अफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ; डीआरडीओकडून मिळालीये 1084 कोटींची ऑर्डर!
अलीकडेच बाजारात दाखल झालेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपच्या अफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी (ता.३) बीएसईवर 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 570 वर पोहोचले आहे. कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरलाच्या शेअर्समध्ये ही वाढ मेगा ऑर्डर मिळाल्यानंतर झाली आहे. कंपनीला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ) कडून 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
किती आहे या ऑर्डरचा कालावधी
अफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), संरक्षण मंत्रालयाकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. कंपनीने सांगितले आहे की, ही ऑर्डर मेरीटाईम थिएटर कमांड (एमटीसी) च्या वाढीसाठी एसएएफची निर्मिती आणि विशाखापट्टणम येथे शिप लिफ्ट सुविधेची कार्यशाळा उपकरणे यासाठी आहे. ही ऑर्डर 1084.54 कोटी रुपयांची असून, ती 3 वर्षांत पूर्ण करायची आहे. अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरला सप्टेंबरपर्यंत 19000 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
(फोटो सौजन्य – istock)
बाजार घसरणीतही ‘हा’ शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!
नुकताच आला होता कंपनीचा आयपीओ
अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ 25 ऑक्टोबर 2024 ते 29 ऑक्टोबरपर्यंत खुला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 463 रुपये होती. कंपनीचे शेअर्स 4 नोव्हेंबर 2024 रोजी बीएसईवर 430.05 रुपयांवर सूचीबद्ध झाले. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीचे शेअर्स 474.55 रुपयांपर्यंत वाढले होते.
हा आयपीओ एकूण 2.77 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमधील किरकोळ गुंतवणूकदारांचा विभाग 0.99 पट, कर्मचाऱ्यांचा विभाग 1.77 पट, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII) भाग 5.31 पट आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा भाग 3.99 पट सबस्क्राइब झाला.
कंपनी काय काम करते?
अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर ही मुंबई स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय बांधकाम आणि अभियांत्रिकी कंपनी आहे. पूल, उड्डाणपूल, मेट्रो, रेल्वे मार्ग, बोगदे, महामार्ग, बंदरे आणि सागरी बांधकामे, बॅरेज आणि तेल आणि वायू संरचना यासारख्या पायाभूत सुविधा EPC प्रकल्पांमध्ये कंपनीचा सहभाग आहे. ही कंपनी वर्ष 2000 पासून शापूरजी पालोनजी ग्रुपचा एक भाग आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)