फोटो सौजन्य - Social Media
केवळ आवडीसाठी सुरू केलेल्या कपकेक विक्रीचा व्यवसाय आज लाखोंच्या उलाढालीत पोहोचला आहे. बंगळुरूतील मेघना जैन यांनी 2018 मध्ये ‘ड्रीम ए डझन’ या ब्रँडअंतर्गत कपकेकचा स्टार्टअप सुरू केला. आज त्यांचा व्यवसाय वर्षाला सुमारे 1 कोटी रुपये कमावतो. शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी अनुभवातून शिकत आपल्या व्यवसायाला आकार दिला आणि यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा प्रवास पार केला.
मेघनाने केक बनवण्याची कला आपल्या शेजारणीकडून 2011 मध्ये शिकली. त्यानंतर ती दर रविवारी कपकेक तयार करून सोमवारी कॉलेजमध्ये विकत असे. सुरुवातीला हा केवळ एक छंद होता, पण तिच्या कपकेकना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि व्यवसायाची कल्पना रुजली.
कॉलेजमध्ये झालेल्या एका बिझनेस आयडिया स्पर्धेत तिला तिसरे स्थान मिळाले आणि इंडियन एंजेल नेटवर्कसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर शिक्षण पूर्ण करायचं की पूर्ण वेळ व्यवसाय करायचा, या द्विधा मनःस्थितीत मेघनाने शिक्षण पूर्ण करणे पसंत केले. शिकत असतानाही कपकेक विक्री सुरू ठेवली आणि महिन्याला 7-8 हजार रुपयांची कमाई होत होती. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘इनर शेफ’ या फूड टेक कंपनीमध्ये वर्षभर काम केले आणि त्यानंतर स्वतःच्या डेसर्ट ब्रँडवर लक्ष केंद्रित केले.
स्टारबक्समध्ये नोकरीसाठी अर्ज केल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा तिथून ऑफर आली, तेव्हाही त्यांनी नोकरी ऐवजी स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवला. 2018 मध्ये ‘ड्रीम ए डझन’ सुरू झाले. काही महिन्यांतच त्यांनी व्यवसाय घराच्या किचनमधून दोन खोल्यांच्या जागेत नेला आणि 2020 मध्ये मोठ्या कमर्शियल किचनमध्ये स्थलांतर केले. मात्र, त्याचवेळी कोरोनामुळे व्यवसाय थांबवावा लागला. या अडचणींच्या काळातही मेघनाने हार न मानता आपल्या टीमला नवीन तंत्रज्ञान शिकवले. या काळात त्यांच्या व्यवसायात झपाट्याने वाढ झाली. महामारीपूर्वी महिन्याला 1.5 लाखांची उलाढाल करणाऱ्या ब्रँडने 2020-21 मध्ये 30 लाखांची कमाई केली. आज ‘ड्रीम ए डझन’ वर्षाला सुमारे 1 कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.