(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी सिनेविश्वासाठी यंदाचं वर्ष आनंदायी ठरत असून, ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करून दिली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं तब्बल २१ कोटींहून अधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे. त्यानंतर प्रदर्शित झालेले ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, या सिनेमानंही समाधानकारक कमाई केली आहे.
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज यांच्या निर्मितीत, तसेच केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटानं पहिला आठवडा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. दुसऱ्या आठवड्यातही महाराष्ट्रभरातून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिकृत आकडे जाहीर झाले नसले, तरी आतापर्यंत या चित्रपटानं ४ ते ५ कोटींची कमाई केली असल्याचे म्हटले जात आहे.
Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा नवीन राडा, कॅप्टन आयुषवर विशालचा चढला पारा !
विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ महिला प्रेक्षकांपुरता मर्यादित न राहता, पुरुष प्रेक्षकांनाही तितकाच भावतो आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्र दौऱ्यावर असून, विविध शहरांतील चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांशी थेट संवाद साधत आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे. अनेक ठिकाणी सासू-सुना एकत्र चित्रपट पाहायला येत असल्याचं भावनिक दृश्य पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षकांनी तर चित्रपटानंतर सासू-सुनांमधील संवाद बदलल्याचं, नात्यांमध्ये आपुलकी वाढल्याचं सांगितलं आहे. खळखळून हसवणारा चित्रपट अनेक महिलांना भावूक करत असून, थिएटरमध्ये डोळे पुसताना दिसणाऱ्या महिलाच या चित्रपटाच्या यशाची साक्ष देत आहेत.
चित्रपटातील निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या अभिनयाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अभिनयातील सहजता, प्रामाणिकपणा आणि नात्यांतील गुंतागुंत त्यांनी प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. “हा चित्रपट केवळ महिलांसाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी तो कुठे ना कुठे तरी जोडला जातो,” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनातील भावनिक स्पर्श आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेली मांडणी या चित्रपटात पुन्हा एकदा अनुभवायला मिळते.
‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा ॲक्शनपॅक्ड टीझर लाँच, उपेंद्र लिमये साकारणार खलनायकाची भूमिका
प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “प्रेक्षक थिएटरमधून रडत, हसत आणि विचार करत बाहेर पडताना दिसतात, हे पाहून मन भरून येतं. अनेक महिलांनी सांगितलं की त्यांनी स्वतःला या कथेत पाहिलं. काही सासू-सुनांनी तर चित्रपटानंतर एकमेकींना घट्ट मिठी मारल्याचं सांगितलं. यापेक्षा मोठं समाधान दिग्दर्शक म्हणून काय असू शकतं? हा चित्रपट फक्त सासू-सुना नात्यापुरता मर्यादित नाही, तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, तर नाती कशी बदलू शकतात, हे दाखवणारा आहे. प्रेक्षकांचं प्रेम, डोळ्यांत आलेलं पाणी आणि मनापासून दिलेले आशीर्वाद हेच या चित्रपटाचं खरं यश आहे.”






