
Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
राजुरा ते गोविंदपूरदरम्यानचा ५६.१८० किलोमीटर लांबीचा चारपदरी महामार्ग दोन राज्यांतील दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक होते. त्यामुळे रस्त्याची नियमित स्वच्छता आवश्यक आहे. यांत्रिक सफाई यंत्रामुळे कमी वेळेत धूळ आणि कचरा हटविणे शक्य होणार असून, वाहनधारकांना धुळीचा होणारा त्रासही कमी होण्यास मदत होईल.
महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी एक मोठा पूल, २८ छोटे पूल, ६६ कल्व्हर्ट आणि तीन वाहन भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. रस्तेरेषा, दिशादर्शक फलक, क्रॅश बॅरिअर, रेट्रो रिफ्लेक्टर आणि पथदिव्यांमुळे वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होते. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी नॉईज बॅरिअर, तसेच बसथांबे आणि स्वच्छतागृहांची सुविधाही उपलब्ध आहे.
अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध आहे. साधारण १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात येते.
महामार्गाच्या मध्यभागी वृक्षारोपण करण्यात आले आहे. दर दहा किलोमीटरवर बोअरवेलची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती असून, पावसाचे पाणी साठविण्यासाठी १२० ठिकाणी जलसंधारणाची व्यवस्था करण्यात येत आहे. महामार्गाच्या निर्मितीदरम्यान ५५ हजारांहून अधिक वृक्षांचे रोपण किंवा पुनर्लागवड करण्यात आली आहे.
महामार्गाचा काही भाग वनक्षेत्रातून जात असल्याने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये एलिव्हेटेड रोड, वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग आणि सूचना फलकांचा समावेश आहे. यामुळे वन्यप्राणी आणि वाहनांमधील संभाव्य संघर्ष कमी होण्यास मदत होईल.