उत्पादन क्षेत्रातील रोजगारात 7.4 टक्क्यांनी वाढ, ठरलीये दशकभरातील सर्वाधिक वाढ
कोरोना काळानंतर देशातील रोजगार क्षेत्राला अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षात उत्पादन क्षेत्रातील उद्योगांमध्ये रोजगारात वाढ झाली आहे. ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, उत्पादन उद्योगांमधील एकूण अंदाजित रोजगारामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7.4 टक्क्यांनी मजबूत वाढ दिसून आली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये रोजगार 1.72 कोटींवरून 2022-23 मध्ये 1.84 कोटींपर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे ही एका दशकातील या क्षेत्रातील सर्वाधिक वाढ असल्याचे समोर आले आहे.
ही आहेत आघाडीची राज्ये
तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्य उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक लोकांना रोजगार देणारी शीर्ष पाच राज्ये आहेत. ही राज्ये मिळून 2022-23 या वर्षातील एकूण उत्पादन क्षेत्रातील रोजगारामध्ये सुमारे 55 टक्के योगदान देत आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील वार्षिक सर्वेक्षणाच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की, औद्योगिक उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. निष्कर्षांनुसार, 2021-22 या वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये सध्याच्या किंमतींवर सकल मूल्यवर्धित 7.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हे देखील वाचा – वडिलांच्या वारशातून उभारली तब्बल 12 हजार कोटींची कंपनी; देशभरात बनला प्रसिद्ध ब्रँड!
इनपुट 24.4 टक्क्यांनी वाढले
2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये क्षेत्रातील इनपुट 24.4 टक्क्यांनी वाढले. तर उत्पादन 21.5 टक्क्यांनी वाढले, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये गुंतवणूक केलेले भांडवल, निविष्ठा, आउटपुट, जीव्हीए, रोजगार आणि मजुरी यांसारख्या बहुतांश महत्त्वाच्या आर्थिक बाबींसाठी या क्षेत्राने वाढ पाहिली आणि अगदी पूर्ण मूल्याच्या दृष्टीने महामारीपूर्व पातळीही ओलांडली आहे.
कोरोनानंतर रोजगारात 22.14 लाखांनी वाढ
2022-23 मध्ये रोजगारात झालेली ही वाढ प्रामुख्याने बेस मेटल, कोक आणि रिफाइंड पेट्रोलियम उत्पादने, अन्न उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि मोटार वाहन निर्मिती उद्योग यामुळे झाली आहे. एकूणच, या उद्योगांनी क्षेत्राच्या एकूण उत्पादनात सुमारे 58 टक्के योगदान दिले असून, उत्पादन वाढ 24.5 टक्के आणि जीव्हीए वाढ 2.6 टक्के दर्शविली आहे. “२०२२-२३ मध्ये या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांची अंदाजे संख्या कोरोना महामारीपूर्व पातळीपासून (म्हणजे 2018-19) 22.14 लाखांनी वाढली आहे,” असे एएसआयच्या निष्कर्षात म्हटले आहे. याशिवाय, मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी मोबदल्यात देखील वाढ झाली आहे. तसेच, 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये या क्षेत्रात गुंतलेल्या प्रति व्यक्ती सरासरी मोबदला 6.3 टक्क्यांनी वाढला आहे.