आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच!’ या नाटकावर, त्याच्या विक्रमांवर, त्यातील भूमिकांवर, फिरत्या रंगमंचावर, कोर्टकचेरीवर, पडद्यामागल्या वाद-विवादांवर गेल्या तीसएक वर्षात अनेकदा लिहीण्याचा प्रसंग आलाय. पण आज एका महत्त्वाच्या इतिहासाच्या रंगवळणावर या नाटकाने साठ वर्षे पूर्ण केलीत. गेल्याच आठवड्यात हिरकमहोत्सवी सोहळाही रंगला.
रंगभूमीवर चमत्कार ठरलेल्या या नाटकाबद्दल दस्तूरखुद्द नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्याशीही बऱ्याचदा गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. आज या विश्वविक्रमी नाटकाच्या आठवणी आणि पर्यायाने एका प्रदीर्घ कालखंडाला उजाळाच मिळालाय…
प्रभाकर पणशीकर, बापूराव माने, आत्माराम भेंडे, संजय मोने आणि डॉ. गिरीश ओक अशा प्रमुख पाच अभिनेत्यांनी आजवर ‘लखोबा लोखंडे’चा बिलंदर बहुरूपीचा मुखवटा चढविला.
त्यात पंत पहिल्या प्रयोगापासून ते शेवटच्या नाबाद पाचहजार प्रयोगांचे साक्षीदार ठरले. एका नाटकाच्या महाविक्रमाचे महानायकच बनले. त्यामुळे उभी मराठी रंगभूमी झळाळून निघाली… एखाद्या वेताळाप्रमाणे ही भूमिका पंतांच्या मानगुटीवर जशी बसलेली…
१५ ऑगस्ट १९६२ हा दिवस. या दिवशी या नाटकाच्या संहितेचे वाचन नाटककार आचार्य अत्रे यांनी केले. मो. ग. रांगणेकर यांच्या ‘नाट्यनिकेतन’ या नाट्यसंस्थेची निर्मिती. प्रमुख पंचरंगी भूमिकेत पंत. दिग्दर्शनाचीही जबाबदारी रांगणेकरांकडे होती. विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात नव्हे तर थेट दिल्ली मुक्कामी याचा शुभारंभ प्रयोग आयफॅक्स थिएटर येथे झाला.
राजकारणात दिल्लीचे तख्त भले महाराष्ट्राने काबीज केले नसले तरी ते नाटकाने केले आणि मराठी नाटकाची पताका देशाच्या राजधानीत मानाने फडकली. तिथपासून सुरू झालेला या नाटकाचा प्रवास हा एकेका वळणावरून निघाला.
पन्नाशीच्या दशकातील एक सत्यघटना. ‘माधव काझी’ याने तरुण मुलींना लग्नाच्या जाळ्यात अडकवून अनेकांना फसविले. त्यावर एक खटला सुरू होता. जो चर्चेत असतानाच रांगणेकरांनी अत्रे यांना यावर नाटक चांगले होऊ शकेल, असे सांगून नाटक निर्मितीची तयारी दाखविली. त्यांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेची मरगळ दूर होईल अशी आशा त्यामागे होती.
अखेर त्यावेळी ‘मराठा’ दैनिकात उपसंपादक असलेले आत्माराम सावंत यांनी त्याबद्दलच्या बातम्यांची कात्रणे, वृत्तांत याचा सारा तपशिल अत्रे साहेबांना पुरविला. दोन एक महिन्यात नाटक सज्ज झाले. संहिता एक अद्भुत रसायन ठरले. सोनपावलांनी आलेलं हे नाटक वाचनापासूनच थक्क करून सोडणारे होते.
त्यावेळी एकाच नटाला एकाच नाटकात पाच वेगवेगळ्या भूमिका असणारे हे जगातले पहिले नाटक होते. ज्याचं सादरीकरण हे रंगमंचावरले आव्हानच जसे होते. उलट-सुलट चर्चाही सुरू झाल्या. प्रमुख भूमिकेसाठी निर्माते दिग्दर्शक रांगणेकर यांच्यापुढे राजा गोसावी, आत्माराम भेंडे, दामू केंकरे, रमेश देव ही त्याकाळाची गाजत असलेली मंडळी होती. सर्वांच्या नावामागे ग्लॅमर भरलेलं.
पण ऐनवेळी रांगणेकर यांनी ‘प्रभाकर पणशीकर!’ यांचे नाव जाहीर केले आणि सारेजण चक्रावून गेले. लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजी शास्त्री, कॅप्टन अशोक परांजपे, राधेश्याम महाराज या पंचरंगी भूमिकांचे आव्हान पंत पेलू शकतील काय? अशी शंका अत्रे यांनाही होती. पण प्रत्यक्ष प्रयोग बघितल्यानंतर अत्रे यांची शंका फोल ठरली. ‘लखोबा मिळाला!’ असे पडसाद उमटले.
नाटकाचे एका दिवसात तिन प्रयोग करण्याचे दिव्य इथूनच सुरू झाले. रोज नाटकाचा प्रयोग आणि झंझावती दौरे यामुळे उभा महाराष्ट्र ‘हाउसफुल्ल’ गर्दी करू लागला. ‘डिमांड शो’ सुरु झाले. दरम्यान चाळीसएक प्रयोगांनंतर अत्रे-रांगणेकर यांच्यात वाद सुरू झाला. जो विकोपाला पोहचला. प्रकरण कोर्टपर्यंत गेले. १९६ प्रयोगानंतर नाटकाचे हक्क हे अत्रे थिएटर्स (प्रा.) या संस्थेला मिळाले. संस्था बदलली पण नाटक पुन्हा एकदा नव्या दमात रंगमंचावर आले, तो दिवस होता ७ फेब्रुवारी १९६५.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज पटांगणावर आता फिरत्या रंगमंचावर नाटक सुरू झाले. दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका अर्थातच पंतांची! लखोबाची भूमिका बघण्यासाठी जशी गर्दी उसळायची तसेच आता फिरता रंगमंचही आकर्षण ठरले. मराठी रंगभूमीवर प्रथमच असं तंत्र आलं. त्यापूर्वी देशभरातील नाटकात असा प्रयोगच कधी झाला नव्हता. नेपथ्य बदलात क्रांतीच जणू ठरली. कोल्हापूरचे म्हादबा मिस्त्री (शेळके) यांच्या विश्वास इंजिनिअरिंगने ही कल्पना साकार केली. त्याला श्यामराव साळुंखे यांनी आकार दिला आणि एक कल्पना सत्यात उतरली! ‘विश्वास रंगमंच’ असंही काहींनी याचे बारसे केले!
‘नाट्यनिकेतन’चे हे नाटक पंतांनी सोडल्यानंतर आत्माराम भेंडे यांनी २१ प्रयोग केले, तर अत्रे थिएटर्सचे नाटक सोडल्यानंतर बापूराव माने यांनी १११ प्रयोग केले होते. पण रसिकांच्या हृदयसिंहासनावर ‘लखोबा’ म्हणजे पंतच हे पक्के बसले होते. पुढे ‘नाट्यसंपदे’ची स्थापना ही झाली आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नव्या हक्काच्या मालकीच्या संस्थेत पंच ‘लखोबा’ म्हणून उभे राहीले. लखोबाची भूमिका काही केल्या कुणालाही विसरता येत नव्हती. पंतांनी पुन्हा लखोबाचा मुखवटा चढविला तो शेवटपर्यंत… चाळीसएक वर्षे आणि तीनएक हजार प्रयोगाचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला.
पंतांनी दोन वेळा नाटक सोडले पण पुन्हा ‘स्वगृही’ परतले. पंत आणि लखोबा हे समीकरणच पक्के ठरले. ‘लखोबा’ शब्दाला ओळख मिळाली. आजही राजकारणात ‘लखोबा’ हा एक चर्चेतला शब्द ठरलाय… कपट, गद्दारी, फसवणूक, हेराफेरी यासाठी तो सर्रास वापरला जातोय. नावातच सर्व आलंय!
१९६१-६२ हे साल. महाराष्ट्रात ‘माधव काझी’ खटला गाजत होता. वेशांतर, नामांतर, फसवा-फसवी हे सारं काही करून अनेक विवाह करणारा हा खलनायक पण मराठी रंगभूमीवरला नाटकात ‘नायक’ ठरला. प्रत्यक्ष नाटकात कोर्टातला खटला अजूनही कुठेही त्यातलं ‘नाट्य’ हे हटविलेलं नाही किंवा कंटाळवाणही झालेलं नाही, हे विशेष! अर्थात समर्थ नाटककार-कलाकार असल्याने हा योग साधला गेला आणि नाटक एका उंचीवर पोहचले.
ज्याप्रमाणे ‘तो मी नव्हेच’ हे नाट्य सत्यघटनेचा आधार होते तसेच त्याकाळात गाजलेला नानावटी खून खटला त्यावर आधारित मधुसूदन कालेलकर लिखित ‘अपराध मीच केला!’ हे नाट्य. यातही न्यायालयीन खटलाच पार्श्वभूमीवर आहे. आणखीन एका सत्यकथेवरलं नाटककार सुरेश खरे यांचे ‘स्वर जुळता गीत तुटे’ हे गाजलेलं नाटक. आचार्य अत्रे यांचाच आणखीन एक कोर्टड्रामा होता. ‘डॉक्टर लागू!’ तेही वादळी ठरले. पुण्यात एका फॅमिली डॉक्टरने केलेला खून हा विषय.
विद्येचे माहेरघर आणि निवांत शहर असलेल्या पुण्यातली एक सत्यघटनाच. त्याला नाट्यरूप मिळाले. नंतरच्या काळात विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’. यात एक काल्पनिक खटला जो न्यायालयीन पार्श्वभूमी असलेल्या नाटकात वैशिष्ट्यपूर्ण प्रायोगिक ठरला.
‘शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढू नये!’- असं म्हणतात पण मराठी रंगभूमीवर नाटकातून अनेकदा ‘कोर्टाची पायरी’ रंगमंचावर आणि प्रत्यक्षातही चढली आहे! निखारे (रत्नाकर मतकरी), समाजस्वास्थ (प्रा. अजित दळवी), कर्ताकरविता (रत्नाकर मतकरी), पुरुष (जयवंत दळवी), माझा खेळ मांडू दे (सई परांजपे), थँक्यू मिस्टर ग्लाड (अनिल बर्वे), चारचौघींच्या साक्षीने (अशोक पाटोळे) अशी अनेक नाटके. जी न्यायालयीन विषय किंवा त्यातील नाट्य साकार करणारी आली आहेत. न्यायालये हा तसा लोकशाहीचा कणा आहे, हेच खरे. असो. या न्यायालयीन पार्श्वभूमीवरील नाटकात एकमेव सर्वार्थाने मैलाचे निशाण ठरले ते ‘तो मी नव्हेच!’
‘मराठी रंगभूमीवरला लखलखता कोहिनूर’ अशी या नाटकाची कल्पक जाहीरात काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. डॉ. गिरीश ओक यांनी १२ वर्षे हे नाटक केलं. दौऱ्यावर ते गाजले. पंत भूमिका करीत असताना डॉक्टर हे अग्निहोत्री याची भूमिका करायचे. त्याचे दोनशे प्रयोगही त्यांनी केलेले.
२००८ साली नाटकाचे डॉक्टरांच्या प्रमुख भूमिकेत प्रयोग सुरू झाले. शंभरावा प्रयोग बघण्याची इच्छा पंतांची होती खरी पण ९६ व्या प्रयोगानंतर पंत गेले. एका भेटीत ही खंत डॉक्टरांनी बोलून दाखविली होती. नाटकाच्या ६०व्या वाढदिवशी पुन्हा एकदा डॉक्टरांनी लखोबाची वस्त्रे चढविली मुखवटा रंगविला… ‘मी निपाणीचा तंबाखू व्यापारी लखोबा लोखंडे!’ हे बोल घुमले…
एखाद्या नाटकाच्या कुंडलीत न विसरता येणारा वय वर्षे ६० चा प्रवास म्हणजे चमत्कारच! पंतांनी यातली केलेली पंचरंगी भूमिका प्रत्यक्ष ज्या रसिकांनी अनुभवली ते रसिक धन्य आहेत! नव्या लखोबाच्या प्रतिक्षेत मराठी रंगभूमी वाट बघतेय. ‘सामना’ चित्रपटात मास्तराच्या तोंडी असलेल्या ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या प्रश्नाप्रमाणे हिरकमहोत्सवी सोहळ्यात ‘लखोबा लोखंडे पुन्हा कधी येणार?’ असा वारंवार प्रश्न रसिक विचारत होते… या प्रश्नामागे नव्या रसिकांची उत्सुकता आणि आशा आहे.
‘तो मी नव्हेच’च्या नाबाद साठाव्या वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थ डे!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com