File Photo : Gautam Adani
अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरचे 800 दशलक्ष डॉलर्स शेजारील देश असलेल्या बांगलादेशात अडकले आहेत. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी पॉवर कंपनी ही रक्कम आपल्याला देण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणत आहे. पंतप्रधान शेख हसीना यांना हटवण्यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारला देखील याबाबत जाणीव आहे.
हीच बाब लक्षात घेऊन, बांगलादेश बँकेचे नवीन गव्हर्नर अहसान एच मन्सूर यांनी म्हटले आहे की, जर आम्ही ही रक्कम अदानी पॉवर कंपनीला दिली नाही, तर ते आम्हाला वीज देणे बंद करतील. त्यामुळे आता बांगलादेश सरकारची मोठी गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अंतरिम सरकार करतंय समस्येचे निराकरण
अदानी समूहाकडून बांगलादेशला पुरविली जाणारी वीज झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात असलेल्या अदानी पॉवरच्या प्लांटमधून पुरवली जाते. गव्हर्नर अहसान एच मन्सूर यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अंतरिम सरकार या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अदानी पॉवरची सध्या वीज कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याची सांगितले जात आहे.
हेही वाचा – एचडीएफसी बँकेचा एक निर्णय… अन् जपानचा तिळपापड; भारत-जपानमधील आर्थिक संबंध बिघडणार!
काय म्हटलंय अदानी समुहाने
मात्र, आपण अडकलेले पैसे मिळवण्यासाठी बांग्लादेश सरकारशी बोलत आहे. कर्जदार आणि कोळसा पुरवठादारांनी कंपनीवर दबाव आणला तर कंपनीला कठोर पावले उचलावी लागतील. असेही बांगलादेश करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत अदानी समुहाने म्हटले आहे.
शेजारील देशांमध्ये अदानी समुहाचा झपाट्याने विस्तार
अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत भारताबाहेर झपाट्याने आपला विस्तार केला आहे. बांगलादेशसोबतच अदानी समूहाने श्रीलंका, भूतान आणि नेपाळमध्येही आपली व्याप्ती वाढवली आहे. परंतु, वीज देयकाला विलंब झाल्यास त्याच्या योजनांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारलाही भारतीय व्यावसायिक समूहांचा शेजारच्या देशांमध्ये विस्तार करायचा आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी बाब मानली जात आहे.
अदानी पॉवरसोबतच भारताची एनटीपीसी आणि पीटीसी इंडिया या कंपन्या देखील बांगलादेशला वीज पुरवठा करतात. मात्र, या कंपन्यांच्या पेमेंट स्टेटसबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शेख हसीना सरकार पडल्यानंतर अंतरिम सरकार आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे आता अदानी पॉवरसह बांगलादेश वीज पुरवठा करणाऱ्या या कंपन्या देखील चिंतेत आहेत.