत्तम कामगिरी करावी अशी आईची इच्छा होती. त्यामुळेच हे दुःख पचवत तिने स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि आईची इच्छा पूर्ण करीत पाचवा क्रमांक प्राप्त केला.
पुढेही मंजिरीच्या यशाचा आलेख सतत उंचावतच गेला आणि २०१९मध्ये तिने ‘मिस मुंबई’ आणि ‘मिस महाराष्ट्र’ हे किताब पटकावले. आपल्या या प्रवासाविषयी मंजिरी म्हणाली, ‘‘बाहेरून हे सगळे मोहक वाटत असले तरी त्यामागे प्रचंड मेहनत घ्यावी लागते. हा आहार घेऊन कधीकधी कंटाळा येतो. शरीराला कोणता आहार योग्य ठरेल, याकडे लक्ष ठेवावे लागते. समारंभात खाण्यावर बंधने ठेवावी लागतात. तासनतास व्यायाम करावा लागतो. खूप वेळेला शरीर खूप दुखत असते तरी कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते.’’
मालदीव येथे होणाऱ्या आगामी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघात मंजिरीची निवड करण्यात आली आहे. डॉ. मंजिरीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा!
अनघा सावंत
anaghasawant30@rediffmail.com