फोटो सौजन्य - Social Media
आजच्या गतिशील जगात, महिला प्रवाशांची सुरक्षा ही केवळ चर्चा करण्याचा विषय राहिलेली नसून ती एक अनिवार्य गरज बनली आहे. विशेषतः, नवीन ठिकाणी प्रवास करताना महिलांसाठी सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरते. अनेक पर्यटन प्लॅटफॉर्म आकर्षक अनुभवांवर भर देतात, मात्र प्रवासाच्या सुरक्षिततेला तुलनेने कमी महत्त्व दिले जाते. याच पार्श्वभूमीवर रिलायंस जनरल इन्शुरन्सने पिंक स्टार सेफ्टी रेटिंग सादर केले आहे, जे महिला प्रवाशांसाठी एक अभूतपूर्व सुरक्षा उपाय ठरणार आहे.
ही नवीन प्रणाली महिलांना भारत आणि जगभरातील गंतव्यस्थानांचे सुरक्षिततेच्या निकषांवर मूल्यमापन करण्यास मदत करेल. अत्याधुनिक AI आणि डेटा विश्लेषण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, हा उपक्रम कोणत्याही ठिकाणची गुन्हेगारी पातळी, नजीकचे पोलीस स्टेशन व रुग्णालय, सार्वजनिक सुविधा, आणि इतर महत्त्वाचे घटक यांचा रिअल-टाइम डेटा उपलब्ध करून देतो. त्यामुळे महिला प्रवासी अचूक, विश्वसनीय आणि डेटा-आधारित सुरक्षितता रेटिंग मिळवू शकतील, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक निर्भय आणि नियोजित होईल.
रिलायंस जनरल इन्शुरन्सचे सीईओ श्री. राकेश जैन यांनी सांगितले की, “सुरक्षा ही केवळ गरज नाही, तर ती स्वातंत्र्याचा खरा आत्मा आहे. पिंक स्टार सेफ्टी रेटिंगच्या माध्यमातून आम्ही जागतिक पातळीवरील या चिंतेला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. जसे हॉटेल किंवा वाहनाची रेटिंग तपासली जाते, तसेच प्रवासाच्या सुरक्षिततेची खात्री करणे गरजेचे आहे. आमचा उद्देश हा महिलांना सक्षम करणे आणि त्यांना प्रत्येक प्रवासात सुरक्षिततेचा अनुभव मिळावा, हा आहे.”
या उपक्रमाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध प्रवासी कंटेंट क्रिएटर कामिया जानी यांची निवड करण्यात आली आहे. कर्ली टेल्सच्या संस्थापक म्हणून, प्रवासी अनुभव शेअर करण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्या या मोहिमेचा प्रभावी चेहरा ठरल्या आहेत. हा उपक्रम महिला प्रवाशांसाठी सार्वत्रिक स्वीकृत सुरक्षा मानक निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. एकटीने प्रवास करायचा असो वा गटात, महिलांना विश्वसनीय डेटा आणि सुरक्षिततेचे संपूर्ण मूल्यांकन यामुळे अधिक आत्मविश्वासाने प्रवास करता येईल. विशेषतः शहरांपासून दुर्गम भागांपर्यंत किंवा प्रसिद्ध पर्यटनस्थळांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी महिलांना अधिक सुरक्षित आणि सुज्ञ निर्णय घेता येतील.