बँकेच्या चुकीमुळे नक्की काय घडले (फोटो सौजन्य - iStock)
कधीकधी व्यवहारात चुका होणे सामान्य असते. पण जर ही चूक बँकेने केली असेल तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. सिटीग्रुपशी संबंधित असाच एक प्रकरण समोर आले आहे आणि हे प्रकरण साधेसुधे नाही तर बँकेच्या खात्यात इतके पैसे जमा झाले होते की ते पैसे सामान्य माणूस उच्चारूदेखील शकत नाही.
सिटीग्रुपने चुकून एका ग्राहकाच्या खात्यात $81 ट्रिलियन (रु. 7,08,51,14,55,00,00,000) जमा केले, तर प्रत्यक्षात त्याला फक्त $280 (रु. 24,492) पाठवायचे होते. बँकेच्या जुन्या कामकाजाच्या समस्येमुळे ही चूक झाली. जे बराच वेळ होऊनही दुरुस्त होऊ शकले नाही, मुळात ही चूक लगेच लक्षातही आली नाही. यामुळे एकच गडबड आणि गोंधळ उडाल्याचे आता समोर आले आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.
काय आहे ही घटना
फायनान्शियल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ही घटना गेल्या वर्षी एप्रिलमधील असल्याचे सांगितले जात आहे. एका बँकेच्या कर्मचाऱ्याने पेमेंट प्रक्रिया सुरू केली, जी पडताळणीनंतर दुसऱ्या अधिकाऱ्याने मंजूर करावी लागली. पण दोघांनाही ही मोठी चूक पकडता आली नाही. सुमारे दीड तासानंतर, तिसऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्याला खात्यातील शिल्लक रकमेतील तफावत लक्षात आली आणि चूक उघडकीस आली. तथापि, काही तासांतच हा व्यवहार रिव्हर्स करण्यात आला. मात्र ही चूक लक्षात आली नसती तर मात्र नक्कीच घात झाला असता.
बँकेने यावेळी काय सांगितले
सिटीग्रुपने म्हटले आहे की त्यांच्या सुरक्षा यंत्रणेने वेळीच चूक पकडली आणि ती दुरुस्त करण्यात आली. बँकेने दावा केला की त्यांची नियंत्रण व्यवस्था इतकी मजबूत होती की पैसे बँकेतून बाहेर जात नव्हते. बँकेने म्हटले आहे की या चुकीमुळे बँकेचे किंवा कस्टमचे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु यावरून हे स्पष्ट होते की आपल्याला आपल्या मॅन्युअल प्रक्रिया काढून टाकाव्या लागतील आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
ही पहिलीच वेळ नाही
सिटीग्रुपमध्ये अशी चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्ये बँकेकडून अशा १० चुका झाल्या होत्या. या प्रकरणांमध्ये, कर्मचारी चुकून अधिक पैसे ट्रान्सफर करणार होता परंतु ती चूक वेळेवर दुरुस्त करण्यात आली. २०२२ मध्ये अशा १३ घटना घडल्या. या चुकांची तक्रार करणे अनिवार्य नाही, म्हणूनच अशा घटनांबद्दल कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नाही. परंतु बँकिंग तज्ज्ञांच्या मते, १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे चुकीचे व्यवहार दुर्मिळ आहेत.
तेजी-मंदीचा खेळ.., PI Network कॉईन 11 टक्क्यांनी घसरला
९०० मिलियन डॉलरची चूक
२०२० मध्येही सिटीग्रुपने चुकून ९०० दशलक्ष डॉलर्स चुकीच्या खात्यात पाठवले होते, जे त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने ते फेटाळून लावले. या चुकीमुळे बँकेचे तत्कालीन सीईओ मायकेल कॉर्बेट यांना राजीनामा द्यावा लागला आणि बँकेवर मोठा दंड ठोठावण्यात आला. अशी चूक याआधीही झाली आहे आणि यामुळे आता जास्त भर ऑटोमेशनवर देण्यात येणार असल्याचे बँकेनेही सांगितले आहे. मात्र ही चूक अत्यंत मोठी असून वेळीच लक्षात आल्यामुळे एक मोठी चुकीची उलाढाल नक्कीच टळली आहे.