अजब नियम..! विवाहित महिलांना नोकरी नाकारतीये 'ही' दिग्गज कंपनी
आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक जबाबदारी नेटाने पार पाडत आहे. देशातील असे एकही क्षेत्र नाहीये ज्यात महिलांनी आपला ठसा उमटवलेला नाहीये. मात्र, अशातच एका कंपनीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्या कंपनीमध्ये लग्न झालेल्या महिलांना नोकरी दिली जात नाहीये. ही घटना दुसऱ्या देशातील नाही तर भारतातीलच आहे. आघाडीची आयफोन निर्माता कंपनी ॲपल कंपनीची उपकंपनी फॉक्सकॉनमध्ये विवाहित महिलांना नोकरी नाकारली जात आहे.
कुठे घडलीये ही घटना?
चेन्नई येथील फॉक्सकॉन कंपनीच्या आयफोन असेंबली प्लांटमध्ये हा नोकरी देताना भेदभाव करण्याचा प्रकार समोर आला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चेन्नईमधील फॉक्सकॉन कंपनीच्या प्लांटमध्ये विवाहित महिलांना कायमस्वरूपी स्वरूपातील नोकरीची संधी नाकारली जात आहे. हे प्रकरण कंपनीच्या भेदभावरहित धोरणाच्या विरुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सने केलेल्या पडताळणीत 2023 आणि 2024 मध्ये अँपल आणि तिची उपकंपनी फॉक्सकॉनमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने कौटुंबिक जबाबदारी आणि स्रियांवर असणारा सामाजिक दबाव यामुळे कंपनीमध्ये ही प्रथा फोफावली असल्याचे सांगितले जात आहे.
(फोटो सौजन्य : istock)
दोन बहिणींना कंपनीने नाकारली मुलाखत
रॉयटर्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, पार्वती आणि जानकी नावाच्या दोन बहिणींना कंपनीकडून मुलाखत नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या दोघी बहिणी २० वर्षांच्या असून, त्यांना चेन्नई येथील प्लांटमध्ये नोकरीसाठी भेदभावाला सामोरे जावे लागले आहे. मागील वर्षीच्या मार्च 2023 मध्ये नोकरीसाठीची जाहिरात पाहिल्यानंतर या दोघी बहिणी नोकरीसाठीच्या मुलाखतीसाठी चेन्नई येथील प्लांटवर पोहोचल्या होत्या. मात्र, विवाहित आहात का? असा प्रश्न त्यांना प्रवेशद्वारावर विचारण्यात आला होता. दोघीही विवाहित असल्याने त्यांनी उत्तर दिले होते. ज्यामुळे विवाहित असल्याच्या कारणास्तव त्यांना कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच परत पाठवण्यात आले होते.
माजी एचआर अधिकाऱ्यांकडूनही पुष्टी
रॉयटर्सने म्हटल्याप्रमाणे कंपनीच्या या प्रथेबाबत फॉक्सकॉन इंडियाचे माजी एचआर अधिकारी एस. पॉल यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की विवाहित महिलांची असलेली कौटुंबिक जबाबदारी आणि महिलांची गर्भधारणा या बाबी कंपनीच्या कामांमध्ये रिस्क फॅक्टर निर्माण करतात. एस. पॉल यांच्या या दाव्यांना फॉक्सकॉनच्या विविध नोकरदार एजन्सीमधील 17 कर्मचारी आणि माजी एचआर अधिकाऱ्यांनी देखील समर्थन दर्शविले आहे. ते सांगतात, विवाहित महिलांवर तरुणींच्या तुलनेत अधिक जबाबदाऱ्या असतात. आणि त्यामुळे त्यांच्या कंपनीतील कामावर परिणाम होऊ नये, म्हणून त्यांना भरती प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते.
दोन्ही कंपन्यांकडून नकार
रॉयटर्सच्या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, ॲपलने अशा प्रकाराला नकार दिला असून, आपण भारतीय विवाहित महिलांना पूर्ण क्षमतेने रोजगार देत असल्याचे म्हटले आहे. तर ॲपलची उपकंपनी फॉक्सकॉनने नोकरी देताना भेदभाव केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. दोन्ही कंपन्यांनी नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्या संबंधित आचारसंहितेचे पालन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. ज्यामध्ये भरती प्रक्रियेदरम्यान वैवाहिक स्थिती, लिंग, आणि इतर घटकांवर आधारित भेदभावास आपला विरोध असल्याचे म्हटले आहे.