देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा घसरला, गुजरातची मोठी झेप, वाचा... सविस्तर!
देशातील एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा हा नेहमीच सर्वाधिक राहिला आहे. मात्र, गेल्या 12 वर्षात तो 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या कामकाजाच्या पेपरनुसार, 2010-11 मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 15.2 टक्के इतका होता. जो 2020-21 मध्ये 13 टक्क्यांवर आला. 2023-24 मध्ये तो 13.3 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
गुजरातचा वाटा लक्षणीयरीत्या वाढला
गेल्या दोन दशकांमध्ये गुजरातने भारताच्या जीडीपीमध्ये आपला वाटा लक्षणीयरीत्या वाढवला असल्याचे या अहवालातील पेपरमध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय जीडीपीमध्ये गुजरातचा वाटा 2010-11 मध्ये 7.5 टक्के होता. जो 2022-23 मध्ये वाढून 8.1 टक्के झाला आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत गुजरातचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्याचेही या पेपरमध्ये म्हटले आहे.
निवडणुकीत गाजणार मुद्दा
‘रिलेटिव्ह इकॉनॉमिक परफॉर्मन्स ऑफ इंडियन स्टेट्स: 1960-61 ते 2023-24’ या शीर्षकाचा वर्किंग पेपर, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) सदस्य अर्थशास्त्रज्ञ संजीव सन्याल आणि संयुक्त संचालक आकांक्षा अरोरा यांनी लिहिला आहे. यामध्ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे आता गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राची घसरलेली आर्थिक कामगिरी हा मुद्दा विरोधक विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजवू शकतात, असे मानले जात आहे.
हे देखील वाचा – सचिन तेंडुलकरच्या 5 कोटींचे झाले 72 कोटी! ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल!
दोन दशकांत राज्यात अनेक सरकारे
दरम्यान, गेल्या दोन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली. महाराष्ट्रात 2009 ते 2014 या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. त्यानंतर 2014-19 या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती. त्यानंतर 2019 ते 2022 दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एमव्हीए आघाडीचे सरकार सत्तेत होते. 2022 नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत आहे.
महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी स्थिर
याशिवाय पेपरमध्ये असेही म्हटले आहे की, गेल्या दशकात जीडीपीमध्ये थोडीशी घसरण झाली असली तरी संपूर्ण कालावधीत (1960-61 ते 2023-24) महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी स्थिर राहिली आहे. सध्याच्या घडीला देशाच्या एकूण राष्ट्रीय जीडीपीमध्ये त्याचा सर्वाधिक वाटा आहे. गुजरातच्या संदर्भात हा पेपर म्हणतो की, राष्ट्रीय जीडीपीमध्ये त्याचा वाटा 1960-61 आणि 2000-2001 दरम्यान समान पातळीवर राहिला आहे. मात्र, त्यानंतर ते झपाट्याने वाढू लागले आहे.