ऋषी कपूर अर्थात चिंटूची कारकीर्द कलरफुल. त्यातील काही रंग असे, राज कपूर ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) ची निर्मिती करीत असतानाची गोष्ट. या चित्रपटातील आपल्या शालेय वयातील भूमिका आपला मुलगा ऋषी अर्थात चिंटूने (जन्म ४ सप्टेंबर १९५२) साकारावी अशी त्याची इच्छा होती. तसा त्याने एकदा आपल्या कपूर काॅटेजमधील डायनिंग टेबलवर जेवता जेवता आपली पत्नी कृष्णा यांच्याकडे विषय काढला.
चिंटूदेखील त्यावेळी जेवत होता, पण आपण यातील काही ऐकत नाही अशीच पोझ त्याने घेतली. आपल्या आईने पप्पांना होकार देताच त्याने भरभर आपले जेवण संपवले आणि तो जवळपास धावतच आपल्या रूममध्ये गेला, त्याने लेटर पॅड काढला आणि भराभर साईन केल्या. उद्या आपण स्टार झाल्यावर आपल्याला अशा पध्दतीने स्वाक्षरी करावी लागेल याची सवय असावी म्हणून तो ही प्रॅक्टिस करीत होता. तसे त्याने आपल्या पित्याच्या दिग्दर्शनातील ‘श्री ४२०’मध्ये (१९५५) मधील प्यार हुआ इकरार हुआ या पावसातील गाण्यात अगदी दोन अडीच वर्षांचा असताना छोटंसं काम केले आहे. ‘जोकर’च्या अभिनयासाठी त्याला बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार त्याने आपल्या आजोबांना (पृथ्वीराज कपूर) दाखवला तेव्हा त्यांना आलेल्या आनंदाश्रूंनी चिंटू गडबडला. त्याला वाटले काही चूक वगैरे झाली की काय.
तेवढ्यात आजोबा म्हणाले, ‘राज ने मेरा कर्जा उतार दिया तुझपर… घरचे प्राॅडक्सन्स आर. के. फिल्म आणि पित्याच्याच निर्मित व दिग्दर्शित ‘बाॅबी’ (७३) तून चिंटूची यशस्वी रोमॅन्टिक सुरुवात असली तरी डिंपल कपाडिया ‘बाॅबी’च्या रुपात जास्त भाव खाणारी ठरली. ‘बाॅबी’ हिट तरी चिंटूला नवीन चित्रपट स्वीकारताना त्याची नायिका कोण हा काही काळ प्रश्नच होता. चित्रपटाच्या जगात यश हेच हुकमी नाणे असले तरी कधी ते प्रश्न घेऊनही येते. हेमा मालिनी, रेखा, राखी, जया भादुरी, झीनत अमान त्याला सूट होत नव्हत्या. त्याच्या वयाला जास्त सूट झाली नीतू सिंग आणि मग काही वर्षातच तीच त्याची जीवनसाथी झाली… सिनेमा ‘जहरिला इन्सान’ रसिकांनी पूर्णपणे नाकारला.
एका साऊथच्या फिल्मच्या या रिमेकमध्ये मौशमी चटर्जी दुसरी नायिका होती. चिंटू फिल्म इंडस्ट्रीत आला असताना राजेश खन्नाची जबरा क्रेझ असली तरी अमिताभ बच्चनच्या रुपाने ॲन्ग्री यंग मॅनचे पाॅवरफुल वादळ एकीकडे घोंघावत होते; तर अशातच मल्टी स्टार कास्ट चित्रपटाचे युग संचारत होते. चिंटूची पर्सनॅलिटी लव्हर बाॅयची (खेल खेल मे सुपर हिट), पण पडद्यावर ॲक्शन हीरो फाॅर्मात होता (बारुदमध्ये त्याने तो साकारला. पण शोभला नाही). ‘कभी कभी’च्या सेटवर बीग बीने ‘मोलाचा सल्ला’ दिला, दोन अथवा तीन/चार नायकांच्या चित्रपटात भूमिका साकारत रहा. चिंटूच्या ते पत्थावर पडले (अमर अकबर ॲन्थनी, नसीब वगैरे). आणि त्याची दुहेरी वाटचाल सुरु झाली.
कधी सोलो हीरो (रफू चक्कर, राजा, लैला मजनू, हम किसीसे कम नही, धन दौलत, झूठा कही का, सरगम, कर्ज, प्रेम रोग वगैरे) कधी दोन तीन हिरोंचे चित्रपट (दुसरा आदमी, नसीब, कातिलो के कातिल, कुली, सागर वगैरे) असे होत राहिले. असा खेळ मांडला असतानाच नीतू सिंगसोबत पिक्चर आणि प्रेम असे दोन्ही व्यवस्थित सेट झालं आणि २२ जानेवारी १९८० साली त्यांनी लग्न केले तेव्हा त्याना आशीर्वाद द्यायला सुनील व नर्गिस हे दत्त दाम्पत्य आल्याची बातमी झाली. अशा वेगळ्याच गोष्टीची आठवण कायमच हवीहवीशी. लग्नानंतर काही वर्षांतच रणबीर आणि रिधिमा यांचा जन्म झाला.
चिंटूने आपल्या फिल्ममधून काही स्टाईल आणल्या. रंगबिरंगी स्वेटर, जॅकेटस, बेल बाॅटम, स्टाईलीश बूट. त्यातही त्याच्या कलरफुल स्वेटरची सत्तरच्या दशकातील तरुणाईत जबरा क्रेझ होती. यासह शोमा आनंद (बारुद), रंजिता (लैला मजनू), काजल किरण (हम किसीसे कम नही), जयाप्रदा (सरगम), झेबा बख्तियार (हीना) अशा अनेक नवतारकांनी चिंटू कपूरची नायिका होत चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. कोणी यशस्वी ठरले. कोणी नाही. त्याने आपल्या वर्षा उसगावकर व अश्विनी भावेसोबत ‘हनिमून’ चित्रपट केला. या चित्रपटाच्या सेटवर मीही दोनदा गेलो.
एकदा चिंटूशी भेटही झाली. वर्षा उसगावकरने आवर्जून तेव्हा त्याची ओळख करुन दिली. आपले दृश्य झाले की एका बाजूला जाऊन बसण्याची त्याची वृत्ती हनिमून, शेषनाग, नगिना, अनमोल या चित्रपटाच्या सेटवर शूटिंगच्या रिपोर्टिंगच्या वेळी अनुभवले. अनेकदा तरी तो मीडियापासून अंतर ठेवण्यातच विशेष रस घेई. या एकूण प्रवासात आपल्या पित्याच्या दिग्दर्शनात बाॅबी आणि प्रेम रोगनंतर ‘हीना’मध्ये पुन्हा नायक साकारायची संधी मिळाली पण राज कपूरच्या निधनानंतर रणधीर कपूरने याचे दिग्दर्शन केले. झेबा बख्तियार व अश्विनी भावे अशा दोन नायिका यात आहेत.
त्याने बॉबी, सरगम, हीना, दामिनी, चांदनी, बोल राधा बोल, साजन का घर अशा नायिकाप्रधान चित्रपटातही भूमिका साकारली हे विशेष उल्लेखनीय. असं करायला लागणारे व्यावसायिक धाडस त्याच्यात होते. राजेन्द्रसिंग बेदी यांच्या पंजाबी लोककथेवरच्या सुखवंत दड्डा दिग्दर्शित ‘एक चादर मैली सी’ या चित्रपटात भूमिका साकारली. ‘दीवाना’पासून चिंटुने हीरोगिरीपासून थोडी फारकत घेतली. यात क्लायमॅक्सला दिव्या भारती शाहरूखची होते असे दाखवले. गाण्यातील चिंटू ही खूपच मोठा रंगतदार गोष्ट आहे. मै शायर तो नही (बाॅबी) पासून बरीच हिट गाणी त्याने पडद्यावर खुलवलीत.
‘कपूर’ असल्याने गीत संगीत व नृत्य यांचा कान, दृष्टी, वास चांगलाच. ‘बाॅबी’चे मै शायर तो नही या गाण्यासाठी त्याने आयुष्यात पहिल्यांदाच अभिनय केला. आर. के. स्टुडिओत या गाण्याचे शूटिंग असताना ऋषी कपूरने राज कपूरचा तेव्हाचा सहाय्यक दिग्दर्शक राहुल रवैल याला विचारले की, नृत्य दिग्दर्शक कोण आहे? तेवढेच मला गाणे साकारणे सोपे जाईल. यावर राहुल रवैलने म्हटलं कोणीही नाही. राज कपूरने तर आपल्यातील दिग्दर्शक जागा ठेवतच म्हटले, एखादा नृत्य दिग्दर्शक ठेवला तर तो तुला अन्य स्टारसारखी स्टाईल देणार. म्हणजे एक प्रकारची ती नक्कलच असणार. मला तसे नको. तुला जमेल तसं गाणे सादर कर तो तुझा ओरिजिनल अभिनय असेल. ऋषी कपूरने तेच केले आणि गाणे रंगले. काही वर्षांनी ‘कर्ज’साठी दर्द ए दिल दर्द ए जिगर गाण्याच्या शूटिंगच्या वेळीही सेटवर नृत्य दिग्दर्शक नव्हता.
दोन दिवसाच्या शूटिंगनंतर ऋषी कपूरने दिग्दर्शक सुभाष घईला सांगितले की, नृत्य दिग्दर्शक हवा. म्हणजे मला पडद्यावर गाणे कसे असेल याची कल्पना येईल. यावर घईने म्हटले, त्याची काही गरज नाही, माझ्या सूचना योग्य व व्यवस्थित आहेत. आपण गाण्याचे शूटिंग पूर्ण झाल्यावर रश प्रिन्ट पाहू आणि काय तो निर्णय घेऊ… सुभाष घईचा आत्मविश्वास योग्य होता असा प्रत्यय चिंटूला आला. करियर पुढे सरकताना धाकटा भाऊ राजीवच्या दिग्दर्शनात ‘प्रेमग्रंथ’ (नायिका माधुरी दीक्षित) मध्ये नायक साकारला. स्वतः चिंटूने ‘आ अब लौट चले’चे (१९९९) दिग्दर्शन करताना पडद्यावर येणे टाळले. राजेश खन्ना व मौशमी चटर्जी असे सीनियर आणि अक्षय खन्ना व ऐश्वर्या राय अशी नव्वदच्या दशकातील जोडी जमवली.
सेकंड इनिंगमध्ये चिंटूला विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या ते गुणवत्तेच्या आधारावर. अग्निपथ (रौफ लाला), दो दुनी चार (संतोष दुग्गल), औरंगजेब (डीसीपी रविकांत), कपूर ॲण्ड सन्स (अमरजित कपूर). तसेच ‘१०२ नॉक आऊट’मध्ये खूप वर्षांनी बीग बीसोबत भूमिका केली. ‘राजमा चावल’ या वेबसिरिजमधे भूमिका साकारली. आपल्या मोकळ्या ढाकळ्या बेधडक बिनधास्त स्वभावानुसार त्याने ‘खुल्लम खुल्ला अनसेन्साॅर्ड’ असे आत्मचरित्रही लिहिले.
आर. के. स्टुडिओ विक्रीची बातमी आपण छातीवर दगड ठेवून घेतला आहे हे मीडियाला सांगण्याची जबाबदारी त्यानेच पार पाडली. अशातच त्याला कर्करोगाचे निदान झाले. अगदी अमेरिकेत जाऊन उपचारही केले. तरीही ३० एप्रिल २०२० रोजी त्याचा ‘शो’ संपला. ‘द बाॅडी’ हा त्याचा शेवटचा चित्रपट. चित्रपट माध्यम व व्यवसायाबाबतचे त्याचे तत्वज्ञान वेगळे होते. तो म्हणायचा, मी एखाद्या खेळाप्रमाणे सिनेमात काम करतो. आपली ही फूटबॉलची टीम आहे. आपल्या प्रत्येकाला बाॅल सरकवत गोल करायचा आहे… चिंटूने कायमच सेटवरचे तंत्रज्ञ आणि कामगार यांच्याशी छान नाते निर्माण करत वाटचाल केली… काही चित्रपटांचा क्लायमॅक्स ॲन्टी असतो तसेच त्याचे झाले. त्याच्या आयुष्याचे रिळ मध्येच तुटले हे दुर्दैव!
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com