एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लवकरच खूला होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी!
एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी असलेली कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ 18 नोव्हेंबर रोजी उघडण्याची शक्यता आहे. तारखा अद्याप कंपनीने अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत. एनटीपीसी ग्रीन एनर्जी सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करेल. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ज्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी (ता.8) एनटीपीसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक कायम ठेवली त्यांना भागधारकांचा कोटा मिळेल.
उपलब्ध माहितीनुसार याशिवाय एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी किमतीत सूट असू शकते. तसेच त्यांच्यासाठी वेगळा कोटा असू शकतो. सेबीने एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या 10,000 कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. कंपनीने 18 सप्टेंबर 2024 रोजी सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला होता. ज्यामुळे आता लवकरच या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक; हातात साधे घड्याळही घालत नाही… वाचून चाट पडाल!
जीएमपी काय?
इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ आज 25 च्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. ग्रे मार्केट हा एक अनौपचारिक आणि अनियंत्रित बाजार आहे. या ठिकाणी शेअर्सची खरेदी-विक्री शेअर बाजारात सूचीबद्ध नसली तरीही केली जाते. या बाजारातील व्यवहार वैयक्तिकरित्या होतात. असे व्यवहार नियामक क्षेत्राबाहेर होत असले तरी ते बेकायदेशीर मानले जात नाहीत.
ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय?
ग्रे मार्केट प्रीमियम ही अतिरिक्त किंमत आहे. जी गुंतवणूकदार शेअर बाजारात शेअर्स सूचीबद्ध होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये देण्यास तयार असतात. ट्रेडर्सच्या परस्पर विश्वासावर आधारित ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची अनौपचारिकपणे खरेदी-विक्री केली जाते. उदाहरणार्थ, आयपीओसाठी किंमत 500 रुपये प्रति शेअर असेल आणि शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 520 रुपयांवर ट्रेडिंग करत असेल आयपीओचा जीएमपी 20 रुपये असेल.
एनटीपीसीच्या शेअर्सवर तज्ज्ञांची तेजी
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एनटीपीसी शेअर्सना बाय टॅग दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने सांगितले की, ‘कंपनीची ऑपरेशनल क्षमता 3.2 गिगावॅट आहे. कंपनीच्या 12 जीडब्लू क्षमतेच्या अक्षय प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. तसेच 11 गिगावॅट प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. कंपनी आपल्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांची क्षमता वाढवण्यावर तसेच कॉर्पोरेट्स आणि पीएसयूच्या अक्षय ऊर्जा गरजांसाठी संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. एनटीपीसीने आर्थिक वर्ष 2032 पर्यंत 60 जीडब्लूचे लक्ष्य ठेवले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)