पंढरीचा महिमा ।
देतां आणिक उपमा ।।१।।
ऐसा ठाव नाहीं कोठें ।
देव उभाउभीं भेटे ।।२।।
आहेति सकळ ।
तीर्थे काळे देती फळ ।।३।।
तुका म्हणे पेठ ।
भूमीवरी हे वैकुंठ ।।४।।
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून पंढरपूर व विठ्ठलाचा महिमा सांगितला आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाचा भक्त हा पंढरपूर तिर्थक्षेत्राला विठुरायाला भेटायला जात असतो. तो वारीच्या मार्गाने विठ्ठल नामाचा व संतांचा जयघोष करत जाणे अधिक पसंत करतो. या वारीत सर्व जाती धर्माचे, गरीब-श्रीमंत, लहान थोर मंडळी पंढरीला जातात.
या त्रैलोकात पंढरीसारखे दुसरे पवित्र ठिकाण नाही. येथे अंतःकरणापासून भक्ती करणाऱ्या भक्ताला देव दर्शन देतो. तो आपल्या भक्तांच्यात भेदभाव करत नाही. तिथले वातावरण भक्तिमय, पवित्र व निर्मळ झालेले असते. विठ्ठलाची मूर्ती व पंढरीचा सोहळा अनुभवताना जणू काही स्वर्गच अवतरला आहे असे वाटते.
यामुळे सोहळा बघून तुकाराम महाराज म्हणतात, हि पंढरी म्हणजे पृथ्वीतलावर उतरलेला स्वर्ग (वैकुंठ) आहे. या वारीत मग्न होऊन चालताना कुठलाच भेदभाव नसल्याने होणाऱ्या भेटीतून मनातील अनेक विकार नाहीसे होतात. यातून आत्मशुद्धीकडे मन सरकते.
१२ व्या शतकापासून अखंडित सुरु असलेली पंढरीची वारी मराठी संस्कृतीचे लेणं लाभलेली परंपरा आहे. युगे युगे या जगात उच्च-नीच, व्रण भेद, जाती भेद, धर्म भेद, प्रांत भेद, भाषा भेद अशा अनेक भेदाभेदीने समाज पोखरून गेला होता. यावर संत चोखामेळा महाराजांनी १३ व्या शतकातील समाजव्यवस्थेचे वर्णन आपल्या अभांगातून केले आहे.
‘जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।’
‘आदि अंती अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।
उपेक्षित बांधवांच्या उद्धारासाठी, त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. समाजातील अमंगल भेद नष्ट करण्याचे काम संत महात्म्यांनी केले. भारताच्या मध्ययुगीन काळापासून अनेक महान ऋषी व संतांनी कर्मकांडाविरुद्ध समाज जागा केला.
दैनंदिन जीवन व्यवहार, राजाचे, प्रजेचे, पर्यावरण, आरोग्य विषयीच्या भ्रामक कल्पना रूढींना फाटा देण्याचे काम केले. संत ज्ञानेश्वर ते आधुनिक भारतातील संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पुरोगामी विचारांची बीजे रोवली. समाज्याकडून अवहेलना, अपमान प्रसंगी हल्ला ही सोसला.
यातून त्यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडाना मुठमाती देवून समाज परिवर्तन साधले. उच्च नीच, स्त्री-पुरूष भेदभाव केला नाही. अशा संत परंपरेने निर्माण केलेला वैष्णव व त्यांचा मेळा म्हणजेच पंढरपुरची समतेची वारी होय. ही परंपरा महाराष्ट्राने जगाला दिली. ती समाजमन शुद्धकरणाची सर्वात मोठी संस्था म्हणजे पंढरीची वारी होय.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ ।।
आईका जी तुम्ही भक्त भागवत
कराल ते हित सत्य करा ।।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव
सुख दुःख जीव भोग पावे ।।
संत तुकाराम महाराजांनी वारकरी असणाऱ्यांनी कसे जीवन जगावे याचे या अभांगातून मांडले आहे. वारकरी संप्रदायात विठ्ठल भक्ती बरोबर राम, कृष्ण, दत्त, विष्णू, शिव या देवतांच्या भक्त हि समाविष्ट झाले. शैव व वैष्णव यांचे ऐक्य साधले. अनेक पंथ यात सामावले गेले.
वारकरी संप्रदायाने व्रत वैकल्य, कर्मठपणा, घनघोर तपश्चर्या, कर्मकांड, अंधश्रद्धा अशा गोष्टींना मूठमाती देऊन त्याग, भोग, स्वधर्माचरण व नैष्कर्म्य यांचा मेळ घातला. अद्वैत भक्ती, ज्ञान, उपासना, श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मता साधली. स्त्री व शूद्रांनाही या संप्रदायाने धर्म मंदिरात स्थान दिले.
अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात जरी देह एक असला तरी अनेक अवयव मिळून तो बनला आहे. अवयवांच्या एकत्रीकरणाने एक देह तयार होतो त्यामध्ये एकरूपता निर्माण होते. त्यामुळे सर्वच प्राणिमात्र हे भिन्न दिसत असले तरी सर्वांच्या ठायी असणारा परमात्मा एकच आहे. त्यामुळे कोणाचा द्वेष किंवा मत्सर करू नये. आचरणातून द्वेष किंवा मत्सर निघून गेल्यावर मानवी मन हे शुद्धीकरणाकडे ओढले जाते. हाच खरा वारीचा महिमा आहे.
वारकरी संप्रदायात उपासनेसाठी तुळशीची माळ ग्रंथावर ठेवून गळ्यात घातली जाते. कपाळी बुक्का, गोपीचंदन कापळी व अंगावर लावले जाते. गेरूच्या रंगाने रंगवलेली पताका आणि मुखी रामकृष्ण हरि महामंत्राचा जप, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीगुरु ज्ञानदेव तुकाराम” हे वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्याचे उच्चारण एवढे साधे मार्ग सांगितले आहेत.
नित्य जीवनासाठी सत्य बोलण, परस्त्री मातेसमान, पापकर्मापासून रोखण्यास प्रार्थना, शाकाहारी जीवन, पंढरपूर यात्रा, एकादशीला उपवास व नामसंकीर्तन, रामकृष्ण हरी मंत्र जप, सांप्रदायिक ग्रंथांचे वाचन, हरिपाठाचे वाचन व नित्य व्यवहारात विठ्ठल नामाचे स्मरण या गोष्टी सांगिल्या असून यात कोठेही कर्मकांड अथवा जीवघेणी उपासना नाही. त्यामुळे या संप्रदायाने एक समतेचा सुंदर विचार हा १२ व्या शतकात रोवला.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा । आणिक मी देवा काही नेणे ॥१॥
गाये नाचे उदे आपुलिया छंदे । मनाच्या आनंदे आवडीने ॥२॥
वैष्णवांचा मेळा म्हणजे पंढरपुरची वारी या वारीत वारकरी संगे म्हणजे वैष्णवांबरोबर पांडुरंगाच्या भेटीस जाताना मनाला जे सुख लाभते ते इतर कशात नाही. या अभांगातून, भक्ती रसातून समजते.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।
संत सेना महाराज यांनी पंढरपूरचा महिमा सांगत असताना विठ्ठलाच्या सहवासाशिवाय इतर कुठेही विश्रांती मिळणार नाही. हे अभंगातून दिसते.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा,
देव तेथेचि जाणावा ॥
या अभंगातून संतांनी भूतदयेचा मंत्र दिला. दीन दुबळ्यांची सेवा म्हणजे ईशवराची सेवा होय. हा साधा मार्ग वारकरी संप्रदायाने दिला. ज्ञानेश्वर माउलींनी वारकरी संप्रदाला गतिमान करताना शैव-वैष्णव या पंथांना, संप्रदायाला एकजीव करून टाकले पुढे ही परंपरा साऱ्या संतांनी टिकवली.
हे विश्वची माझे घर । ऐसी माती जयाची स्थिर
किंबहुना चराचर । आपणचि जाहला ॥
संत ज्ञानेश्वरांनी विश्वाची कल्पना मांडली आपण एक असल्याचे ज्ञान जगाला ज्ञान दिले. तर, पसायदानातून विश्वशांतीचा संदेश दिला. साऱ्या संतांच्या अभंग, ओव्या, भारूड, दोहे, गौळणी व भजनातून त्यांनी समाजसुधारण्याचे मार्ग दाखवले. म्ह्णून आजही भारत देशांत अनेक पंथ, जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. विश्वाच्या संकल्पनेतून भरकटलेल्या जीवनाला आत्मशुद्धीकरणातून समृद्धीचा मार्ग सापडत आहे. एवढी ताकद, प्रेरणा वारकरी संप्रदायाने जगाला दिली. स्वातंत्र्य, समता व बंधुता भाव यातूनच वाढीस लागला.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाई रे।।
संत तुकाराम महाराजांनी वैष्णव म्हणजे वारकरी पंढरपूरला पोहचल्यावर किती एकरूप होऊन जातात व विठ्ठलाच्या नामस्मरणाने दंग होऊन नाचतात. हे भक्ती भावाने नाचता नाचता मनातील सारे विकार निघून जात आत्म्याचे शुद्धीकरण होते. हेच वारीने गेली सातशे वर्ष सिद्ध केले आहे.
विठ्ठल वळसे पाटील
vithalvalse@gmail.com