बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा होणार? स्टेट बँकेच्या अध्यक्षांनी दिली मोठी माहिती!
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप या दिशेने ठोस पावले उचलली गेली नाहीत. दरम्यान, शनिवारी (ता.३) स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश खारा यांच्या एक विधानानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे आता नेमका बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा कधी होणार? याची उत्सुकता बँक कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा
यापूर्वी 2024 या यावर्षीच्या सुरुवातीला बँकेच्या कामाचा 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीने जोर पकडला होता. त्यानंतर मार्च महिन्यात ५ दिवसांच्या कामकाजाच्या सप्ताहाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून, आता केवळ अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा होण्याची माहिती समोर येऊ शकलेली नाही.
हेही वाचा : ईपीएफओकडून नियमांमध्ये बदल; आता पीएफ खाते अपडेट करण्यासाठी लागणार ‘ही’ दोनच कागदपत्रे!
काय म्हटलंय एसबीआय अध्यक्षांनी?
शनिवारी (ता.४) देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष दिनेश खारा यांना याबाबत विचारण्यात आले. बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या ५ दिवसांच्या आठवड्याच्या मागणीबाबत सध्या काय अपडेट आहे? याबाबत एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी उत्तर देणे टाळले असून, हा या बैठकीचा मुद्दा नसल्याचे त्यांनी सांगितले. एसबीआय बँकेच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिनेश खारा पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशातील सर्व बँकांच्या तुलनेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कामगारांची संख्या अधिक आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मार्चमध्ये बँक संघटना आयबीए म्हणजेच इंडियन बँक्स असोसिएशनशी करार केला होता. या करारानंतर बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी आणि महिन्याच्या प्रत्येक शनिवारी रविवारसारखी सुट्टी मिळण्यासाठी जास्त काही काळ याबाबत वाट पाहावी लागणार नाही, लवकरच याबाबत निर्णय होईल. असे कर्मचारी संघटनेने सांगितले होते. मात्र, त्याबाबत अजूनपर्यंत कोणताही निर्णय समोर आलेला नाही.
कर्मचारी संघटना, बँक संघटना यांच्यात वाद
सध्याच्या घडीला बँक कर्मचाऱ्यांना महिन्यातील दोन आठवडे शनिवारची सुट्टी मिळते. मात्र उर्वरित दोन आठवड्यात त्यांना सहा ते सहा दिवस काम करावे लागते. बँक कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार वगळता सर्व रविवारी सुटी मिळते, तर पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी त्यांना सामान्य कामकाजाच्या दिवसांप्रमाणे संपूर्ण दिवस काम करावे लागते. याबाबत कर्मचारी संघटना आणि बँक संघटना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.