१०० एकरात आंबा लागवड, शेतकरी करतोय वर्षाला 50 ते 60 लाखांची कमाई!
राज्यात सध्या शेतकऱ्यांचा ओढा फळशेतीकडे वाढला आहे. ज्यामुळे अनेक जण पारंपारिक पिकांना फाटा देत फळ पिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना फळ शेतीमधून अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण अशाच शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे १०० एकरातील आंबा लागवडीतून वार्षिक 50 ते 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
‘या’ आंबा वाणांची केलीये लागवड
मोहम्मद अलीम किदवई असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील नवाबगंज तालुक्यातील बयारा गावचे रहिवासी आहेत. आंबा हे सर्वांचेच आवडते फळ असते. हीच बाब लक्षात घेऊन शेतकरी मोहम्मद अलीम किदवई हे आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आंबा शेती करत आहे. त्यांनी सांगितले आपण आपल्या शेतीमध्ये दशेरी, लंगडा आणि चौसा या जातीच्या आंब्यांची लागवड केली आहे. आपले एकत्रित कुटुंब असून, कुटुंबातील सर्व जण मिळून शेती करतात.
किती मिळतंय उत्पन्न?
शेतकरी मोहम्मद अलीम किदवई सांगतात, बाजारात दशहरी, लंगडा आणि चौसा या जातीच्या आंब्यांना बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे अनेक वर्षांपासून आपण या जातीच्या लागवड केली आहे. एका हंगामात आपल्याला जवळपास 40 टन आंब्याचे उत्पादन मिळते. आपल्या शेतामध्ये उत्पादित सर्व आंबा आपण जवळच्या गोरखपुर, देवरिया जिल्ह्यांमध्ये पाठवतो.
इतकेच नाही तर शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये देखील आपला काही आंबा पाठवला जातो. याशिवाय काही मोठे व्यापारी हे दिल्ली आणि कोलकाता येथून देखील आपल्या आंब्याची खरेदी करतात. ज्यामुळे आपल्याला १०० एकरातील आंबा बागेतून वार्षिक 50 ते 60 लाख रुपयांचा नफा सहज मिळत असल्याचे ते सांगतात.
‘यंदा चांगल्या उत्पादनाचे संकेत’
दरम्यान, यंदाच्या हंगामाबाबत बोलताना शेतकरी मोहम्मद अलीम किदवई यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत वातावरण बदलामुळे आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. सध्या मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात होणार असून, 20 ते 25 जूनपर्यंत उत्तरप्रदेशात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. याशिवाय यंदा मॉन्सूनचा पाऊस समाधानकारक होणार आहे. ज्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे उत्पादन वाढले जाण्याची शक्यता आहे. अर्थात पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यास आंब्याच्या चवीमध्ये देखील वाढ होत असल्याचे ते शेवटी सांगतात.