भारतीय महिलांना सहन करावा लागतोय 'विवाह दंड'; महिलांच्या रोजगारात मोठी घट!
आता लग्न कर, सासरी जाऊन नोकरी कर… बहुतेक भारतीय स्त्रिया आपल्या कुंटूंबातील व्यक्तींकडून हे वाक्य नेहमी ऐकत असतात. यामध्ये अशा महिला आहेत, ज्या लग्नाआधी नोकरी करत आहेत. पण लग्नानंतरही त्या आपली नोकरी सुरू ठेवू शकणार का? यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, लग्नानंतर काम करणाऱ्या भारतीय महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. म्हणजेच भारतीय महिलांना ‘विवाह दंड’ सहन करावा लागत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
महिलांच्या रोजगारात होतीये सातत्याने घसरण
जागतिक बँकेच्या या अहवालात म्हटले आहे की, जर एखाद्या पुरुषाने लग्नानंतर नोकरी केली तर ती चांगली मानली जाते. त्याचे कौतुक केले जाते. महिलांच्या बाबतीत मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. बहुतेक कुटुंबे आपल्या नवविवाहित सुनेला नोकरी करू देत नाहीत. जरी ती स्त्री लग्नाआधी आईवडिलांच्या घरी काम करत असेल. त्यामुळे महिलांच्या रोजगाराचे प्रमाण सातत्याने घसरत आहे.
या अहवालानुसार, भारतात लग्नानंतर महिला रोजगार दर 12 टक्क्यांनी घसरला आहे. जो विवाहपूर्व महिला रोजगार दराच्या जवळपास एक तृतीयांश इतका आहे. मुले नसतानाही लग्नानंतर पुरुषांच्या नोकरीचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांसाठी प्रीमियम 13 टक्के गुण आहे.
(फोटो सौजन्य – istock)
मुलांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी
अहवालात म्हटले आहे की, भारत आणि मालदीवमध्ये लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत अपत्य नसलेल्या महिलांमध्ये विवाहाशी संबंधित नियम कायम राहतात. तर दुसरीकडे स्त्रियाही मुलांच्या जबाबदारीशी निगडीत असल्याचे पाहायला मिळते. यामुळे महिलांना नोकरीही करता येत नाही किंवा त्यांना नोकरी सोडावी लागते.
दक्षिण आशियातही घसरण
महिलांच्या रोजगार दरातील घट केवळ भारतातच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियामध्ये आहे. दक्षिण आशियामध्ये ‘महिला, नोकऱ्या आणि विकास’ या विषयावर लक्ष केंद्रित करूनही महिलांच्या रोजगाराच्या दरात घट झाल्याचे या अहवालातून स्पष्ट समोर आले आहे. 2023 मध्ये, दक्षिण आशियामध्ये केवळ 32 टक्के कार्यरत वयाच्या महिला कार्यरत होत्या. तर पुरुषांचा रोजगार दर ७७ टक्के होता. अशा परिस्थितीत महिलांचा सहभाग फारच कमी राहिला आहे.
…तर वाढेल देशाचा जीडीपी
महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर पुरुषांच्या बरोबरीने वाढवला तर जीडीपी वाढेल, असे अहवालात म्हटले आहे. असे केल्याने दक्षिण आशियाचे प्रादेशिक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 13 ते 51 टक्के जास्त असेल, असे अहवालात म्हटले आहे.