कामावरून काढून टाकणे मस्क यांच्या अंगलट, कर्मचाऱ्याला 5 कोटी भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश
ट्विटर खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल केले. विशेष म्हणजे एलॉन मस्क हे अनेकदा आपल्या विचित्र गोष्टींमुळे चर्चेत येत असतात. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांनी तात्काळ ऑफिस व्हिजीट दरम्यान एका कार्यालयात भेट दिली होती. ज्यावेळी त्यांनी टॉयलेट कमोडच्या प्रकरणामुळे ट्विटरच्या काही बड्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. अशातच आता एलॉन मस्क यांच्याबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे.
पाच कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश
एलॉन मस्क एका कर्मचाऱ्याला कामावरून केवळ यावरून काढून टाकले होते की, संबंधित कर्मचाऱ्याने एलॉन मस्क यांच्या ई-मेलला रिप्लाय दिला नव्हता. मात्र, आता हा निर्णय टेस्ला आणि स्पेसएक्ससारख्या कंपन्यांचे सीईओ इलॉन मस्क यांना भारी पडला आहे. त्यांना या कर्मचाऱ्याचे पाच कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याप्रकरणी आयर्लंडच्या कामगार न्यायालयाने, एलॉन मस्क यांना मोठा झटका देत, संबंधित कामावरून काढून टाकलेल्कया कर्मचाऱ्याला नुकसान भरपाई म्हणून पाच कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – ‘या’ कंपनीचा 1,590 कोटींचा आयपीओ लवकरच खुला होणार; गुंतवणुकदारांना मोठी संधी!
एलॉन मस्क यांच्यावर उलटले प्रकरण
फॉर्च्युन या नामांकित मासिकाच्या वृत्तानुसार, आयर्लंडच्या कामगार न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर संबंधित कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकल्याचे घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एक्स कंपनीसह एलॉन मस्क यांच्या हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. गॅरी रुनी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, या कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याला आता तब्बल 5.50 लाख युरो (अंदाजे 5 कोटी रुपये) नुकसान भरपाई मिळणार आहे. एलॉन मस्क यांनी तात्काळ प्रभावाने ही नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. असेही न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे संपुर्ण प्रकरण?
एलॉन मस्क यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये ट्विटर विकत घेतले. त्यानंतर लगेचच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला होता. यामध्ये त्यांनी सर्वांना उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले होते. त्यांच्या या मेलला सर्व कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यासाठी एक दिवस देण्यात आला होता. माञ, रुनीने यावर काहीही उत्तर दिलेले नव्हते, ज्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्याला एलॉन मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. माञ, आता न्यायालयाने त्यांना मोठा झटका देत, संबंधित कर्मचाऱ्याला ५ कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.