रोहित शर्माने भारताच्या मावळत्या कप्तानाचे म्हणणे खूपच मनावर घेतलेले दिसते. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने अफगाणिस्तानविरुद्ध एक वेगवान शतक झळकाविले. मग पाकिस्तानविरुद्ध ६३ चेंडूत ८६ धावा फटकाविल्या. गुरूवारी पुण्यात त्याने बांगलादेशविरुद्ध सामन्यातही फटक्यांचे भेंडोळे सोडले होते. ४० चेंडूतील ४८ धावांची त्याची फलंदाजी चाहत्यांसाठी अल्पजीवी ठरली. चाहत्यांना अपेक्षाभंगाच्या दु:खातून मग कोहलीने नाबाद शतक झळकावून बाहेर काढले. शुभमन गिलदेखील अर्धशतकी खेळी करून गेला.
भारतीय क्रिकेट संघ सध्या यशाच्या अश्वावर स्वार झालाय. भारतीय फलंदाजांची आघाडीची फळी आणि रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकी गोलंदाजीचे अश्व सध्या चौखूर उधळताहेत. सध्या तरी भारतीय संघासाठी सारं काही आलबेल दिसत आहे. भारतीय संघाच्या या अश्वमेधाला आव्हान देण्याचे सामर्थ्य सध्या तरी अन्य संघांमध्ये दिसत नाही.
याचे प्रमुख कारण म्हणजे, भारतीय खेळपट्ट्यांचा आपला अभ्यास यावेळी अचूक आहे. खेळपट्टीच्या अभ्यासात तसे आपण कधीच चुकतही नाही. त्यामुळे कुणाला, कधी, कोणत्या सामन्यासाठी निवडायचे याचे सारे अंदाज-आडाखे बरोबर ठरताहेत.
खेळपट्टीपेक्षाही भारतीय संघांने कुकाबूरा या या स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या चेंडूचा अभ्यास व्यवस्थित केलाय. हा कूकाबूरा चेंडू पहिल्या २० ते २५ षटकांपर्यंत फलंदाजीसाठी अधिक अनुकूल असतो. कारण तो बॅटवर व्यवस्थित येतो. फटके मारण्यासाठी योग्य असतो. सहसा फटके चुकत नाहीत. मात्र एकदा का तो ‘सॉफ्ट’ झाला, नरम पडला की मग फटके मारणे कठिण होते. मोठी धावसंख्या काढायची असली तर खेळपट्टीवर नव्याने येणाऱ्या फलंदाजाला मोठे फटके खेळणे अवघड होऊन जाते.
भारतीय संघाने मग काय आखणी केली आहे ते आता पाहा. पाकिस्तानविरुद्ध हीच आखणी करून भारतीय फलंदाज मैदानात उतरले होते. त्यांनी ठरविले होते की पहिल्या २५ षटकात अधिकाधिक धावा फटकावून काढायच्या. फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा धोका पत्करायचा. त्याचा लाभही झाला. रोहितची ६३ चेंडूतील ८६ धावांची खेळी, हा त्याचा डावपेचांचा एक भाग होता. एकदा का आवश्यक धावांची सरासरी खाली आली, की मग नंतरच्या फलंदाजांना दडपणाशिवाय खेळता येईल. एवढे सोपे गणित होते.
चौथ्या लढतींपर्यंत तरी भारतीय संघ या डावपेचांमध्ये यशस्वी ठरला. आता २२ ऑक्टोबरला सामना आहे, धूर्त आणि चलाख अशा न्यूझीलंड संघाशी. हा सामना आहे धरमशाला येथील, अंदाज न बांधता येणाऱ्या खेळपट्टीवर. शिवाय भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या तोडीस तोड फिरकी गोलंदाजही न्यूझीलंडकडे आहेत. वेगवान गोलंदाजही आहेत. नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा आहेच. पण निसर्गाचा वरदहस्त देखील निर्णायक ठरणार आहे. निसर्ग कुणावर कधी कृपादृष्टी ठेवतो यावरच यंदाच्या विश्वचषकातील दोन बलाढ्या संघांमधील सामना निकाली ठरणार आहे.
यंदाच्या विश्वचषकात भारत विजेता व्हायला अडचण नाही. कारण भारतीय संघांनी स्वगृही होणाऱ्या विश्वचषकासाठी डावपेच आखणीत नवे बदल केले आहेत. भारताचा हा नवा दृष्टीकोनच भारताला आपल्या तिसऱ्या विश्वचषक विजेतेपदापर्यंत नेणार आहे. याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम भारताने आयोजित केलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या हंगामाचा विचार करूया. पावसाळा सरण्याआधी परंतु ऑक्टोबर उष्णतेच्या कालावधीत या विश्वचषक स्पर्धेचे ४८ पैकी ३१ सामने ऑक्टोबरपर्यंत असतील. या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या विजेतेपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असणाऱ्या प्रमुख संघांना त्यानंतर भारताचे प्रतिस्पर्धी असणार आहेत आशिया खंडातील पाकिस्तान व श्रीलंका हे दोनच देश. त्यापैकी संघ बांधणी होत असलेल्या श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका आरंभीच बसला. कप्तानासह हा संघ दुखापतींमुळे दुबळा झाला.
उष्णतेचे चटके सहन करणारा आघाडीचा संघ आहे ऑस्ट्रेलियाचा. या संघाला भारतात फिरक्या खेळपट्ट्यांवर त्यांचा आधार असलेल्या फिरकी गोलंदाज ॲडम झम्पा याला पाठीच्या स्नायूची दुखापत झाली आहे. त्याला आपली लाईन आणि लेंग्थ पुन्हा मिळविण्यासाठी तब्बल तिसऱ्या सामन्यापर्यंत वाट पहावी लागली. झम्पाच्या श्रीलंकेविरुद्ध सामन्यातील चार बळींमुळे ऑस्ट्रेलियाने यंदांच्या विश्वचषकातील पहिला विजय नोंदविला होता.
न्यूझीलंड संघाने ऑक्टोबर उष्णतेचा कसा सामना करायचा याची पूर्वतयारी चांगली केली होती. क्रिकेटच्या सरावाबरोबरच भारतातील उष्णतेवर कशी मात करायची याच्या सर्व उपाय योजना त्यांनी केल्या होत्या. इंग्लंड संघ मात्र याबाबतीत कमनशिबी इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध सलामीची लढत अहमदाबादमध्ये गमावली. बांगलादेशला त्यांनी नंतरच्या लढतीत हरविले खरे परंतु नवशिक्या अफगाणिस्तानाविरुद्ध दिल्लीतील सामना त्यांनी अनपेक्षितरित्या गमाविला.
ज्या दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आणि श्रीलंकेला हरवून पहिल्या दोन सामन्यात दणकेबाज विजय मिळविले होते त्याच दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या हॉलंडविरुद्ध सामना गमाविला आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलाच; पण विश्वचषकातही अनिश्चितता निर्माण केली.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुबळ्या संघाविरुद्धच्या पराभवांमुळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांना स्पर्धेत पुन्हा आपले स्थान बळकट करण्याची संधी मिळते.
या स्पर्धेच्या पहिल्या तीन ते चार सामन्यांनंतर प्रत्येक संघांची ताकद हळूहळू स्पष्ट व्हायला लागली आहे. पाकिस्तान संघाला दुखापतींचा फटका बसला असला तरीही त्यांची फिरकी गोलंदाजीची धार पूर्वीच्या पाक संघांप्रमाणे नाही हेही स्पष्ट झाले आहे. शाहीन आफ्रिदी हा वासिम अक्रम नव्हे हे देखील सर्वांना कळून चुकले आहे.
फलंदाजी हा पाकिस्तानचा कधीच बालेकिल्ला नव्हता. मात्र आपल्या फलंदाजीपेक्षाही संघांचा भार पाकिस्तानची वेगवान व फिरकी गोलंदाजीच आत्तापर्यंत उचलत आली होती. विद्यमान पाकिस्तानच्या संघांची ती क्षमता नाही हे देखील हळूहळू जाणवायला लागले आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी अशा अवस्थेत असताना ही गोष्ट भारतीयांच्या पथ्थ्यावरच पडणारी आहे. क्रिकेटच्या मैदानावरील क्षमतेपेक्षाही पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांच्या मानसिक दडपणामुळे दबावाखाली असलेल्या भारतातील ही गोष्ट लाभदायकच आहे. पाकिस्तानविरुद्ध लढत जिंकली असली तरीही पाकिस्तानची या विश्वचषकातील वाटचालीवर भारतीय संघाची सतत नजर असणार आहे. पुन्हा बाद फेरीत त्यांच्याशी गाठ पडणार नाही, या गोष्टीची खात्री झाल्यास भारतीय संघ अन्य प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध देखील तणावरहीत खेळेल.
– विनायक दळवी