अमेरिकन बर्गर किंग कंपनीला झटका, आता पुण्याच्या कंपनीला मिळाले बर्गर किंगचे पेटंट
बर्गर किंग ही अन्नप्रक्रिया क्षेञातील आघाडीची कंपनी असून, जगातील 100 देशांमध्ये सुमारे 13 हजार रेस्टॉरंट्स ती चालवते. पण, कंपनीला भारतात एका अनोख्या समस्येचा सामना करावा लागला. भारतातील पुणे या ठिकाणी बर्गर किंग नावाचे जुने आणि लोकप्रिय रेस्टॉरंट सुरु होते. असे असतानाही अमेरिकन कंपनीने हे नाव भारतात वापरले. ज्यामुळे पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात याप्रकरणी गेल्या १३ वर्षांपासून खटला सुरु होता. ज्यात पुण्यातील कंपनीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला आहे. ज्यामुळे आता अमेरिकन बर्गर किंग कंपनीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
१३ वर्षांपासून प्रकरण होते न्यायप्रविष्ट
पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात हे प्रकरण गेल्या १३ वर्षांपासून न्यायप्रविष्ट होते. पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या रेस्टॉरंटच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला आहे. अमेरिकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनची याचिका फेटाळत असल्याचे जिल्हा न्यायाधीश सुनील वेद पाठक यांनी 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. अमेरिकन कंपनी बर्गर किंगने पुणे येथील रेस्टॉरंट कंपनीवर ट्रेडमार्क उल्लंघनासह अनेक आरोप केले होते. पुण्यातील कंपनीला त्यांचे नाव वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी अमेरिकन कंपनीने न्यायालयाकडे केली होती. याशिवाय त्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात यावी. असेही कंपनीने न्यायालयाकडे केलेल्या मागणीत म्हटले होते.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – जगातील चार विकसनशील देशांपैकी एक देश अधिक गरीब होणार – अर्थमंत्री सीतारामन
काय म्हटलंय न्यायालयाने आपल्या निकालात
पुण्यातील कॅम्प परिसरात सुरु असलेले बर्गर किंग रेस्टॉरंट अनाहिता आणि शापूर इराणी हे चालवतात. कॅम्प आणि कोरेगाव भागात त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. पुण्यातील ग्राहकांमध्ये त्यांची विशेष क्रेझ आहे. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटले आहे की, पुण्याच्या रेस्टॉंरंटचे बर्गर किंग हे नाव 1992-93 पासून वापरले जात आहे. अमेरिकन बर्गर कंपनी त्यानंतर काळात भारतात आली. त्यामुळे अमेरिकन कंपनी भारतात येण्याच्या अगोदरपासून पुण्याची कंपनी हे नाव बराच काळ वापरत होती. अशा स्थितीत त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.
२०१४ मध्ये बर्गर किंगचा भारतात शिरकाव
अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बर्गर किंगची स्थापना 1954 मध्ये झाली आहे. तिची सुरुवात जेम्स मॅकलॅमोर आणि डेव्हिड एडगरटन यांनी केली होती. ही कंपनी सध्याच्या घडीला 100 हून अधिक देशांमध्ये 13 हजार रेस्टॉरंट चालवते. या रेस्टॉरंटपैकी 97 टक्के या कंपनीची मालकी आहे. ही जगातील दुसरी सर्वात मोठी फास्ट फूड हॅम्बर्गर कंपनी मानली जाते. यामध्ये सुमारे 30,300 लोक काम करतात. 1982 मध्ये कंपनीने प्रथमच आशियामध्ये प्रवेश केला. माञ, भारतात मध्ये प्रवेश करण्यासाठी या कंपनीला वर्ष २०१४ ची वाट पाहावी लागली. नवी दिल्ली, मुंबई आणि पुणे येथून कंपनीने आपल्या भारतातील व्यवसायाची सुरुवात केली.