फोटो सौजन्य - Social Media
पृथ्वीच्या पोटात दडलेली रहस्ये असोत किंवा पाण्याखालील जगातील अद्भुत रचना असोत, या सर्वांच्या मागचे वैज्ञानिक कारण शोधण्याचे महत्त्वाचे काम जिओलॉजिस्ट करतात. प्रयोगशाळेपेक्षा निसर्गाच्या अधिक जवळ जाणारे हे क्षेत्र असून, पृथ्वीच्या रचनेचा, बदलांचा आणि संसाधनांचा सखोल अभ्यास यामध्ये केला जातो. खनिज संपत्तीचा शोध, नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये सहभाग अशा अनेक कारणांमुळे जिओलॉजिस्टची मागणी वाढत आहे.
जिओलॉजिस्ट पृथ्वीची निर्मिती कशी झाली, तिचा उत्क्रांतीचा इतिहास काय आहे, पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा विकास कसा झाला, वातावरणाची रचना आणि भूस्तरांची मांडणी यांचा अभ्यास करतात. जिओलॉजी हा विषय खूप व्यापक असून त्यामध्ये विविध शाखांमध्ये विशेष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडता येते.
जिओलॉजीमधील प्रमुख शाखांमध्ये जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, मिटीओरोलॉजी, ओशनोग्राफी, पॅलिओन्टोलॉजी, पेट्रोलियम जिओलॉजी आणि सिस्मोलॉजी यांचा समावेश होतो. जिओफिजिक्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यांच्या आधारे पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास केला जातो. जिओकेमिस्ट्रीमध्ये माती, खनिजे आणि पृथ्वीवरील पाण्याच्या रासायनिक घटकांचा अभ्यास होतो.
मिटीओरोलॉजी या शाखेत वातावरण, हवामान बदल, वादळे, पावसाचे स्वरूप, मौसमी वारे यांचा सखोल अभ्यास केला जातो. ओशनोग्राफीमध्ये समुद्रतळाची रचना, सागरी परिसंस्था आणि समुद्री जीवसृष्टीचा अभ्यास केला जातो. पॅलिओन्टोलॉजिस्ट जीवाश्मांचा अभ्यास करून पृथ्वीवरील प्राचीन सजीवांविषयी माहिती मिळवतात. पेट्रोलियम जिओलॉजिस्ट तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेतात, तर सिस्मोलॉजिस्ट भूकंप, त्यांची तीव्रता आणि निर्माण होणारी क्षेत्रे यांचा अभ्यास करतात.
रेल्वे मार्ग, महामार्ग, पूल, धरणे, उंच इमारती अशा मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये जिओलॉजिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जमिनीची क्षमता, भूस्खलनाचा धोका, भूकंपप्रवण क्षेत्र यांचा अभ्यास करून सुरक्षित बांधकामासाठी ते मार्गदर्शन करतात.
जिओलॉजीमध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स या विषयांसह बारावी पूर्ण केलेली असावी. त्यानंतर बी.एस्सी. (जिओलॉजी/अॅप्लाइड जिओलॉजी/जिओफिजिक्स) ही पदवी घेता येते. जिओलॉजिस्ट म्हणून व्यावसायिक स्तरावर काम करण्यासाठी मास्टर्स डिग्री असणे आवश्यक मानले जाते.
या क्षेत्रात काम करताना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागते. दुर्गम भाग, कठीण हवामान, जमिनीखाली किंवा पाण्याखाली काम करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि टीमवर्कची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते.
निसर्गाचा अभ्यास करताना संशोधन, साहस आणि समाजासाठी उपयुक्त काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी जिओलॉजिस्ट हे करिअर उत्तम संधी देणारे ठरत आहे.






