ग्राहकांचा सोने खरेदीकडे वाढला कल (फोटो- सोशल मीडिया)
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफ बाजार झळाळला
दरात घसरण झाल्याने ग्राहकांची पावले दुकानांकडे
ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी
पिंपरी: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक नगरीतील सराफ बाजारात सध्या उत्साहाचे उधाण आले आहे. जागतिक स्तरावर आखाती युद्धाचे सावट असतानाही, सोन्याचे दर स्थिर आणि तुलनेने कमी झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि परंपरेचा मेळ साधत नागरिक या सणाचे सोने करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
युद्धाच्या सावटात सोन्याला ‘झळाळी’
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आहे. अशा काळात चलनाचे मूल्य घसरण्याची भीती असल्याने गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा सोन्याकडे वळला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ऐतिहासिक उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या दरात आता लक्षणीय घट झाली आहे. ही दरवाढ थांबल्याने आणि दर कमी झाल्याने सामान्य ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे.
लग्नासाठी विशेष पसंती: आधुनिक डिझाइन्सची भुरळ
आगामी लग्नसराई लक्षात घेता, अनेक कुटुंबे आताच दागिन्यांची खरेदी उरकत आहेत. यंदाच्या लग्नसराईत ‘लाईट वेट’ आणि ‘अँटिक’ डिझाइन्सना मोठी मागणी आहे. नववधू-वरांच्या पोशाखाला साजेसे असे कस्टमाइज्ड दागिने बाजारात उपलब्ध आहेत. केवळ सोनेच नव्हे, तर पाडव्याच्या पूजेसाठी आकर्षक चांदीच्या गुढ्यांनाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे? गुढी उभारण्याची पद्धत जाणून घ्या
केवळ सोनेच नाही, तर हिरे आणि प्लॅटिनमचीही क्रेझ
यंदा पाडव्याला सोन्यासोबतच हिऱ्याच्या अंगठ्या आणि प्लॅटिनमच्या ‘बँड्स’नाही मागणी वाढली आहे. ‘युनिक’ आणि ‘क्लासी’ लूक हवा असलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला आणि पुरुषांची पावले या आधुनिक धातूंच्या खरेदीकडे वळत आहेत. एकूणच, यंदाचा पाडवा पिंपरी-चिंचवडच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देणारा ठरणार आहे.
“गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी केलेली खरेदी भाग्याची मानली जाते. सध्या आखाती देशातील युद्धामुळे दरात घसरण झाली आहे. यामुळे यंदा गुढीपाडवाला ग्राहकांना सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे.
— गणेश कटारिया, सुनीती ज्वेलर्स, चिंचवड
Gudi Padwa 2026: ‘पुरणपोळी’ गोड होणार; चणाडाळ, साखरेच्या दरात घट, मात्र इंधन….
मार्च महिन्यातील सोन्याच्या दरातील चढ-उतार (प्रति १० ग्रॅम)
सोन्याच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. खालील तक्त्यावरून मार्च महिन्यातील बदलाचा आढावा घेता येईल:
दिनांक दर (रुपयांमध्ये) घट/बदल
०१ मार्च १,७३,८३४. महिन्याचा उच्चांक
०५ मार्च १,६४,७८३ ₹ ९,००० (घट)
१० मार्च १,६१,६८०. ₹ ३,१०० (घट)
१३ मार्च १,६०,६९० ₹ ९९० (घट)
१६ मार्च १,५९,१७० ₹ १,५२० (घट)
१७ मार्च १,५८,४५० ₹ ७२० (घट)
१८ मार्च १,५७,८०० ₹ ६५० (घट)






