देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्याशी संबंधित टाटा समुहासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. टाटा समूहाची ऑटोमोबाईल सेक्टरमधील दिग्गज कंपनी कर्जमुक्त झाली आहे. याबाबत कंपनीकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ साठी कर्जमुक्त स्थिती गाठली आहे. याशिवाय टाटा मोटर्सची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर देखील आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पूर्णपणे कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
शेअरमध्ये २ टक्क्यांनी वाढ
दरम्यान, याबाबतची माहिती समोर येताच टाटा मोटर्सच्या शेअरने मोठी उसळी घेतली आहे. टाटा मोटर्सचा शेअर सुरुवातीला २ टक्क्यांहुन अधिक वाढून 992.55 रुपयांवर पोहचला. विशेष म्हणजे टाटा मोटर्सने ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मोठ्या गुंतवणुकीची योजना बनवली आहे. ज्याअंतर्गत चालू आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणुकीचे लक्ष्य 43,000 कोटी रुपये इतके केले आहे.
[read_also content=”धनदांडग्यांचे मंत्रिमंडळ; मोदींचे 71 पैकी 70 मंत्री कोट्याधीश, सहा जणांकडे 100 कोटींहून अधिक संपत्ती! https://www.navarashtra.com/business/70-ministers-are-millionaires-in-modi-3-0-cabinet-546753.html”]
काय आहे पुढील प्लॅन?
कंपनीने मागील काही दिवसांमध्ये या योजनेचा वारंवार उल्लेख करत म्हटले होते की, गुंतवणुकीचा हा पैसा नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानावर खर्च केला जाईल. याशिवाय या गुंतवणुकीतील एक मोठा हिस्सा हा टाटा समूहाची ब्रिटिश युनिटची उपकंपनी जग्वार लँड रोव्हरसाठी देखील खर्च केला जाणार आहे. यात प्रामुख्याने 43 हजार कोटींमधील 35,000 कोटी रुपये हे जग्वार लँड रोव्हरसाठी तर 8000 कोटी रुपये हे टाटा मोटर्ससाठी खर्च केले जाणार आहे. त्यामुळे आता टाटा कंपनी कर्जमुक्त झाल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी येण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
मे महिन्यातील कंपनीची विक्री
टाटा मोटर्स ही कंपनी १५० अब्ज डॉलरच्या टाटा समूहाचा एक हिस्सा आहे. जिची एकूण किंमत ४४ हजार कोटी रुपये इतकी आहे. गेल्या महिन्यात मे 2024 मध्ये टाटा मोटर्सने आपल्या एकूण 76,766 युनिट्सची विक्री केली आहे. जी मे 2023 मधील 74,973 युनिट्सच्या तुलनेत काहीशी अधिक आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कारसह देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीत देखील टाटा मोटर्सने 2 टक्क्यांची (46,697 युनिट्स) वाढ नोंदवली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात 257 टक्क्यांच्या वाढीसह, 378 प्रवासी वाहनांची विक्री कंपनीने केली आहे. याउलट मे महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 4 टक्क्यांनी घसरून होऊन, ती 5,558 युनिट्स इतकी नोंदवली गेली आहे.
(टीप : शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना, प्रथम आपल्या मार्केट एक्सपर्ट्सचा सल्ला घ्यावा.)