(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
स्वीडिश थिंक टँक सिप्री (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) च्या एका ताज्या अहवालानुसार, जागतिक संरक्षण निर्यातीच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या मागे आहे. ०.२% हिस्सेदारी घेऊन भारत २७ व्या क्रमांकावर आहे, तर ०.४% हिस्सेदारीमुळे पाकिस्तान २१ व्या क्रमांकावर आहे. हा आकडा आश्चर्यकारक वाटू शकतो, पण हे आकडे आणि परिस्थिती खरी आहे.
या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय समीकरण महत्त्वाची भूमिका बजावतात. संरक्षण निर्यातीत भारतावर पाकिस्तानच्या आघाडीमागे चीन हे सर्वात मोठे कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे, पाकिस्तान स्वतः कोणतीही शस्त्रे बनवत नाही; त्याऐवजी, ते चीनसोबत मिळून जेएफ-१७ थंडर लढाऊ विमानांची जुळणी करते. ही विमाने नंतर म्यानमार, नायजेरिया आणि अझरबैजानसारख्या देशांना विकली जातात. ही आकडेवारी पाकिस्तानच्या संरक्षण निर्यात खात्यात जोडली जाते. त्याचप्रमाणे, आफ्रिका आणि अनेक कमकुवत अर्थव्यवस्था असलेले देश कमी किमतीच्या चिनी शस्त्रांना प्राधान्य देतात आणि पाकिस्तानकडून शस्त्रे आयात करतात, ज्यामुळे त्यांच्या निर्यातीचे प्रमाण वाढलं आहे.
दुसरीकडे, भारताचे लक्ष निर्यातीवर नसून आपले सैन्य मजबूत करण्याकडे नेहमीच राहिले आहे. यामुळेच भारत अनेक दशकांपासून जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश राहिला आहे. पण अशातच आता अशातच या बाजारपेठेत आपला वाटा वाढवण्यासाठी भारताला एक मोठी संधी आहे. सरकार डिफेंस सेक्टरमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचे (FDI) नियम शिथिल करण्याचाही विचार करत आहे.
ही परिस्थिती असली जागतिक संरक्षण निर्यातीत भारताचा वाटा सध्या ०.२% असला तरी, यावर्षी भारताने ३८,४२४ कोटी रुपये म्हणजे ४.६ अब्ज डॉलर्स इतकी आतापर्यंतची सर्वाधिक संरक्षण निर्यात नोंदवली आहे. भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, आकाश हवाई संरक्षण प्रणाली आणि तोफांच्या माध्यमातून आपली संरक्षण निर्यात वेगाने वाढवत आहे. २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट सरकारचे समोर ठेवलं आहे.
सध्या, जगभरातील ८० हून अधिक देश भारताकडून संरक्षण उपकरणे खरेदी करत आहेत. फिलीपिन्सने अलीकडेच भारतासोबत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रासाठी ३७५ दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. इंडोनेशियासोबत ३,८०० कोटी रुपये म्हणजेच ४४० दशलक्ष डॉलर्स किमतीचा एक मोठा करारही सध्या प्रगत टप्प्यात पोहोचला आहे. भारताच्या आकाश हवाई संरक्षण प्रणालीला आर्मेनियासह अनेक आफ्रिकन देशांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे भारत आता बाजारपेठेतमध्ये आपले पाय हळूहळू पसरवत आहे.
आर्मेनिया हा भारताकडून पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरचा एक प्रमुख खरेदीदार देश देखील आहे. भारताकडून संरक्षण उपकरणे खरेदी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि फ्रान्स यांचाही समावेश आहे, जे भारताकडून मोठ्या प्रमाणावर विमानाचे भाग, विमानाचे मुख्य सांगाडे, मिश्रधातू, इलेक्ट्रॉनिक उप-प्रणाली, उच्च दर्जाची संरक्षण-संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर घटक खरेदी करतात.






