नाशिकमधील तेजस्विनी खैरनार यांना आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी घरच्या घरी केक बनवायचा होता. हे फक्त एक साधं स्वप्न वाटलं होतं, पण त्यातूनच त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. त्या दिवशी बनवलेला केक इतका गोड अनुभव देऊन गेला की त्यांनी तो आपला व्यवसाय बनवला आणि आज त्या स्वतःचा “Tejaswini Cakes” हा ब्रँड उभा करून महिन्याला ६० ते ७० हजार रुपये कमवत आहेत.
तेजस्विनी यांनी बी.कॉम आणि डी.एड. केलं असून पूर्वी त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. नोकरी चांगली होती, पण काही कौटुंबिक कारणांमुळे ती सोडावी लागली. घरात बसणं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्या केक बनवण्याच्या आवडीतून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
केक डिझायनिंग, फ्लेवर्स आणि सादरीकरण या सगळ्या गोष्टी त्यांनी सोशल मीडियावरून आणि थोडेसे क्लासेस लावून शिकून घेतल्या. एकदा केक बनवून फोटो टाकला आणि पाहता पाहता त्यांच्या मैत्रीणी, नातेवाईक, ओळखीचे लोक ऑर्डर देऊ लागले. ग्राहकांची पसंती मिळू लागल्यावर त्यांनी हे अधिक गंभीरपणे सुरू केलं.
प्रत्येक ऑर्डर त्या अत्यंत प्रेमाने बनवतात, बर्थडे, अॅनिव्हर्सरी, स्पेशल थीम्स, कस्टम डिझाईन असे अनेक प्रकार त्यांनी आत्मसात केले आहेत. त्यांच्या घरातूनच हा सगळा व्यवसाय चालतो आणि तरीही त्यांनी क्वालिटीमध्ये कधीही तडजोड केली नाही. आज तेजस्विनी ना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर एक प्रेरणादायी उद्योजिका म्हणूनही त्यांचं नाव नाशिकमध्ये ओळखलं जातं. त्यांचं म्हणणं आहे, “स्वप्न मोठं असावं लागत नाही, त्यातला आत्मविश्वास आणि सातत्य मोठं असायला हवं.”
तेजस्विनी यापुढे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार कशाप्रकारे करत आहेत? याकडे साऱ्यांचा लक्ष लागून आहे, तसेच त्यांच्या परिचयांना अशी अशा आहे की त्यांनी त्यांचा व्यवसाय आणखीन मोठ्या टप्प्यावर न्ह्यावा आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.