मंगळवारी पल्लेकेले येथे इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात सलमान अलीच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाला इंग्लंडकडून 2 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. 165 धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडने 19.1 ओव्हरमध्ये 8 बाद 166 धावा करत सामना त्यांच्या नावावर केला. या विजयाचा हिरो इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक ठरला. ज्याने प्रेशरमध्येही शानदार शतक ठोकत आपल्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. या विजयासाठी सेमीफायनलमध्ये पोहोचणारा इंग्लंड पहिला संघ ठरला.
इंग्लंडकडून पराभव स्वीकारल्यानंतर त्याचा परिणाम पाकिस्तानवर झाला. सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागल्या. काही काळानंतर टीकेला गंभीर वळण आलं कर्णधार सलमान अली आघा यांच्या कुटुंबालाही लक्ष्य करण्यात आलं. बऱ्याच पोस्टमध्ये त्याच्या बायकोसह त्याच्या लहान मुलाला शिवीगाळही करण्यात आली होती. यासगळ्यावर सलमानची पत्नी सबा मांझर यांनी ट्रोलर्सना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. तिने इंस्टाग्रामवर थेट मॅसेज शेअर केला. ज्यात तिने ट्रोलर्सना चांगलंच फटकारलं.
सबाने इंस्टाग्रामवर लिहिलं की, “मला आणि माझ्या निष्पाप मुलाला शिवीगाळ करुन तुम्ही विश्वचषक जिंकणार नाहीत” असं म्हणत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं. यासगळ्या परिस्थितीमुळे ऑनलाईन वर्तवणुकीबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. बऱ्याच पूर्व खेळाडूंनीही याबाबत आवाज उठवला आहे.
पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा आता पूर्णपणे गणितं आणि इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहेत. त्यांना श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा शेवटचा सुपर 8 सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. न्यूझीलंडच्या निकालांवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. जर न्यूझीलंड जिंकला तर गणितं बदलतील. त्यानंतर सगळा खेल नेट रन रेट (NRR) वर असेल. त्यात जो बाजी मारेल तोच पुढे सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. याचा अर्थ असा की आता फक्त विजय पुरेसे नाहीत, तर मोठा विजय आवश्यक आहे. एकेकाळी पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु आता पाकिस्तान अशा स्थितीत आहेत जिथे त्यांना सामने जिंकावे लागणारच आहेत पण त्याचबरोबर इतरांच्या पराभवासाठी प्रार्थनाही करावी लागणार आहे.






