एअरटेल कंपनीचा मोठा निर्णय... बंद करणार ही सेवा; कर्मचाऱ्यांचे काय होणार?
भारती एअरटेल या देशातील आघाडीच्या दूरसंचार सेवा कंपनीने संगीत व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपले विंक म्युझिक ॲप बंद करणार आहे. मात्र, कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकणार नाही. एअरटेलने विंकच्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जगभरातील नामांकित कंपन्या कर्मचारी कपातीचा निर्णय घेत असताना, भारती एअरटेलने आपल्या कर्मचाऱ्यांबाबत हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
कंपनीचा ॲपल म्युझिकसोबत करार
सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेल कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीने ॲपल म्युझिकसोबत करार केला आहे. या विशेष ऑफरद्वारे आपल्या आयफोन वापरकर्त्यांना संगीत सेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे आता कंपनीचे हे विंक म्युझिक ॲप येत्या काही महिन्यांत बंद केले जाणार आहे. कंपनीला संगीत व्यवसाय करायचा नाही. मात्र, सध्या अॅपसाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढून न टाकता, दुसऱ्या विभागांमध्ये स्थलांतरित करणार आहे.
एअरटेलच्या ग्राहकांना ॲपल टीव्हीचा कंटेंट बघायला मिळणार
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विंक प्रीमियमचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या वापरकर्त्यांना एअरटेलकडून विशेष ऑफर देण्यात येणार आहेत. एअरटेल एक्सस्ट्रीम वापरणाऱ्या युजर्सना या वर्षी ॲपल टीव्हीचा कंटेंट बघायला मिळणार आहे. यासाठी तुमच्याकडे एअरटेल प्रीमियम वायफाय आणि पोस्टपेड कनेक्शन असणे आवश्यक आहे. ॲपल म्युझिक आणि ॲपल टीव्ही ऑफर केवळ भारतातील एअरटेल ग्राहकांनाच देण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबईत स्वस्तात घर घ्यायचंय… सिडकोने 902 घरांसाठी काढलीये लॉटरी, आत्ताच करा अर्ज
कंपनीकडून नुकतीच बीटी ग्रुपची खरेदी
अलीकडेच भारती एअरटेलने ब्रिटीश टेलिकॉम कंपनी बीटी ग्रुप खरेदी करत, जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. भारती ग्रुपने बीटी ग्रुपचे सर्वात मोठे शेअरहोल्डर पॅट्रिक द्राही यांच्या अल्टीस ग्रुपमधील 24.5 टक्के भागभांडवल अंदाजे 4 बिलियन डॉलरमध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. या करारासाठी सुनील मित्तल यांनी बार्कलेज बँकेकडून मोठे कर्ज घेतले आहे. याशिवाय हा करार पूर्ण करण्यासाठी भारती समूह आणखी कर्ज उभारण्याचा प्रयत्न करत आहे.






