गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी..! 'हिंदुस्तान झिंक' कंपनीचा शेअर 16 टक्के डिस्काउंटसह मिळणार!
शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. अनिल अग्रवाल यांची कंपनी हिंदुस्तान झिंकने आपला स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 16 टक्के सूट देऊन खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना दिली आहे. हिंदुस्तान झिंक कंपनीची ही शेअर विक्री ऑफर 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. तर गुंतवणूकदारांसाठी ती 19 ऑगस्ट 2024 पर्यंत खुली असणार आहे. कंपनीने विक्रीसाठी या ऑफरसाठी 486 रुपये किंमत निश्चित केली आहे. यापूर्वी, हिंदुस्तान झिंकची मूळ कंपनी वेदांताने ओएफएस मार्गाने 3.31 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. जो पूर्वी 2.60 टक्के इतका होता.
11 कोटींऐवजी 16 कोटी शेअर्स विकले जाणार
हिंदुस्तान झिंक ही कंपनी ऑफर फॉर सेलद्वारे 11 कोटींऐवजी 16 कोटी शेअर्स विकणार आहे. कंपनीने हिंदुस्तान झिंकच्या बुधवारच्या बंद किंमतीपासून 16 टक्के सूट देऊन, शेअर किंमत निश्चित केली आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 1.42 टक्क्यांच्या घसरणीसह 571.75 रुपयांवर बंद झाला आहे. त्यामुळे आता 16 ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांना 571.75 रुपयांच्या किमतीवर १६ टक्के सूट मिळून कंपनीचे शेअर खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा : ॲपलची भारतात मोठी झेप; …तोडला 50 वर्षांचा विक्रम, व्यवसायात मोठी वाढ!
दोन टप्प्यांत विकले जाणार शेअर्स
हिंदुस्थान झिंकमधील शेअर्स दोन टप्प्यांत विकले जाणार आहे. शुक्रवारी कंपनी 16 ऑगस्ट 5.14 कोटी शेअर्सचा समावेश असलेला कंपनीचा 1.22 टक्के हिस्सा, गैर-संस्थागत गुंतवणूकदारांना विकणार आहे. तर 19 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीचा स्टॉक हा केवळ बिगर किरकोळ गुंतवणूकदारांना विकला जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये, ओव्हर सबस्क्रिप्शनच्या बाबतीत कंपनीला कंपनीतील 1.95 टक्के अधिक स्टॉक विकण्याचा पर्याय असणार आहे. हिंदुस्तान झिंकमध्ये वेदांताची 64.92 टक्के हिस्सेदारी आहे, तर केंद्र सरकारची जवळपास 29.54 टक्के हिस्सेदारी आहे.
कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती?
हिंदुस्तान झिंकच्या शेअर्सने 2024 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. वर्षभरात कंपनीचा स्टॉक 80 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या दोन वर्षांत 108.9 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 241,582 कोटी रुपये इतके आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसरा अंतरिम लाभांश मंगळवारी, 20 ऑगस्ट 2024 रोजी विचारात घेतला जाईल, अशी माहिती कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी हिंदुस्थान झिंकच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.