मुंबई जगाची आर्थिक राजधानी होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!
“केंद्र सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करणार आहे. मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य बनवणार आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच महाराष्ट्रात
लोकसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाला (बीजेपी) महाराष्ट्रात दोन आकडी पल्लाही गाठता आला नाही. तर मित्र पक्षांची देखील पुरती वाताहत झाली. त्यानंतर आता प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आज (ता.१३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई-ठाण्यातील अनेक विकासकामांचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
29 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उदघाटन
“महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. आज आपण मुंबईतील एकूण 29 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केले आहे. येत्या काळात मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तसेच देशाच्या जनतेला तिसऱ्यांदा भाजपला साथ दिली आहे.
त्यामुळे आता केंद्र सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात अधिक वेगाने काम करणार आहे. यामध्ये देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय केंद्र सरकारने निश्चित केले आहे. तर मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.