दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेप्रमाणं अमृतपाल सिंग वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत होता. अमृतपाल सिंगला धार्मिक भावनांशी खेळण्याची कला अवगत होती. भारतात अशा लोकांची एक मोठी यादी आहे, जे विविध धर्म, समुदाय, जाती किंवा विभागाच्या भावनांना शस्त्र बनवून त्यांचा आधार बनवतात. मग पुढं त्याच पाठबळामुळं असे लोक एकतर खूप मोठे माफिया बनले आहेत किंवा समाजातील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारात गुंतलेले दिसतात. या क्रूर खेळात प्रत्येक धर्म आणि जातीचे लोक सहभागी झालेले दिसतात. अमृतपाल हे त्याचं ताजं उदाहरण.
संपूर्ण देशातील लोक अजूनही जर्नेलसिंग भिंद्रनवालेला विसरलेले नाहीत. एका माणसानं आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी लोकांच्या धार्मिक भावनांचा शस्त्रासारखा वापर कसा केला आणि मग ८० आणि ९० च्या दशकात पंजाबच्या लोकांना कोणत्या हिंसाचार आणि वेदनांना सामोरं जावं लागलं याच्या कथा आजही लोकांच्या मनात घर करतात. आता अतिक अहमद आणि त्याच्या गुन्हेगारी जगताच्या कहाण्या चर्चेत आहेत. भलेही तो सुरुवातीपासूनच मोठा गुन्हेगार असेल; पण त्यानंही स्वत:चा धाक कायम ठेवण्यासाठी एका धर्माच्या आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या धार्मिक भावनांचा वापर केला होता. हरियाणातील सतलोक आश्रमाचे संचालक रामपालनं लोकभावनेच्या आधारे स्वतःला संत आणि बाबा कसं घोषित केलं हे सर्वज्ञात आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये हरियाणा पोलिसांना तसंच केंद्रीय सुरक्षा दलांना सतलोक आश्रम बरवालाच्या बाहेर दहा दिवसांपर्यंत त्याला अटक करण्यासाठी घेराव घातला गेला. नंतर त्या आश्रमातून पाच महिला आणि एका मुलाचा मृतदेह सापडला. १८-१९ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या रक्तरंजित बरवाला घटनेप्रकरणी हरियाणा पोलिसांनी रामपालला अटक केली होती. त्याच्यावर देशद्रोह आणि खुनासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुढं त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली.
स्वतःला बापू म्हणवून घेणाऱ्या आसारामनं लोकांच्या धार्मिक भावनांचा वापर करून एवढं मोठं साम्राज्य कसं निर्माण केलं होतं की, मोठे नेते, उद्योगपती, मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारीही डोके टेकवण्यासाठी त्यांच्या दरबारात पोहोचायचे. आजही आसारामसमोर हात जोडून त्या सर्व नेत्यांचे व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहेत. आसारामनं स्वत:ला संत आणि धर्मगुरू घोषित केलं होतं. देशभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. पुढं आसारामची काळी कृत्यं समोर येऊ लागली आणि त्यानंतर एकामागून एक अनेक अल्पवयीन मुलींनी त्याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल केले हेही आपल्याला माहीत आहे. सध्या तो एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यात जवळपास दहा वर्षे तुरुंगात आहे आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम स्वतःला धर्मगुरू आणि धर्मोपदेशकही म्हणवत होता. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख झाल्यानंतर त्यानं स्वत:भोवती दिखाऊपणाचं असं जाळं तयार केलं, की काही निष्पाप लोक त्याच्या जाळ्यात अडकले आणि त्याला देव मानू लागले. नंतर गुरमीत राम रहीमची काळी कृत्यं एकामागून एक समोर येऊ लागली, त्यानंतर ही मालिका सुरूच राहिली. बलात्कारापासून खुनापर्यंतची प्रकरणं समोर आली. तो सध्या दोन नन्सवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा आणि एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
अमृतपाल सिंगनंही असंच काही करण्याचा प्रयत्न केला होता. अटकेच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं धार्मिक भावनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. असे लोक आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी समाजात द्वेष पसरवण्यासोबतच कुणाला ठार मारायला किंवा हिंसाचार करायला मागंपुढं पाहत नाहीत. कोणताही धर्म कधीही हिंसा मान्य करीत नाही. धर्मात हिंसेला किंवा द्वेषाला स्थान नसतं; परंतु धार्मिक उन्मादासाठी काही लोक हिंसाचार करतात आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. पंजाबनं १९९० च्या दशकात वेगळ्या खलिस्तानच्या नावाखाली हिंसाचार अनुभवला आहे. देश विघातक शक्ती कुठल्या थराला जाते, हे जगाला दिसलं आहे. आता पंजाब पोलिसांनी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला गेल्या आठवड्यात मोगा जिल्ह्यातून अटक केली होती. तो महिनाभराहून अधिक काळ फरार होता.
अमृतपालनं गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये अशांतता पसरवली होती. त्याच्या अटकेनंतर अनेक गुपितं उघड होण्याची शक्यता आहे. अमृतपालची अटक ही चांगली गोष्ट आहे; परंतु त्याला खूप उशीर झाला. खलिस्तानच्या मागणीला पाकिस्तानसह जगातील अनेक देशातील काही शीखांचा पाठिंबा असला, तरी सामान्य शीखांचा कधीही पाठिंबा नव्हता. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन तसंच भारतातील सामान्य शीख नागरिकांनी मात्र खलिस्तानला चळवळीपासून चार हात दूर राहणं पसंत केलं. आता अमृतपालच्या अटकेमुळं पाकिस्तानी सत्तास्थापनेचा कट पूर्ण होणार नाही. त्याला कसं प्रशिक्षण देण्यात आलं, दुबईतून पाठवलं गेलं, त्यानं खासगी लष्करी छापे कसे सुरू केले, भिंद्रनवालेची नक्कल कशी केली, देश तोडण्याच्या कटाचा तो भाग कसा होता, पाकिस्तानी निजाम इस-खलिस्तानचा कट, आता या सर्व गोष्टी समोर येतील.
दुबईहून येताच त्यानं पंजाबच्या राजकारणात ज्याप्रकारे दबदबा निर्माण केला, ज्या प्रकारे तो वाहनांचा ताफा घेऊन जात असे, तरुणांना सोबत ठेवायचा, त्यांना सशस्त्र बनवायचा, हे सर्व एका मोठ्या कटाचा भाग आहे. त्याला अटक झाल्यामुळं आता मोठा कट उघडकीस येणार आहे. त्याचा खर्च, फायनान्सर कळणार आहे; मात्र इतके दिवस त्याचं प्रस्थ वाढू देण्यास पंजाब पोलिसांची गुप्तचर यंत्रणा जबाबदार आहे. ‘आम आदमी पक्ष’ जेव्हा पंजाबमध्ये प्रचार करत होता, तेव्हा त्यांनी खलिस्तानी घटकांचा वापर केला, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली, त्यांचा प्रचारही केला. ‘आप’च्या विजयात या घटकांचाही हात होता. पंजाब सरकारचा अमृतपालबाबतचा दृष्टिकोन सुरुवातीला सौम्य होता. जेव्हा त्याच्या हालचाली वाढू लागल्या, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला आणि त्यानंतरच कारवाई झाली. अमृतपालनं ज्याप्रकारे पोलीस ठाण्यावर हल्ला करून गुन्हेगाराची सुटका केली, तीही त्याच्या शवपेटीवरील शेवटचा खिळाच ठरली. पोलिसांवरील हल्ला हा खरं तर त्यांच्या संपूर्ण स्वाभिमानावर केलेला हल्ला होता.
अमृतपालला सुरुवातीला निश्चितच राजकीय संरक्षण मिळालं होतं. त्यातून खलिस्तानी घटक सक्रिय झाले आणि सरकारला आव्हान दिलं गेलं. दुबईत ड्रायव्हर असलेला एक माणूस अचानक पंजाबमध्ये येतो, ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख बनतो. भिंद्रनवालेसारखा पोशाख धारण करतो आणि संपूर्ण सैन्य उभे करतो. रायफलमन तरुणांना पुढं आणि मागं ठेवू लागतो. साहजिकच हे एक मोठं षडयंत्र आहे आणि ते केवळ त्याच्या नियंत्रणात नव्हतं. त्यामागं कोण आहे, त्याचा फायनान्सर कोण आहे, कोणत्या देशानं याला कोणत्या विचारानं प्रायोजित केलं आहे, या सर्व कारस्थानांचा शोध राज्य आणि केंद्रीय यंत्रणांनी एकत्रितपणे शोधला पाहिजे. खलिस्तान चळवळीशी संबंधित अनेक उपक्रम आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा किंवा हा पाकिस्तानच्या खलिस्तान योजनेचा एक भाग आहे, याचा योग्य तपास व्हायला हवा. केंद्रीय यंत्रणा आणि पंजाब पोलिसांनी त्याची पूर्ण चौकशी केली, तरच त्यातील गूढ उघड होईल. युरोप असो की अमेरिका; खलिस्तानच्या नावानं कुठंही काहीही घडत असेल तर ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था (आयएसआय)चं षड्यंत्र आहे. त्यामुळं ते समजून घेतलं पाहिजे. पंजाबच्या जनतेला हे षडयंत्र समजून घ्यावं लागेल.
पंजाबची संपूर्ण समस्या ही राजकीय कारस्थानांची निर्मिती आहे. खलिस्तानी चळवळीला देत असलेला पाठिंबा हा शीखांच्या गुरूंचा अपमान आहे. असे करून ते पाकिस्तानच्या कारस्थानात सहभागी होत आहेत. जे खलिस्तान-खलिस्तान करत आहेत, मग ते अफगाणिस्तानात गुरू ग्रंथ साहिबच्या अपमानावर, पाकिस्तानात शीख मुलींचं जबरदस्तीनं केलेलं धर्मांतर यावर काहीच का करत नाही? शीखांनी केलेल्या बलिदानाचा विसर पडता कामा नये. गुरुद्वारा आणि मंदिरात भेद केला जात नाही. गुरु ग्रंथसाहिबमध्ये राम आणि कृष्णाची स्तुती केली आहे, माँ कालीची आरती आहे. शीखांच्या देशावरील प्रेमाची किंमत करता येत नाही. तूर्तास अमृतपालला अटक करून सरकारनं थांबू नये. ९९.९९ टक्के शीख लोक त्यांच्यासोबत नाहीत. काही दिशाभूल करणारे लोक आहेत. सरकारनं त्यांचा पर्दाफाश करावा. ही सुवर्णसंधी आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचा पर्दाफाश करण्याची आणि त्याबद्दल सर्वसामान्यांना सांगण्याची वेळ आली आहे.
– भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com