रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही जोरदार यश मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती कोण होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
नवनियुक्त गटनेते, प्रतोद, जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती आणि उपसभापती या सर्वांचा कार्यकाळ हा सव्वा वर्षांचा राहणार आहे. सव्वा वर्षाचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून, तो अंतिम आहे, अशी घोषणा पालकमंत्री सामंत यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी विलास चाळके तर मुख्य प्रतोद म्हणून बाबू माप यांची निवड झाली आहे. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या धोरणाची ही अंमलबजावणी असून पालकमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेला हा सव्वा वर्षाचा फार्मूला आता राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत
पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्व नऊच्या नऊ पंचायत समितीचे सभापती यावेळी शिवसेनेचे असतील. जिल्ह्यात शिवसेनेने भाजपच्या बरोबरीने जे जोरकस काम निवडणुकांमध्ये केले आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील सर्व जिल्ह्यमध्ये निवडणुकीच्या यशात ९४ टक्के यश मिळवून सर्वप्रथम आहे, हे भूषणावह आहे.
पंचायत समिती सभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य
राजापूर, लांजा रत्नागिरी, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण खेड मंडणगड आणि दापोली या सर्व ठिकाणी पंचायत समिती सभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य विराजमान होणार आहे. संगमेश्वरमध्ये पंचायत समिती सभापती पद हे अडीच वर्षासाठी शिवसेनेकडे असेल. गुहागरमधील पंचायत समिती सभापतिपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडे असेल. देवरुख आणि चिपळूण येथे अडीच वर्षाचा कालावधीचे सभापतिपद असेल.
सवता सुभा मांडल्यास कारवाई करणार
निवडणुकीनंतर जिल्ह्यातील मतदारसंघांमधून फिरताना असे आढळून आले आहे की, काही जण आम्ही स्वतः निधी आणला असे लोकांना सांगत आहेत. प्रत्यक्षात हा निधी पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणलेला आहे. त्यामुळे पक्षातीलच काही जण स्वतःचे अस्तित्व वेगळा पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेगळा सवता सुभा उभा करण्याचा प्रयत्न दिसून आला आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे जे काही काम जिल्ह्यात होईल ते पक्षाच्या माध्यमातून आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असेल असेच सांगावे लागेल.






