Swiggy (Photo Credit- X)
Swiggy Platform Fee: फूड डिलिव्हरी ॲप स्विगीवरून (Swiggy) जेवण ऑर्डर करणे आता महाग झाले आहे. कंपनीने सलग तीन आठवड्यांमध्ये तिसऱ्यांदा आपली प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. आता प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना 15 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि कंपनीचा तोटा कमी करण्यासाठी स्विगीने हे पाऊल उचलले आहे.
यापूर्वी 15 ऑगस्टला स्विगीने ही फी 14 रुपयांपर्यंत वाढवली होती, परंतु नंतर ती 12 रुपये केली. आता पुन्हा एकदा ऑर्डरची संख्या वाढल्यामुळे कंपनीने ही फी 15 रुपये केली आहे. ही फी डिलिव्हरी चार्ज, जीएसटी आणि रेस्टॉरंट फी व्यतिरिक्त वेगळी घेतली जाते. विशेष म्हणजे, ही फी प्रत्येक शहरात आणि प्रत्येक दिवशी सारखी नसते, तर मागणीनुसार ती बदलत राहते.
झोमॅटोनेही सणासुदीच्या काळात आपली प्लॅटफॉर्म फी वाढवून 12 रुपये केली आहे. दोन्ही कंपन्या सुरुवातीला फक्त जास्त मागणी असलेल्या दिवसांमध्ये याची चाचणी करतात आणि जर ग्राहकांवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही, तर ही फी कायम करतात.
#JustIn | #Swiggy hikes platform fees to ₹15, third hike in three weeks pic.twitter.com/s3PGdESXA3
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) September 3, 2025
स्विगीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे 20 लाखांहून अधिक ऑर्डर येतात. जर प्रत्येक ऑर्डरवर 15 रुपये फी घेतली, तर कंपनीला दररोज सुमारे 3 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. तिमाहीमध्ये हे सुमारे 54 कोटी आणि वार्षिक 216 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न असेल.
सध्या स्विगीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY26) कंपनीचा तोटा सुमारे 96 टक्क्यांनी वाढून 1,197 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर उत्पन्न 54 टक्क्यांनी वाढून 4,961 कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे, झोमॅटोचा नफा 25 कोटी रुपयांवर घसरला असला, तरी त्याचे उत्पन्न 70 टक्क्यांनी वाढून 7,167 कोटी रुपये झाले आहे.