
Khadi Mahotsav 2026 in Mumbai: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत शासनाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज गोयल यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मध्यवर्ती कार्यालयात ‘खादी महोत्सव-२०२६’चे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी’ आणि ‘स्थानिक उत्पादनांना प्राधान्य’ हा संदेश विशेषतः नव्या पिढीपर्यंत, म्हणजेच जनरेशन झेडपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Khadi Mahotsav 2026 in Mumbai:
खादी आणि ग्रामोद्योगातील उत्पादनांचा आधुनिक जीवनशैलीशी मेळ घालणे तसेच देशातील कारागीर आणि ग्रामीण उद्योजकांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्तीय सल्लागार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य दक्षता अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आयोगाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, खादी संस्थांचे प्रतिनिधी, तसेच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) आणि ग्रामोद्योग विकासाशी संबंधित कारागीर व उद्योजक उपस्थित होते.
२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या खादी महोत्सवात खादी उत्पादनांवर २० टक्के, तर ग्रामोद्योग उत्पादनांवर १० टक्के विशेष सवलत देण्यात येत आहे. देशातील १२ राज्यांतील एकूण ७७ संस्थांनी ७७ प्रदर्शन दालनांच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री सुरू केली आहे. यामध्ये खादीशी संबंधित ३६ संस्था, पीएमईजीपीशी संबंधित ३३ संस्था आणि ग्रामोद्योग व इतर योजनांशी संबंधित ८ संस्थांचा समावेश आहे.
गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांतील संस्थांनी या महोत्सवात सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात खादीचे कापड, रेशीम खादी, पॉली-खादी, तयार कपडे, हर्बल उत्पादने, खाद्यपदार्थ, साबण, अगरबत्ती, मसाले, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लाकडी खेळणी, पिशव्या, फुलकारी वस्त्रकला, आवळ्यापासून तयार केलेली उत्पादने आणि लाकडी हस्तकला अशा विविध स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे.
या प्रसंगी बोलताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल म्हणाले की, “राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात खादीला स्वावलंबन आणि आर्थिक स्वयंपूर्णतेचे प्रतीक बनविले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वदेशीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. तरुण पिढीचा खादीशी विशेष संबंध निर्माण होऊ शकतो. नव्या पिढीतील ऊर्जाशक्ती, सर्जनशीलता, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि उद्योजकतेची वृत्ती यांमुळे स्वदेशी चळवळ अधिक व्यापक स्तरावर जनसहभागाशी जोडली जाऊ शकते.”
ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधानांचा ‘हर घर स्वदेशी, घर-घर स्वदेशी’ हा संदेश केवळ स्वदेशी वस्तूंच्या खरेदीपुरता मर्यादित नाही. भारतीय उत्पादनांविषयी अभिमानाची भावना निर्माण करणे, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे आणि देशाची आर्थिक स्वयंपूर्णता अधिक बळकट करणे, हा या संदेशामागील मोठा उद्देश आहे. या अभियानात तरुणांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. आपल्या निवडी, जीवनशैली, डिजिटल माध्यमे आणि उद्योजकीय उपक्रमांच्या माध्यमातून तरुण स्वदेशी उत्पादनांना समाजात नवी ओळख मिळवून देऊ शकतात.
गोयल म्हणाले की, “आजची तरुण पिढी फॅशन, रचना, तंत्रज्ञान आणि नवनवीन संकल्पनांविषयी जागरूक आहे. आधुनिक रचनांचा वापर, आकर्षक वस्त्रप्रकार, प्रभावी ब्रँडिंग आणि बदलत्या जीवनशैलीशी सुसंगत सादरीकरण यांच्या माध्यमातून तरुणांमध्ये खादी अधिक लोकप्रिय करता येईल. खादीचे नैसर्गिक स्वरूप, भारतीय वारशाशी असलेले नाते आणि शाश्वत जीवनशैलीशी असलेला संबंध यांमुळे खादी ही नव्या पिढीसाठी एक अर्थपूर्ण निवड ठरू शकते.
खादीचे पारंपरिक स्वरूप जपतानाच बदलत्या काळानुसार तिचे सादरीकरण आणि विपणन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुण केवळ स्वदेशी उत्पादनांचे ग्राहक न राहता त्यांचे ब्रँड प्रतिनिधी, वस्त्ररचनाकार, डिजिटल माध्यमांद्वारे प्रसार करणारे आणि उद्योजक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समाजमाध्यमे, ऑनलाइन व्यापार, डिजिटल विपणन आणि नवउद्योग यांच्या माध्यमातून तरुण खादी व ग्रामोद्योगातील उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतात. त्याचबरोबर या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासही मदत करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘विकसित भारत @ २०४७’ आणि ‘स्थानिक उत्पादनांना प्राधान्य’ ही संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने ‘बात खादी की’ या ध्वनिमुद्रित संवादमालेचा उपक्रम सुरू केला असल्याचेही त्यांनी सांगितले. खादीचा वारसा, नवनवीन प्रयोग, आधुनिक फॅशन आणि युवा उद्योजकता या विषयांवर संवाद साधून जनरेशन झेडला स्वदेशी चळवळीशी जोडणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या माध्यमातून खादीला नव्या पिढीच्या आवडी-निवडी आणि आधुनिक जीवनशैलीशी जोडण्यास मदत होणार असून, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्थानिक ते जागतिक’ हा संदेश पुढे नेत स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, ही खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी असल्याचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल यांनी सांगितले. यासाठी उत्पादनांचा दर्जा, आधुनिक रचना, आकर्षक पॅकेजिंग, प्रभावी ब्रँडिंग आणि डिजिटल बाजारपेठांपर्यंत पोहोच यांना विशेष महत्त्व देणे आवश्यक आहे.
या परिवर्तनात नव्या पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. तरुण वस्त्ररचनाकार खादीचा आधुनिक फॅशनशी मेळ घालू शकतात, डिजिटल उद्योजक तिच्या बाजारपेठेचा विस्तार करू शकतात, तर नवउद्योग पारंपरिक उत्पादनांसाठी नवीन व्यवसाय आराखडा विकसित करू शकतात. यामुळे स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल आणि भारतीय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या संधी मिळतील.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनामुळे आणि धोरणांमुळे खादी व ग्रामोद्योग क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राची उलाढाल १.८७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली असून, या क्षेत्रातून २.०४ कोटींपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.” येत्या काही वर्षांत खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राची उलाढाल २.५१ लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.