भारतीय टी-20 फायनल पाहण्यात धुंद; इकडे डिज्नी+हॉटस्टारने केली 1000 कोटींहुन अधिक कमाई!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला टी-20 विश्वचषकाचा फायनल सामना शनिवारी (ता.३०) चांगलाच रंगतदार झाला. मात्र, अनेक जण कामानिमित्त तर काही जण अन्य कारणास्तव घराबाहेर होते. अशातच टी-20 विश्वचषकाचा फायनल सामना पाहण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारने देखील भारतीयांना मोफत सेवा उपलब्ध करून दिलेली होती. त्यामुळे देशभरात सर्वजण आहे त्या ठिकाणी आपापल्या मोबाईलवर ‘याची देही याची डोळा’ विश्वचषकाचा सामना अनुभवत होते
५ कोटीपेक्षा अधिक क्रिकेटप्रेमी पाहत होते सामना
डिज्नी प्लस हॉटस्टारने टी-20 विश्वचषकाचा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनल सामना पाहण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. ज्यामुळे तब्बल पाच कोटीपेक्षा अधिक क्रिकेटप्रेमी हा अंतिम सामना डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहत होते. भारताने या चुरशीच्या सामन्यात सात धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले.
मात्र, आता डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सामना मोफत पाहण्याची सोय असली तरी एका दिवसात कंपनीला करोडोंची कमाई झाल्याचे समोर आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिज्नी प्लस हॉटस्टारने सामना पाहण्यासाठी मोफत सुविधा दिली होती. तर एका दिवसात इतकी बंपर कमाई झाली कशी? तर यामागे कंपनीचे जबरदस्त जाहिरात कौशल्य पाहायला मिळाले आहे.
सेकंदाला 2.5 ते 3 लाखांची कमाई
डिज्नी प्लस हॉटस्टारकडे आयसीसीचे सर्व सामने दाखवण्याचे राईट्स आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स चॅनल्सवर जेव्हा लाईव्ह सामने चालू होते. तेव्हा कंपनीने अंतिम सामन्यासाठी जाहिराती ब्रॉडकास्ट करण्याचे शुल्क प्रति 10 सेंकद 25 ते 30 लाख रुपये याप्रमाणे वाढवले होते. म्हणजेच डिज्नी प्लस हॉटस्टारने अंतिम सामन्यादरम्यान प्रतिसेकंद 2.5 ते 3 लाख रुपयांची कमाई केली, असा अंदाज लावला जात आहे. या आकडेवारीचा विचार करता, मार्केट एक्सपर्टच्या माहितीनुसार, डिस्ने प्लस हॉटस्टारने अंतिम सामन्याच्या एका दिवसातच जाहिरातींमधून तब्बल 1000 कोटी रुपये कमाई झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अंतिम आकडेवारी येणे बाकी आहे.