फोटो सौजन्य - Social Media
छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टने (CSMIA) वर्ष २०२४ मध्ये कार्गो ऑपरेशन्समध्ये विक्रमी प्रगती नोंदवत भारतातील एअर फ्रेट नेटवर्कसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो टनेजमध्ये १७ टक्के वाढ झाली असून, २०४ मेट्रिक टनचे आतापर्यंतचे सर्वोच्च दैनंदिन टनेज आणि ४,१०२ मेट्रिक टनचे मासिक टनेज नोंदवले आहे. मार्च २०२४ मध्ये, सीएसएमआयएने ६०,६५९ मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय कार्गो हाताळत विक्रमी उच्चांक गाठला, ज्याने त्याच्या कार्यक्षमतेची आणि जागतिक व्यापारासाठी कटिबद्धतेची साक्ष दिली. संपूर्ण वर्षभरात सीएसएमआयएने ६८७ आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवली, ज्यात त्रिपोली, दमास्कस, आणि चिसिनौ यांसारख्या नव्या गंतव्यांचा समावेश आहे. याशिवाय, देशांतर्गत कार्गो श्रेणीतही उल्लेखनीय प्रगती साधली. आंतरराष्ट्रीय पातळीवर, फार्मास्युटिकल्स (+२४%), कृषी उत्पादने (+२२%), आणि ऑटोमोबाइल गूड्स (+२०%) या श्रेणींमध्ये लक्षणीय वाढ झाली. देशांतर्गत, ऑटोमोबाइल गूड्स (+३१%), इंजिनिअरिंग गूड्स (+२२%), आणि पोस्ट ऑफिस मेल (+१५%) यांनी महत्त्वाची भर टाकली.
ई-कॉमर्स क्षेत्रातही उत्साहवर्धक वाढ दिसून आली, जिथे आंतरराष्ट्रीय शिपमेंट्समध्ये ५३ टक्के तर देशांतर्गत शिपमेंट्समध्ये ११ टक्के वाढ झाली. कृषी निर्यातीत आंब्यांच्या शिपमेंट्स ४,७०० मेट्रिक टनपर्यंत पोहोचल्या. सीएसएमआयएने कार्गो सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. निर्यात विभागात नवीन वेटिंग स्केल आणि मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण यामुळे कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढली आहे. सलग सहाव्या वर्षी ‘कार्गो एअरपोर्ट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळवत सीएसएमआयएने आपले उद्योगातील नेतृत्व सिद्ध केले. शाश्वततेच्या दिशेने १५१ मेट्रिक टन अनक्लिअर्ड कार्गो नष्ट करत पर्यावरणीय जबाबदारीही जपली. डिजिटायझेशनच्या माध्यमातून सीएसएमआयएने एअर कार्गो कार्यप्रक्रियेत लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. एअर कार्गो कम्युनिटी सिस्टीम (एएमएएक्स) आणि डिजिटल आयात डिलिव्हरी सिस्टीम्स यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रियांमध्ये गती, कार्यक्षमता आणि अचूकता आणण्यात आली. यामुळे केवळ कागदी कामकाज कमी झाले नाही, तर ड्वेल टाइम कमी करण्यासही मदत झाली आहे. शिवाय, तुरंत मोबाईल अॅपच्या साहाय्याने तापमान-नियंत्रित कार्गोसाठी रिअल-टाइम शिपमेंट ट्रॅकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे संवेदनशील मालवाहतुकीच्या व्यवस्थापनात अधिक सहजता व विश्वासार्हता आली आहे.
याशिवाय, सीएसएमआयएने २०२४ मध्ये सहा नवीन कार्गो एअरलाइन्स समाविष्ट करत, त्यांच्या क्षमतांमध्ये वाढ केली आहे. यात केनिया एअरवेज, एसएफ एअरलाइन्स आणि सॉलिटएअर यांचा समावेश आहे, ज्यामुळे नवीन गंतव्यांसाठी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाली आहे. या नवकल्पनांमुळे जागतिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्याची सीएसएमआयएची क्षमता वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या क्षेत्रात सीएसएमआयएचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
भारतातील एअर कार्गो उद्योगासाठी सीएसएमआयए एक आदर्श मॉडेल ठरत आहे. पायाभूत सुविधांमधील सुधारणा, डिजिटायझेशनचा प्रभावी वापर आणि कार्यक्षमतेचा आग्रह यामुळे २०२५ मध्येही सीएसएमआयए उद्योगामध्ये नवीन मापदंड निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे भारताच्या जागतिक कार्गो क्षेत्रातील उपस्थिती मजबूत होण्यास मदत होईल.