उदय सामंतांचा मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. मात्र, जे लोक सातत्याने समाजासाठी निर्णय घेत आहेत, त्यांच्यावरच टीका करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.
जरांगे पाटील यांनी सरकारसमोर 15 मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित तीन मागण्यांवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सामंत यांनी सांगितलं. त्यामुळे जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे, मागण्यांवर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुंबईतील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात अडचणी निर्माण होतील असं कोणतंही पाऊल मनोज जरांगे पाटील यांनी उचलू नये, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.
दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. ज्या मागण्यांवर जरांगे यांचं समाधान झालेलं नाही, त्यावर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजासाठी जरांगे लढत आहेत. समाजाच्या मागण्या मार्गी लागत असतील तर त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं प्रसाद लाड म्हणाले.






