...हक्काच्या घराचे स्वप्न धुसर; प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमतीत तब्बल 30 टक्क्यांनी झालीये वाढ!
स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, गेल्या काही वर्षांत हे स्वप्न अनेकांसाठी कठीण होत चालले आहे. देशातील बड्या शहरांमध्ये हे काम आणखीनच कठीण होत आहे. टॉप 7 शहरांमध्ये घरांच्या किमती 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात प्रामुख्याने जमिनीच्या वाढत्या किमती आणि सातत्याने वाढणारा बांधकाम खर्च याला जबाबदार धरले जात आहे. देशातील घरांच्या किमती हैदराबादमध्ये सर्वाधिक वाढल्या आहेत. याशिवाय दिल्ली एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि पुणे येथे घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.
टॉप 7 शहरांमध्ये घरांच्या किमतींत 23 टक्क्यांनी वाढ
रिअल इस्टेट कन्सल्टंट फर्म एनरॉकच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशातील टॉप 7 शहरांमधील घरांच्या किमती वार्षिक आधारावर सरासरी 23 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हैदराबादमध्ये सर्वाधिक 32 टक्के वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआर आणि बेंगळुरूमध्ये 29 टक्के, मुंबई एमएमआरमध्ये 24 टक्के, पुणे आणि चेन्नईमध्ये 16 टक्के आणि कोलकातामध्ये 14 टक्के दर वाढले आहेत. अहवालानुसार, पहिल्या 7 शहरांमधील सरासरी किमती गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत प्रति चौरस फूट रुपये 6,800 वरून 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 8,390 रुपये प्रति चौरस फूटपर्यंत वाढल्या आहेत.
काय आहेत घरांच्या किंमतींच्या वाढीमागील कारणे
घरांच्या किमती गेल्या काही तिमाहीत सातत्याने वाढत आहेत. जमिनीचे भावही सातत्याने वाढत आहेत. सिमेंट, रिबार, गिट्टी, वाळू आणि मजुरांवर होणारा खर्चही वाढत आहे. आलिशान घरांची मागणी वाढल्याने घरांच्या किमतीतही वाढ झाली आहे. ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबरमध्ये घरांची विक्री 11 टक्क्यांनी घसरून, 1,07,060 युनिट्सवर आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 1,20,290 युनिट्स इतकी नोंदवली गेली होती. याशिवाय नवीन घरांच्या पुरवठ्यातही 19 टक्के घट झाली आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये 93,750 नवीन घरे विक्रीसाठी समोर आले होते. तर 2023 मध्ये याच कालावधीत 1,16,220 नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.
शहरनिहाय किती झालीये वाढ
दिल्ली एनसीआरमध्ये सध्या प्रॉपर्टीचे दर 7,200 रुपये प्रति चौरस फूट इतके झाले आहेत. जे एका वर्षापूर्वी 5,570 रुपये प्रति चौरस फूट इतके होते. याशिवाय बेंगळुरूमध्ये घरांच्या किमती 8,100 रुपये प्रति चौरस फूटाने वाढल्या आहेत. जे गेल्या वर्षी 6,275 रुपये प्रति चौरस फूट इतके होते. हैदराबादमध्ये हे दर 5,400 रुपये प्रति चौरस फूट वरून, 7,150 रुपये प्रति चौरस फूट झाले आहेत.
मुंबई एमएमआरमधील घरांच्या किमती 13,150 रुपये प्रति चौरस फूट वरून, 16,300 रुपयांवर गेल्या आहेत. पुण्यात प्रति चौरस फूट ६,५५० रुपयांच्या तुलनेत आता ७,६०० रुपये प्रति चौरस फूट मोजावे लागतात. चेन्नईमध्ये हाच दर 5,770 रुपये प्रति चौरस फूट वरून, 6,680 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे. कोलकात्यात किंमती 5,700 रुपये प्रति चौरस फूट वर गेल्या आहेत. जी एका वर्षापूर्वी 5,000 रुपये प्रति चौरस फूट इतकी होती.