भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नव्या सुवर्ण अध्याय लिहीला जाणार आहे.
स्वदेशी बुलेट ट्रेनच्या चाचण्या पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले. चाचण्या सुरू झाल्यानंतर दोन ते चार महिन्यांत ही ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली केली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. वडोदरा येथे ‘नमो फॉर विकासित भारत’ कार्यक्रमाला संबोधित करताना ही माहिती देण्यात आली. हाय-स्पीड ट्रेनच्या पहिल्या बॉडी फ्रेमचे काम नुकतेच पूर्ण झाले असून ती स्क्वीझ टेस्टिंगसाठी पाठवण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बुलेट ट्रेनच्या चाचणीबाबत बोलताना वैष्णव म्हणाले, “पुढील वर्षी मे किंवा जूनपर्यंत भारताची स्वतःची बुलेट ट्रेन चाचणीसाठी रुळांवर येईल. २-४ महिन्यांच्या चाचणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनचे उद्घाटन करतील.” केंद्रीय मंत्री म्हणाले की, हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेअंतर्गत तयार केला जात आहे आणि यामुळे वडोदरा व मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही वडोदरा येथून बुलेट ट्रेनने प्रवास कराल, तेव्हा तुम्ही फक्त दीड तासात मुंबईला पोहोचाल इतका सहज प्रवास होणार आहे.”
वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे बांधकाम वेगाने सुरू असून, सुरत-वापी विभाग या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे क्षेत्रातील मोठ्या सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी सरकार रेल्वेची कार्यप्रणाली, आरक्षण प्लॅटफॉर्म आणि बांधकाम नियमांचे आधुनिकीकरण करत असल्याचीही माहिती दिली.
वैष्णव यांनी स्पष्ट केले की, अलिकडच्या वर्षांत अनेक प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यांनी चिनाब पूल आणि मिझोरमला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा उल्लेख केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मते, २८० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून ३६,००० किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, वंदे भारत तंत्रज्ञानावर आधारित मालगाड्याही विकसित केल्या जात आहेत. ते म्हणाले की, कोविड-१९ महामारीच्या आव्हानांना न जुमानता रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, २०२० मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्याच्या कामाला गती मिळाली.






