ड्रॅगन फळाच्या शेतीतून वर्षाला 25 लाखांची कमाई; बीटेक पास तरुण शेतकऱ्याची कमाल!
सध्याच्या घडीला अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये पदार्पण करत आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न तरुण शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे तरुण आपल्या ज्ञानाचा वापर करून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या बीटेकपर्यंतच्या शिक्षणानंतर शेतीमध्ये पाऊल ठेवले. सध्या तो ड्रॅगन या विदेशी फळाच्या लागवडीतून वर्षाला खर्च वजा जाता वार्षिक २५ लाखांची कमाई करत आहे.
५ एकरात २० हजार रोपांची लागवड
अंशुल मिश्रा असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, तो उत्तरप्रदेशातील शाहजहांपुर येथील रहिवाशी आहे. अंशुल मिश्रा याने सुरुवातीला आपल्या शेतात १६०० रोपांची लागवड करत शेती करणे सुरु केले. त्यातून मिळणारे यश पाहता आज त्याने आपल्या ५ एकरात २० हजार ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे अंशुल मिश्रा याने चेन्नई येथून बीटेकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता त्याने शेतीचा पर्याय निवडला. जो आज योग्य ठरला असल्याचे तो सांगतो.
किती मिळतंय उत्पन्न?
शेतकरी अंशुल मिश्रा सांगतात, आपण २०१८ मध्ये ड्रॅगन फळाच्या लागवडीस सुरुवात केली. ज्यात आपल्याला हळूहळू चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यानंतर सध्या आपण ५ एकरापर्यंत ड्रॅगनची लागवड वाढवली आहे. बाजारात ड्रॅगन फ्रुटला चांगली मागणी असते. ज्यामुळे त्याला प्रति किलो १५० ते २०० रुपयांचा दर हमखास मिळतो. ज्यातून आपल्याला ५ एकरातील २० हजार झाडांपासून सर्व खर्च वजा जाता २५ लाख रुपयांची कमाई सहज मिळत असल्याचे ते सांगतात.
२५ वर्षांपर्यंत मिळते उत्पादन
शेतकरी अंशुल मिश्रा सांगतात, विशेष म्हणजे ड्रॅगन फळाची शेती ही माळरान जमिनीवर देखील केली जाऊ शकते. ठिबक सिंचन व्यवस्थेमुळे या पिकाला पाणी देखील खूप कमी लागते. याशिवाय या पिकाच्या लागवडीतून, एकदा लागवड केल्यानंतर पुढील २५ वर्ष उत्पादन मिळवले जाऊ शकते. ज्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक ड्रॅगन फळाच्या लागवडीकडे वळण्याची गरज आहे. इतकेच नाही तर पारंपारिक पिकांऐवजी फळपिकांना प्राधान्य देण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी शेवटी दिला आहे.