हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ आणि कुरुक्षेत्र ही स्थळे जितकी प्राचीन आहे तितकेच प्राचीन विदर्भातील ‘कौंडण्यपूर’ आहे. कौंडण्यपूर ही विदर्भाची पहिली प्राचीन राजधानी आहे. आजही कौंडण्यपूर आणि परिसराच्या गावातील अनेक परंपरा आणि संस्कृती याची साक्ष देतात. वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या कौंडण्यपूर. या राजधानीत पौराणिक काळात वलयांकित सुवर्णयुग नांदत होते.
‘रुक्मिणीहरण’ हा अनेक बुवांच्या किर्तनात आणि प्रवचनकारांच्या प्रबोधनात प्रमुख विषय असतो आणि अतिशय तन्मयतेने हा प्रसंग बुवा रंगवून सांगत असतात. भगवान श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाभोवती आपल्या संस्कृतीचे चक्र सतत फिरत असते. भगवानाचा पावनस्पर्श विदर्भाला दोनवेळा झालेला असून कौंडण्यपूर हे या प्रसंगाचे प्रतीक आहे.
विदर्भ हा अत्यंत प्राचीन देश असून प्राचीन काळी यामध्ये ‘दंडकारण्य’ नावाचे घनदाट अरण्य होते. याच दंडकारण्यात ‘कुंडीनपूर’ नावाची प्राचीन राजधानी होती. आजचे कौंडण्यपूर म्हणजेच प्राचीन कुंडीनपूर..! ‘वैदर्भी कौंडण्य’ या ऋषिपासून कौंडण्यपूर हे नाव पडले अशी मान्यता आहे. विदर्भातील नागपूरपासून ८० किलोमीटरवर अमरावती आणि वर्ध्या जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा नावाचा तालुक्यात कौंडण्यपूर हे अडीच ते तीन हजार लोकवस्तीचे खेडेगाव वसलेले आहे. नदीचे खरे नावं ‘वरदायिनी’..!
कालौघात ती ‘वर्धा नदी’ झाली. आर्वी आणि धामणगाव ही येथील मोठी गावे आहेत. तीर्थस्थळ, प्राचीनस्थळ आणि भगवान श्रीकृष्णाची ‘सासुरवाडी’ अशी आज कौंडण्यपूरची ख्याती आहे. या गावातले पुरातन अवशेष साधारणतः तीन किलोमीटरच्या कक्षेत पसरलेले आहेत. पुरातत्व विभागाला उत्खननात या परिसरात असंख्य वस्तू सापडलेल्या आहेत.
गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर सभोवताली उंच ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक पांढर्यात टेकड्या दिसायला लागतात. तिच्या पोटातून वाहणारे पावसाळी ओहळ..! समविषम असलेले भुस्तर … झाडापाचोळा… कधी कधी या टेकड्यांमधून डांबरी रस्ता जातो. या टेकड्यांना स्थानिक लोक ‘भस्माच्या टेकड्या’ म्हणतात. पुरातत्वानुसार अशी पांढरी टेकाडे दिसणे म्हणजे गाव अत्यंत प्राचीन आहे आणि अनेक वर्षे येथे मानवी वसाहत नांदत होती असा अर्थ होतो.
या पांढऱ्या टेकड्यांमुळेच १९६२ ते १९६४ या काळात जागतिक दर्जाचे विस्तृत उत्खनन केले. त्यातूनच जगात कौंडण्यपूरचे स्थान जगात अद्वितीय ठरते. गावातल्या सर्व समाज बांधवांनी या पांढर्याा टेकड्यांवर अनेक मंदिरे उभारलेली आहेत. गावाचा प्राचीन इतिहास गावाने आजही जपलेला आहे. या इतिहासात मग आपल्याला दिसायला लागतात भार्गव, कौंडण्य, अगस्ती, भिष्मक, रुक्मिणी, नल-दमयंती, भीमराजा, लोपमुद्रा ही येथील वैदर्भीय व्यक्तिमत्वे…!
या आद्यग्रामाच्या आत प्रवेश करताच एक अविकसित गाव दिसायला लागते. चहाची दुकाने, कच्च्या चिवड्याची दुकाने, पानठेले इ. देवालयाच्या मार्गावर नदीकिनारी दिसायला लागतात. सरळ गेल्यावर एका टेकाडावर देवालयाची भव्य वास्तू आहे. देवालयाचे भव्य प्रवेशद्वार..! त्यात विशाल सभामंडप भव्य आकर्षक व्यासपीठ..! हेच आहे कौंण्डिण्यपूरचे विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान..! हनुमंताचे मंदिर, गर्भगृह, चौरंगीनाथांची चतु:कोनाकृती संरक्षित समाधी आहे. चमत्कारिक नादाची भिंतीच्या आतमध्ये धातूची घंटा आहे.
इ.स. १८०० च्या शतकात पंजाबमधून कौंण्डिण्यपूरला आलेले सिद्धपुरुष सदाराम महाराज यांची समाधी आहे. त्यांना कुंडात सापडलेली ३०० वर्षापूर्वीची विठ्ठल-रुखमाईची प्रतिमा काचेच्या कपाटात ठेवलेली आहे. येथे सुंदर सत्यनारायण मंदिर आहे. संतश्रेष्ठ महान योगीपुरुष लहानुजी महाराजांची प्रतिमा येथे आहे. संत अच्युत महाराज यांचे अनेक वर्षे येथे वास्तव्य होते. कोदंडधारी राम आणि शेषावतार लक्ष्मणाची प्रतिमा आहे. अशी अनेक मंदिरे या देवालयात आहेत.
अशा या भीष्मकाच्या कौंण्डिण्यपूरच्या राजधानीत भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीदेवीचे हरण केले अशी पौराणिक मान्यता आहे. हे हरण गावकुसाच्या बाहेर असलेल्या कुलस्वामिनी अंबादेवीच्या मंदिराच्या भुयारातून झाले. हे भुयार ‘खिडकी’ या नावाने ओळखल्या जाते. एका पांढर्याच उंच टेकडीवर हा परिसर आहे. मुख्य मंदिरापासून हे अंतर एक किलोमीटर आहे जमिनीपासून पन्नास फूट उंचीवर आहे.
येथील सभागृहात एकूण सहा कोनाडे असून कालभैरवासहीत अनेक देवांच्या प्रतिमा/मूर्ती आहेत. याच ठिकाणी अंबादेवीची अतिशय तेजस्वी मूर्ती असून अंगावर भरजरी अलंकार, नाकात नथ, मस्तकावर चांदीचे पंचकरंडाचे मुकुट असून हाताच्या अभयमुद्र आणि वरदमुद्रेने ती भक्तांना आशिर्वाद देत आहे. चेहर्यासवरचा भाव रौद्र असून नेत्र पाणीदार आहेत.
याच्या बाजूलाच एक झरोका असून आज त्यास लोखंडी गज लावलेले दिसतात. याच्या आतमध्ये एक भुयार असून येथूनच रुक्मिणीदेवीने जगातले पहिले प्रेमपत्र प्रत्यक्ष भगवंताला लिहले. ते पत्र ‘सुदेव ब्राम्हण’ याला देऊन द्वारकेला पाठविले आणि ती परत भीष्मकाच्या महालात परत आली. रुक्मिणीने नंतर वस्त्रालंकार देऊन त्याचा मानसन्मान केला. कौंण्डिण्यपूरला या करिता श्रीकृष्णाने दोनवेळा भेट दिली. भीष्मकाने स्वयंवर ठेवले त्यावेळेस आणि रुक्मिणी हरणाच्या वेळेस या भेटी दिल्या…!
या स्वयंवराकरिता कौंडण्यपूरला अनेक देशांचे राजे-महाराजे आले होते. शिशुपाल, जरासंघ, शाल्य, भगदत्त, दंतवक्र हे सारे राजे आणि महावीर आपल्या सैन्य आणि लवाजम्यासह आलेत. मात्र एक गवळी म्हणून साधेपणाने श्रीकृष्णाचे आगमन झाले. सर्व आलेल्या राजांना हा कृष्णाचा दरिद्रीपणा वाटला. त्यामुळे नारदाच्या विनंतीवरुन इंद्राने आपले सारे वैभव भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले आणि भीष्मकाला रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णासोबत लाऊन देण्याचा सल्ला दिला.
भीष्मकाच्याही मनात कृष्णाला रुक्मिणी द्यावी असेच होते. परंतू यावेळेस रुक्मिणीची ग्रहदशा योग्य नसल्याने आणि अजून काही दुष्ट राक्षसांचा नाश करावयाचा असल्याने परत येण्याचे आश्वासन देऊन भगवान द्वारकेला निघून गेले. बरेच दिवस ते आले नाहीत. या लग्नाला रुक्मिणीचा भाऊ ‘रुक्मी’चा प्रचंड विरोध होता कारण शिशुपालासोबत रुक्मिणीचे लग्न व्हावे असे त्याला वाटत होते. या लग्न समारंभाकरीता शिशुपालचे मोठ्या थाटात कौंडण्यापूरला आगमन झाले.
चार दिवसांनंतर शिशुपालाचा हळदीचा समारंभ सुरू असतानाच रुक्मिणीची अवस्था कठीण झाली. तिने परत एक पत्र सुदेव ब्राम्हणामार्फत पाठविले आणि लिहिले ‘भगवंता माझे संरक्षण कर..! परवा सात घटकेचा मुहूर्त आहे. मी अंबिकेच्या देवळात पूजेला जाईल. तेथून मला युक्तीने घेऊन जा’.
रुक्मिणीचा तो संदेश बघून भगवान श्रीकृष्ण कुणालाही न सांगता त्वरेने वेगाने चालणार्या. रथात बसून द्वारकेवरून कौंडण्यापूरला येण्याकरिता निघाले. त्यांना लग्नाची जोरदार तयारी दिसली. भगवान आल्याचे बघून भीष्मकाने श्रीकृष्णालाही आमंत्रित केले. लग्नाचा दिवस उगविला. योग्य पतीकरिता नवस केल्याने रुक्मिणीला आई आणि भावाने गावाबाहेर कुलस्वामिनी अंबिकेच्या दर्शनाची परवानगी दिली. मंदिराबाहेर कृष्णाचा रथ उभाच होता.
रुक्मिणीने देवीची मनोभावे पूजा केली आणि विनाविघ्न कार्य संपन्न व्हावे अशी प्रार्थना केली. तोच सुमुहूर्त समजून रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या गळ्यात माळ घातली आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि श्रीकृष्णाने तिला रथात बसविले..! सारथ्याने अतिशय वेगाने आपला रथ द्वारकेच्या दिशेने सोडला! रुक्मिणीहरणाची बातमी नगरात पसरली..! सर्व राजांनी श्रीकृष्णाचा वेगाने पाठलाग केला..! घनघोर युद्ध झाले..! पण श्रीकृष्णाच्या संरक्षणाकरिता आलेल्या बलरामाच्या सैन्यासहित यादवांनी या सर्व राजांचा पराभव केला आणि शेवटी श्रीकृष्णाने ‘रुक्मी’ला विद्रूप केले ते याच कौंण्डिण्यपूरला..!
श्रीकृष्णाने रुक्मिणीदेवीचे हरण केल्याची घटना कौंडण्यपूरवासियांच्या भावविश्वाचा एक भाग झालेला असून आजही येथील लोक लग्नात विघ्न येतात म्हणून आहेर स्विकारत नाहीत..! असे हे विदर्भकन्या रुक्मिणीदेवीचे माहेर म्हणजे विदर्भाचे ‘कौंडण्यपूर’..!
श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com